esakal | वुमनहूड : त्या दोघी
sakal

बोलून बातमी शोधा

rahika-deshpande

मी दरवर्षी मॅरेथॉनमध्ये धावते. तिथली ऊर्जा, उत्साह, जल्लोष मला आवडतो. आयुष्याच्या ‘रनवे’वर आपण कितीही इतरांबरोबर धावत असलो, तरीही शेवटी फिनिश लाइनपर्यंत आपल्यालाच धावायचं असतं. आपलेच हात आणि आपल्याच पायांच्या विश्‍वासावर... मला स्वतःचाच ‘Keep going Radhika’ असा आवाज कानी पडतो आणि मग परत कामाला लागण्यासाठी एनर्जी मिळते. ‘सकाळ माध्यम समूहा’ने नुकतीच मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती.

वुमनहूड : त्या दोघी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

रानी (राधिका देशपांडे)
मी दरवर्षी मॅरेथॉनमध्ये धावते. तिथली ऊर्जा, उत्साह, जल्लोष मला आवडतो. आयुष्याच्या ‘रनवे’वर आपण कितीही इतरांबरोबर धावत असलो, तरीही शेवटी फिनिश लाइनपर्यंत आपल्यालाच धावायचं असतं. आपलेच हात आणि आपल्याच पायांच्या विश्‍वासावर... मला स्वतःचाच ‘Keep going Radhika’ असा आवाज कानी पडतो आणि मग परत कामाला लागण्यासाठी एनर्जी मिळते. ‘सकाळ माध्यम समूहा’ने नुकतीच मॅरेथॉन स्पर्धा आयोजित केली होती. त्यात धावल्यानंतर मी पायी घरी चालले होते. तेवढ्यात मला या दोन महिला मोठ्या उत्साहानं वजन उचलत चाललेल्या दिसल्या. मला उगाच सवय आहे, विचारपूस करायची. मी त्यांना म्हटलं, ‘आज कंबर कसून काम करावं लागणार तायांनो!’ मग मला म्हणतात कशा, ‘हो न ताई, आज चार वाजल्यापासून ड्युटी लागली आहे बघा! चालायचंच... आणि वजन उचल्याशिवाय आयुष्य पुढं जातं होय?’

मी सहज म्हणाले, ‘उचलू का मी पण थोडं?’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्या आधी दचकल्याच, मग हसल्या आणि थांबल्या. म्हणाल्या, ‘आमची विचारपूस केली हेच खूप झालं ताई.’ मी म्हणाले, ‘थांबा. माझ्याशी बोलून तुमचं वजन हलकं होतं आहे का ते पाहू.’ त्या परत हसायला लागल्या. एकतर त्यांना माझी गंमत वाटत असावी किंवा त्या हसतमुख असाव्यात बहुधा. तर या आहेत विद्या कांबळे आणि रामेश्वरी शेलार. काबाडकष्ट करून घरच्यांचं आणि स्वतःचं पोट भरणाऱ्या स्वावलंबी स्त्रिया. डोक्यावर टोपी, रिफ्लेक्टर जॅकेट, पायात शूज आणि हातात झाडू हा त्यांचा पोशाख. बालेवाडी स्टेडियमजवळच्या रस्त्यावरचा कचरा साफ आणि आवार सुशोभित ठेवणं हे त्यांचं काम. सकाळी ५ ते दुपारी १२:३० पर्यंत ड्युटी. कचरा, धूळ, ऊन, वारा, पाऊस आणि काबाड कष्ट हे त्यांच्या हातांवरच्या रेषांवरच कोरलेलं. हे कठीण काम अलगद झेलून इतरांचं आयुष्य सोपं कसं करायचं, ही त्यांना अवगत झालेली कला. त्या मोकळ्या मनानं गप्पा मारायला तयार दिसल्या म्हणून काही प्रश्न विचारले, ‘तुम्ही हे जे काम करता त्यात तुम्हाला आनंद मिळतो का?’ त्या म्हणाल्या, ‘आनंद मिळतो का माहिती नाही ताई, पण समाधान आहे. आमच्या मुलांचं शिक्षण करायचं आहे, त्यासाठी हातभार लागतो ना? आमचं तर १२वी पर्यंत शिक्षण झालं आहे, पण चांगली नोकरी मिळाली नाही ताई आणि प्रत्येकाच्या गरजा वाढल्या आहेत. एकाच्या पगारावर कुठं भागतं? आपलं पुणे स्वच्छ, सुंदर ठेवायचं आणि घरी जायचं.  

