esakal | पांघरूण  
sakal

बोलून बातमी शोधा

radhika-deshpande

माझ्यात अजूनही ती तेरा वर्षांची मुलगी आहे जिच्या अंगावर तिने कमावलेल्या पैशातून, तिने घाम गाळून केलेल्या परिश्रमाची त्या पांघरुणात ऊब आहे. आणि आयुष्यात अधूनमधून स्वतःला चॅलेंज करून केलेल्या पराक्रमाच्या आठवणी आहेत यात.

पांघरूण  

sakal_logo
By
रानी (राधिका देशपांडे)

परवा फार्महाऊसला गेलो होतो. घरापासून लांब आपण जातो, तेव्हा ठराविक महत्त्वाच्या गोष्टी सोबत नेतो. उदाहरणार्थ, औषध, कपडे आणि खाण्यापिण्याच्या वस्तू; पण मी एका वस्तूची त्यात भर घालते, ती म्हणजे पांघरूण. माझी मुलगी मला एकदा तरी विचारतेच. ‘‘आई सुटकेस पूर्ण भरली आहे. तुझं पांघरूण कमी केलंस, तर ती व्यवस्थित बंद होईल. आई तिथंही स्वच्छ पांघरूण मिळतं, ते वापरू आपण.’’ मी तिला स्पष्ट सांगते, ‘‘तू हवं तर तुझं सामान कमी कर. तू तिथलं माझंही पांघरूण घे हवं तर; पण मला माझं पांघरूण राहू दे बाई. नाहीतर मला स्वस्थ झोप नाही यायची.’’ 

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘दुर्गा झाली गौरी’ नावाचं नृत्यनाट्य होतं, त्यात मी मुख्य भूमिका केली होती तेरा वर्षांची असताना. त्यात दुर्गा नावाच्या राजकन्येला माळकऱ्यांनी खास राजाच्या सांगण्यावरून तयार केलेल्या फुलांच्या बिछान्यावरसुद्धा झोप येत नाही म्हणून दुर्गा ‘त्या माळकऱ्यांना फासावर चढवा’ असं राजाला सांगते; पण राजा तिचं म्हणणं अमान्य करतो. मग ती रागाच्या भरात राजमहाल सोडून जाते आणि महापुरात सापडते. तिला मागचं काही आठवत नाही आणि ती एका म्हाताऱ्या जोडप्याबरोबर गौरी या नावानं राहायला लागते. शेतात कष्ट करते आणि मग तिला रात्री खाटेवरसुद्धा झोप लागते. अशा दुर्गा आणि गौरी मी जगले- त्यामुळे मला अगदी राजाच्या महालात गुलाबांच्या पाकळ्यांवर किंवा जमिनीवरही झोपायला लागलं तरी झोप लागते; पण स्वस्थ झोप मला माझं पांघरुण अंगावर घेतल्यावरच लागते. असं आहे तरी काय तुझ्या पांघरुणात? पैसा, परिश्रम, पराक्रम आणि पुण्याईचा गंध आहे. आठवणींचे रंग आहेत त्यात आणि स्पर्श आहे मऊ मऊ. कष्टानी मिळवलेली भाकर गोड लागते तसेच प्रामाणिकपणे केलेल्या कामाने आपली तहान भागू शकते.  

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

स्वच्छ गाडीवर मी आणि अंतरा आकाशातल्या ताऱ्यांकडे पाहत गप्पा मारत होतो. अचानक तिनं प्रश्न विचारला. ‘‘तुला बिछाना कसाही असला तरी चालतो; पण पांघरूण का चालत नाही?’’ ‘‘कारण मी त्या नाटकातली गौरी आहे- जी जगायचं कसं हे शिकली आहे; पण माझ्यात अजूनही ती तेरा वर्षांची मुलगी आहे जिच्या अंगावर तिने कमावलेल्या पैशातून, तिने घाम गाळून केलेल्या परिश्रमाची त्या पांघरुणात ऊब आहे. आणि आयुष्यात अधूनमधून स्वतःला चॅलेंज करून केलेल्या पराक्रमाच्या आठवणी आहेत यात. आणि हे माझं पांघरूण आहे. त्यामुळे कधीतरी माझ्या आजीनं, आई-वडिलांनी, तुझ्या बाबांनी घेतलेले पांघरूण आहे. त्यामुळे त्यात खूप प्रेम आहे. माया आहे.’’ 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘‘आई मला काही कळत नाही आहे तरी पण.’’ ‘‘लोक तुला नादिष्ट म्हणत असतील. लोक म्हणतात तर म्हणू देत. अंतरा, तू जर खरी, कष्टाळू, पराक्रमी असशील तर तेच लोक तुझ्याकरता फुलांचा बिछाना करतील, पायघड्या घालतील; पण तू चुकलीस, तुझा पाय घसरला, किंवा एकटी पडलीस तर अगदी बोटावर मोजता येणारी आपली माणसं तुझ्यावर पांघरूण घालतील. ती आपली माणसं. त्यांना तू धरून ठेव. त्यांना दुरावू नकोस. अशी सगळी माणसं माझ्या पांघरुणात आहेत अगं.’’ ती म्हणाली, ‘‘आई, तुला सांगू, मला पण तुझ्यासारखं पांघरूण हवं.’’ मग तिला सांगितलं, ‘‘चार दोरे घे. परिश्रम, पराक्रम, पैसा, आणि पुण्याई, आणि तयार कर तू तुझं पांघरूण. प्रसिद्धीची किनार लावायला मी तुला मदत करीन.’’ 

‘‘आई, तू एका दमात खूप काम सांगितलं आहेस. मला झोपू दे आता.’’ ‘‘झोपा दुर्गेश्र्वरी!’’ 

...अंतरा, माझ्या पांघरुणाचे पंख करून आपण आकाशातल्या ढगांशी स्पर्धा करायची का?...निजली वाटतं. इथे थंडी फार जास्त आहे. माझ्या पांघरुणात तिला घेते. झोप चांगली लागायला हवी. शुभरात्री. 

loading image