वुमनहूड : तिसरा डोळा

वुमनहूड : तिसरा डोळा

शंकराला तिसरा डोळा असतो. तो त्याच्या दोन डोळ्यांच्या मध्यभागी सुप्त अवस्थेत असतो म्हणे. तो त्यानं उघडला तर प्रलय येतो. इतर वेळी तो बंद असतो. बंद का असतो? कारण तो त्याच्या आत काय चाललं आहे, हे बघण्यासाठी असतो. चिंतन, मनन, चेतना आणि चैतन्य जागृत राहण्यासाठी. छान आहे की नाही कल्पना? मी शंकर देवाला प्रत्यक्षात पाहिलं नाही, पण प्रकोप, प्रलय त्याचं रौद्र रूप मी पाहिलं आहे. तो आहे. खरंतर या जगात सगळंच मायावी. आपले डोळे उघडे ठेवून बघितल्यास तुम्हाला लक्षात येईल की पावलोपावली चमत्कार होतात. 

आम्हा कलाकारांना यावर सहसा विश्वास असतो. देव असतो, तर दानवही असतोच. शेवटी विश्वासावर आहे सगळं. पृथ्वी गोल आहे आणि ती स्वतः भोवती गोल फिरते, असं शास्त्रज्ञ म्हणतात आणि त्याला मी होकार देते. नाहीतर मी कुठे स्वतःच्या डोळ्यांनी तिला गोल पाहिलं आहे. एकूण काय सगळं आपल्या दोन डोळ्यांनी पाहण्याची गरज नसते. कधीतरी तिसरा डोळा उघडून बघा. माझा मूर्तीवर नसेल, पण दैवावर विश्वास आहे आणि तो आपल्याला पाहत असतो. जणू काही एखादा तिसरा डोळा आपल्याला पाहतोय. 

कॅमेरा-‘द मॅजिक बॉक्स’. तो माझ्यासाठी विलक्षण आकर्षणाचं केंद्र आहे. आपण या कॅमेराला देवरूपात, व्यक्ती आणि मूर्तीरूपात समजून पाहिलं तर? समजा कॅमेरा हा शंकराचं रूप आहे. देवाच्या पूजेसाठी लागते हळद, कुंकू, हार, घंटा, नारळ, नैवेद्य आणि शांतता  आणि सुबक स्वच्छ मंदिर. कॅमेराला लागतात रंगभूषा आणि वेशभूषा केलेले कलाकार, उत्तम साऊंड सिस्टम, लाइट्स, सुंदर, स्वच्छ सेट्स, स्टँड. त्याला हवं तसं तो करून घेतो आणि त्यानं तयारी दाखवल्याशिवाय आमचा दिवस सुरू होईल तर शपथ. 

आमचे सिनेमॅटोग्राफर शांतपणे शूट करतात. एरवी त्यांचा आवाज नसतो, पण कॅमेराला कोणाचा चुकून धक्का लागल्यास ते रागावतात. त्यांचं चिडणं साहजिक आहे. शेवटी कॅमेरा आहे तो. अत्यंत मौल्यवान, महाग आणि सर्वांत महत्त्वाची गोष्ट. कॅमेरा आहे म्हणून आम्ही आहोत. कॅमेरा शंकराचं रूप असेल, तर कॅमेरामन गणपती, दिग्दर्शक नारद आणि कलाकार कृष्ण. ही निव्वळ माझी कल्पना. 

समजा कॅमेरा एक व्यक्ती आहे. तो मला मित्र वाटतो. आम्हाला सेलिब्रिटी बनवणारा, पण इथे तोच सेलिब्रिटी. आम्ही सुंदर दिसायला हवे म्हणून कॅमेरामन आणि लाईटदादा, मेकअपदादा यांना सळो की पळो करून सोडणारा. शूटिंगच्या सेटवर तुम्हाला मजेशीर वाक्यं ऐकू येतील. जसे मुंडी काटो, फिल्टर मारो, उसको घुमादो, पलटी मारो, सिधा करो... अशी अनेक वाक्यं आमच्या कानावर आले की, समजायचं कॅमेरा महाराज शूटची तयारी करून घेत आहेत. एवढं सगळं झाल्यावर माझा सीन होतो. एखादा अत्यंत इमोशनल सीन असतो. तो मी देत असताना दिग्दर्शकाचं ‘कट’ असं ऐकू येतं. 

‘राधिका हसतेस काय? हा रडण्याचा सीन आहे.’ 
‘नाही दादा, मी नाही हसले.’ 
‘कॅमेरा कधी खोटं बोलत नाही. इथे मॉनिटर वर येऊन बघ.’ 

बघते तर खरंच माझा चेहरा हसरा दिसत होता. कॅमेरा आपल्या डोळ्यातले सूक्ष्म भाव तंतोतंत टिपू शकतो. शब्दांची गरजच भासू देत नाही. त्याचं प्रामाणिक कलाकारावर प्रेम असतं. त्याला समजून घेतलं की, तो कलाकाराला भरभरून देतो. आपण केलेलं काम जगापर्यंत पोचवतो. आता वस्तू रूपात बघितलं कॅमेरा एक जादूई पेटी आहे. एकदा का आपण त्यात बंद झालो की, समजावं आपण कायमस्वरूपी जिवंत राहू शकतो. त्याचा तिसरा डोळा माझ्याकडं सतत पाहत असतो. ‘मॅडम, शॉट रेडी आहे,’ असं मला सांगायला येतात तेव्हा मी काही क्षण हळूच माझे डोळे मिटून घेते. त्याला मला आज कसं पाहायचं आहे हे चित्र डोळ्यासमोर आणते आणि ‘सायलेन्स, कॅमेरा, रोलिंग, ॲक्शन’साठी तयार होते. ‘टेक!’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com