आम्हाला कसली लाज नाही बघा ताई. काम काम असतं. हात धुतले की, याच हातांनी स्वयंपाक करून चार घास आमच्या पोरांना खायला घालता येतात. यात जास्त आनंद आहे बघा. आता १० वर्षं झाली, आम्ही हेच काम करतो आहोत. झाडू जमिनीवर सरकवताना जे संगीत उत्पन्न होतं, त्यात सगळी दुःखं साफ होतात बघा अन् आयुष्यात सुख-दुखः सगळ्यांना सारखीच भेटतात. कोणी कोणाची विचारपूस करतं तर कोणी आपल्याला विचारत पण नाही. पण आम्ही एकमेकींना सोडून जात नाही ताई. सकाळी आम्ही आमच्या येतो आणि इथून घरी जायला रिक्षा लावली आहे. दोघी एकत्र जातो.’ मी विचारलं, ‘आज तर खूप कचरा झालाय, लोक कसाही कचरा करतात. काहीही टाकतात. तुम्हाला राग येत नाही लोकांचा?’ त्यांनी एकमेकींकडं क्षणभर पाहिलं आणि म्हणाल्या, ‘ताई तुम्ही कचरा नाही केला, तर आम्हाला काम कोण देणार? कचरा झालाच नाही तर आमच्या कामाला काही अर्थ उरत नाही.’ त्यांच्या  बोलण्यात तथ्य होतं. कधीतरी त्या सांगतातही, ‘दादा कचरा करू नका, पण लोकांना राग येतो,’ असंही त्या म्हणाल्या. या गुणाच्या दोन बायका साडी नेसून, नाकात नथ, कपाळावर टिकली लावलेल्या होत्या आणि त्यांच्या डोळ्यांत त्यांच्या मुलांसाठी उज्ज्वल भविष्याची स्वप्नं मला स्पष्ट दिसत होती. रस्ता साफ करता करता त्यांना त्यांच्या मुलांच्या भविष्यासाठी रस्ता साफ दिसत होता आणि त्यासाठी त्यांची कितीही कष्ट करायची तयारी आहे. जाता जाता त्यांच्या बरोबर एक फोटो आणि एक सेल्फी काढला. पण नेमक्या त्याच वेळेला त्यांच्या चेहऱ्यावरचं हसू गायब व्हायचं. आम्हाला फोटो काढायची सवय नाही न ताई, त्यामुळं कसंचच होतं म्हणाल्या. निरोप घेण्याची वेळ झाली तेव्हा रामेश्वरीनी विचारलं, ‘ताई एक प्रश्न विचारू का?’ मला खूप असं वाटतं की तुम्हाला कुठं तरी पाहिलं आहे मी’. मी विचारले, ‘टीव्हीमध्ये बघितलं का तुम्ही मला?’

परत हरवलेलं हसू खुदकन गालावर आलं. डोळे मोठे करून, डोळ्यांतला कचरा साफ करून मला तोंड उघडून पाहू लागल्या. आता त्यांचं हसू माझ्याही चेहऱ्यावर उमटलं. आयुष्याच्या रस्त्यावर भेटलेल्या या दोघी त्याचं हसू मला देऊन गेल्या आणि हलकं वाटलं का नाही, ते माहिती नाही; पण आम्हा तिघींना वजन निश्चित जाणवलं नाही.

loading image