esakal | वुमनहूड  : आयुष्याचा ‘गुंता’... 
sakal

बोलून बातमी शोधा

वुमनहूड  : आयुष्याचा ‘गुंता’... 

माझ्या केसांची ‘केस’ सुरू राहणार. फरक एवढाच की, आता मी माझ्या केसांना धक्का पोचवत नाही. त्यांना प्रेमानी उशाशी घेवून झोपते. आणि हो या वेळेला माझ्या आईला ही माझे केस आवडले आहेत बरं का!

वुमनहूड  : आयुष्याचा ‘गुंता’... 

sakal_logo
By
रानी (राधिका देशपांडे)

आवळा, शिकेकाई, रिठा, संत्र्याची सालं, धने, जास्वंद आणि बरंच काही टाकून माझी आजी एक जादुई जिन्नस तयार करायची; शिकेकाई. खास माझ्या केसांसाठी! आजी शिकेकाईयुक्त पावडरनं माझे केस धुवून द्यायची आणि केसातला गुंता हळुवार फणी फिरवत काढून द्यायची. भुरभुरीत, लुसलुशीत केसांना खोबरेल तेल लावून चापूनचुपून वेणी घालून द्यायची, की मी अंगणात खेळायला तयार. आयुष्य किती सोप्पं होतं ना त्या काळात? झीरो मेंटेनन्स, भेसळरहित, शाम्पूविरहित होतं. हेअर स्टाईल करायची झालीच, तर उलटी वेणी, पीळ वेणी, पाच पेडी घालून केली की झालं. आयुष्य तेव्हा किती साधं सोप्पं आणि सरळ होतं नाही? वळण असेल तर आईनं भांग काढून दिलेल्या वेणीलाच. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

त्याचदरम्यान बाजारात आला शाम्पू आणि रंगीत प्लास्टिकचे हेअर बँड्स आणि पाठोपाठ ब्युटी पार्लरही. मला त्या निळ्या रंगाच्या शाम्पूचं आकर्षण वाटे आणि त्या लांब नखांना रंगीत नेल पॉलिश लावलेल्या मावशीच्या पार्लरमध्ये जावसं वाटायचं. तेव्हा मी बारा वर्षांची होते. माझ्या काही मैत्रिणींनी केस कापून ते रंगीत हेअर बँड्स वापरायला सुरुवात केली होती. मी लहानपणापासून सोस मावशी. नटणं, मुरडणं, तासनतास आरश्यासमोर बसून गप्पा मारणं मला आवडायचं. त्यामुळं आईनं मला या सगळ्यांपासून लांब ठेवलं. खूप फ्रॉक शिवून दिले, पण केस आईच्या हाती. सकाळी चापूनचुपून तेल लावून रिबिनी बांधून मला आई शाळेत पाठवे. मी घरी आल्यावर घट्ट वेण्या सोडून सैल वेणी घालायला लागले. एव्हाना, मी चौदा वर्षांची झाले होते. मला शिंगं फुटायला लागली होती. तू वेणी घालून द्यायला वेळ लावतेस म्हणून मला शाळेला जायला उशीर होतो, असा सूर आरंभायला मी सुरुवात केली. आईशी भांडून मी बहिणींबरोबर पार्लरमध्ये जाऊन केस कापून आले. त्या वेळचा फेमस ‘ब्लंट’ केला होता. घरी आल्यावर आईचा चेहरा एवढासा झाला होता. तिला खूप वाईट वाटलं होतं. मी मनोमन ठरवलं की, आपण लांब केसच ठेवायचे. केस लहान झाले होते. शिकेकाईची जागा शाम्पू नी घेतली होती, पण आयुष्याचा गुंता वाढला होता. आता आईबरोबरचा वेणी घालतानाचा वेळ नाहीसा झाला होता. आईचं उलट्या कंगव्यानी मारणं थांबलं होतं. मी किशोरवयात पोचले होते आणि मैत्रिणींबरोबर अंगणातल्या गप्पा वाढल्या. 

चार वर्षं गेली. मी कॉलेजमध्ये जायला लागले. केसही लांबसडक झाले होते. मी त्याच्या प्रेमात पडले होते आणि तो माझ्या लांब केसांच्या. आयुष्य गुलाबी होत होतं आणि अचानक तो अमेरिकेला निघून गेला आणि गुलाबी रंग उतरला. माझ्या केसांना धक्का लागला होता. तरुण वयात हा धक्का सोसेना. आईला न सांगता सरळ पार्लरमध्ये गेले आणि कचाकचा केस कापून आले. या वेळेला ‘बॉबकट’. मला वाटलं आई आता रागावणार, पण ती मागून आली आणि माझ्या डोक्यावर हात ठेवून गेली. काहीच बोलली नाही. तिला बहुतेक समजलं असावं. या वेळेला ठरवलं कधीच केस वाढवायचे नाही. केस कमी झाले, पण गुंता वाढला होता. लग्नाच्या बोहल्यावर खांद्यापर्यंत केस वाढवून उभी राहिले. मुलगी झाली. तिचं करता करता केस कधी लांब झाले कळलं नाही. एक गोष्ट कळली की, आपल्याला बाळंतपणातलं नैराश्य येतंय. यावेळेला आईला विचारलं, ‘केस कापू का?’ तर म्हणाली, ‘‘बाळाचं व्यवस्थत कर. स्वत-कडं वेळ द्यायला तुला कुठं फुरसत आहे. कापून टाक.’’ खरंतर या वेळेला मला असं वाटलं होतं आईनी म्हणावं, ‘‘वाढव गं छान. तुला लांब केस छान दिसतात.’’ हेअर कलर सुद्धाकरून आले. आयुष्यात तेच तेच रंग भरून कंटाळा आला होता. म्हटलं केसांनासुद्धा रंग देऊ या. या वेळेला मात्र आई रागावली. तिच्या मते रंग दिल्यानं केस खूप गळतात. तिचं म्हणणं होतं, मला जास्त काळजी घ्यावी लागणार आता. शब्द वेगळे वापरले एवढंच. केसांना रंग लावला होता, पण आयुष्याचा गुंता काही कमी झाला नव्हता. 

काळ सरतो तसं आपणही मोठं होत जातो. केस मात्र नेहमीच कात्रीत अडकतात. कधी मोठे होतात तर कधी आपण त्यांना छोटे करतो. 

२०१८ 
माझ्यासाठी कठीण काळ होता. पण या वेळेला ठरवलं होतं काही झालं तरी केसांवर कात्री फिरवायची नाही. माझ्या लक्षात आलं की, केस कापल्यानं आयुष्याला वळण मिळत नाही. 

२०१९ 
मी स्वत-वर काम केलं. बरेच बदल केले. आता माझं आयुष्य पहिल्यासारखं राहिलं नाही. मी माझा मेकओव्हर करायचं ठरवलं. पण या वेळेला मी माझ्या आईच्याच वयाच्या स्मिता देशपांडे ब्युटिशियनकडं गेले आणि त्यांनी छान पर्म केला. आज जे केस तुम्हाला दिसत आहेत त्यांची ही कहाणी. शेवटी डोकं सुपीक आहे, तोपर्यंत माझ्या केसांची ‘केस’ सुरू राहणार. फरक एवढाच की, आता मी माझ्या केसांना धक्का पोचवत नाही. त्यांना प्रेमानी उशाशी घेवून झोपते. आणि हो या वेळेला माझ्या आईला ही माझे केस आवडले आहेत बरं का! 

loading image