वुमनहूड :  हिरवागार चेंडू

वुमनहूड :  हिरवागार चेंडू

पेरू हे माझं सर्वात आवडतं, लाडकं फळ. मागच्या आठवड्यात सकाळी सायकलनं भांडारकर पथावरून जात असताना फोटोतला हा पेरू मला दिसला. सायकल बाजूला घेतली. म्हटलं, ‘ये गं ये. मला खा,’ अशी प्रेमाने हाक मारतो आहे म्हटल्यावर न थांबणं बरं दिसत नाही! माझ्या खिशात ३० रुपये नेहमी असतात. अडीअडचणीला लागतील म्हणून. शिवाय तोंडाला पाणी सुटल्यावर माझा जिभेवरचा ताबा सुटतो. पेरूकडं बघितलं की माझ्या चेहऱ्यावर एक वेगळे तेज येतं आणि सहजच डोळे चमकतात. मी पेरूची किंमत करत बसत नाही. बऱ्याचदा  मी या हिरव्या गार चेंडूला निवडते. सहसा माझी निवड चुकत नाही.

तो मूड स्विंगर, गेम चेंजर माझ्या हातात येण्यासाठी तयार असतो. मी आत्तापर्यंत भोवतालचं सगळं विसरलेले असते. ‘मसाला लावू का ताई?’ असा घोगऱ्या आवाजात पेरू दादांचा आवाज ऐकू आला की, मी जागी होते. ‘हो’, असं उत्तर दिलं की तो मस्त फोडी करून देतो.  

हा सीन बघण्यासारखा असतो. पैसे मी आधीच देते. कारण पेरू खाल्ल्यानंतर माझी त्या चॉकलेटच्या जाहिरातीतल्या ‘रमेश-सुरेश’सारखी अवस्था झालेली असते. पेरू प्रेमींच्या एव्हाना तोंडाला पाणी सुटलं असेल. तर या सर्व प्रक्रियेमध्ये मी आणि पेरू एवढेच असतो. पण नेमका आमच्या दोघांमध्ये कोणी तिसरा आल्यास होते माझी थोडीशी चिडचिड. एखादी मैत्रीण भेटते आणि गप्पा मारत बसते. काय आहे ना मला पेरू, चकली, कंगवा, नॅपकिन शेअर करायला आवडत नाही. 

कधीकधी माझ्या कामावर प्रेम करणारे फॅन्स येतात. ‘मॅडम एक फोटो?’ मला म्हणावसं वाटतं, ‘मॅडम जरा बिझी आहेत. एक ते चार या वेळेत या.’ अहो पण नाही हो म्हणवत तसं. मोठ्या प्रेमानं आपुलकीनं विचारतात ते. पण, मी पण कमी नाही. तोंडातली फोड हळुवार संपवून, हातातला पेरू घट्ट धरूनच फोटो काढते त्यांच्याबरोबर.

नवीन लग्न झालं होतं आमचं तेव्हा लक्ष्मी रोडवर नवऱ्याला गजरा दिसला आणि त्यांनी विचारलं, ‘घेऊन देऊ का?’ मी म्हणाले, ‘घे ना. आपल्या कारमध्ये ठेवायला. आणि माझ्या करता ३ पेरू घे. तू पण खाशील ना म्हणून.’ तेव्हाच त्याला कळलं, हे प्रकरण जरा कठीण आहे.

तर हा फोटोतला पेरू यवतचा आहे. रमेश नामदेव शिंदे दादा गेली ३५ वर्ष पेरू विकतात. त्यांचे आजोबा आधी विकायचे. मग त्यांचे वडील आणि आता ते. ते १९८६ सालच्या जुन्या सायकलीवर आपला ठेला मांडतात. सकाळी ५ वाजता यवतच्या बागेत जाऊन स्वतःच्या हातांनी पेरू तोडून आणतात. रसरशीत, टवटवीत, हिरवेगार, गोल, गोंडस, सक्षम. पेरू विकणारी त्यांची ही शेवटची पिढी. मी विचारलं, ‘का?’ तर म्हणाले, ‘या धंद्यात कष्ट खूप आहेत. आत्ताच्या पिढीमध्ये तेवढी ताकद आणि कष्ट करण्याची तयारी नाही. मी सकाळी साडेतीनला उठतो. भाकरी बांधून घेतो. सकाळी १० ते संध्याकाळी ६ बाकी काही न खाता राहतो. मग घरी जातो. ऊन, वारा, पाऊस काही असो, धंदा करावाच लागतो. पण पेरू विकून आमचा संसार चालू आहे. अर्थात माझी बायको दुसऱ्यांच्या घरी जाऊन काम करते. तिचा हातभार आहेच.’

मनात विचार आला. माझी कष्ट करण्याची तयारी आहे. सायकलही आहे. एक ठेला विकत घेण्याचं भांडवल आहे. का ना आपणच पेरू विकावे? पण तसं काही होणार नाही. कारण विकत घेतलेले, तोडून आणलेले पेरू मी खाऊन संपवणार नाही, याची काही शाश्वती नाही बाबा. अगदी खरं सांगू पेरू हे फळ म्हणजे एखादा under appreciated कलाकार असतो ना, तसं आहे बघा. म्हणजे चवीला ३ ते ५ चवी एकत्र देतो. मसाला लावून खाल्ला तर आंबट, गोड, तुरट, तिखट, खारट अशा सगळ्या चवींचं मिश्रण. पिकल्यावरही गोड. आता याचं काय करू असा प्रश्नच नाही. सरळ लोणची घाला. ज्याला ‘जॅम’ असं ही म्हणतात. याला ‘अमरूद’ म्हटलं आहे, पण फळांचा राजा आंब्याशी त्याची स्पर्धा नाही. असा हा एकटा उभा. माझ्या मनातला राजा तूच आहेस रे पेरू! आणि तुझ्या करता मी मिठू. चला आता हा हिरवा गार चेंडू हातात घ्यावाच. ‘पेरू दादा, थ्रो’. ‘कॅच!’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com