वुमनहूड : राजकुँवरचा प्रवास

रानी (राधिका देशपांडे)
Friday, 31 January 2020

आयुष्यातल्या वाटेवरती लोक भेटतात, काही आपलीशी होतात, काही निरोप घेतात; तर काही मनात घर करून बसतात. तो काळ लोटला की, राहतात फक्त फोटोग्राफिक इमेजेस, आठवणींच्या खजिन्यात जपून ठेवण्यासाठी. या फोटोमध्ये रूप, रंग, गंध, स्पर्श आणि भावना आहेत. त्या शब्दांत व्यक्त होऊ देतात.

बोटावर मोजण्याइतपत दिवस उरले आहेत ‘स्वराज्य रक्षक संभाजी’ ही मालिका संपायला. आम्ही सगळ्यांनीच एकमेकांबरोबर फोटो काढायला सुरुवात केली आहे. आयुष्यातल्या वाटेवरती लोक भेटतात, काही आपलीशी होतात, काही निरोप घेतात; तर काही मनात घर करून बसतात. तो काळ लोटला की, राहतात फक्त फोटोग्राफिक इमेजेस, आठवणींच्या खजिन्यात जपून ठेवण्यासाठी. या फोटोमध्ये रूप, रंग, गंध, स्पर्श आणि भावना आहेत. त्या शब्दांत व्यक्त होऊ देतात. या मायावी जगातली आठवणींची वीण घट्ट करू पाहणारी, तुमचंही मनोरंजन होईल अशी आशा बाळगणारी, मी निव्वळ एक कलाकार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘स्वराज्य रक्षक संभाजी’मध्ये ‘राजकुँवर गणोजी शिर्के’ म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांच्या बहिणीचा, अर्थातच छत्रपती शिवाजी महाराजांच्या कन्येची भूमिका करशील का, असं मला विचारण्यात आलं. शिवकन्या; रक्तात शौर्य, सामर्थ्य, स्वाभिमान आणि स्वराज्याप्रति श्रद्धा आणि संवेदना असणाऱ्या एका स्त्रीची भूमिका वटवण्याची जबाबदारी उचलण्याचा विश्वास त्यांच्या रूपाने आई भवानीने माझ्यावर दाखवला होता, असं समजून या प्रवासासाठी मी होकार कळवला. कलाकार एखादी भूमिका स्वीकारतो, तेव्हा तो ती भूमिका जगवण्याची प्रतिज्ञाच घेतो; पण हे वाटतं तितकं साधं, सोपं, सरळ नसतं. ते फक्त एकटीचं काम असतं आणि त्याचाच सर्वांत मोठा वाटा असतो, असं कोणी कलाकार म्हणेल तर तो तो नव्हे; त्याचा अहंकार बोलतो आहे, हे जाणावे. भूमिका वठवणं म्हणजे ‘टीम वर्क’ असतं. पायाच्या बोटाच्या नखापासून डोक्यावरच्या केसापर्यंत मी ‘राजकुँवर बाई’ दिसते आहे की नाही, याची जबाबदारी फोटोतल्या सगळ्यांची असे; तर ही मंडळी म्हणजे वेगवेगळ्या डिपार्टमेंटची माणसं. हेअर-प्रतीक्षा शिंदे, मेकअप- वैभव अंबोरे, गेट-अप (नऊवारी स्पेशालिस्ट) - जयश्री नाईक, कॉस्च्युम- देवेंद्र चौहान आणि स्पॉट दादा- विनोद भोसले. 

या सगळ्यांशिवाय ‘राजकुँवर’ कोणीच नाही. राधिका नावाच्या एकट्या मुलीचं ते कामच नाही. एक कलाकार म्हणून आम्ही दररोज नवीन काही तरी शिकत असतो. या फोटोकडं पाहून मला असं लक्षात आलं की, भोवताली असलेल्या माणसांकडून आपण नकळत कितीतरी गोष्टी शिकत असतो. प्रतीक्षा आल्या आल्या माझे हेअर करायला घेते, माझ्या केसालाही धक्का न लागू देता. शांतपणे केसात कंगवा फिरवीत चेहऱ्यावर स्मित ठेवून. ‘ताई तुम्ही खूप छान आहात,’ असं अधूनमधून म्हणते. जयश्रीताई आम्हा बायकांना नऊवारी नेसवून देण्याचं काम करतात. त्यांच्या इतक्या सुपर फास्ट नऊवारी नेसवून देणाऱ्या मी पहिल्या नाहीत. सगळ्या समस्यांवरील उपाय जणू त्यांच्या जवळ तयार असतो. ‘ताई नका टेन्शन घेऊ,’ हे त्यांचं ब्रीदवाक्य. आपण दिसतो कसे यात सगळ्या कलाकारांना रस आणि आम्ही स्त्रिया तर त्यात तरबेज. एक नाही शंभर प्रश्न आम्ही विचारणार आणि ते सहन करणं त्यांच्या नशिबात. वैभव दादा शांतपणे सगळं सहन करत आमच्या कपाळावर कुंकू लावतो आणि लिपस्टिक लावू नका, याची आठवण करून देतो. ममतानी सांगितलेल्या सूचना तंतोतंत पाळणारा देवेंद्र दादा. नऊवारीला इस्त्री करून ठेवणे, शेला खांद्यावर चढवून देणे, जोडवी आणून देणं, चपला हातात आणून देणे... किती रे करता तुम्ही असं मी म्हटल्यावर त्याचं उत्तर, ‘मग आमच्या राजकुँवर बाई आहात तुम्ही. शिवकन्येला काही कमी पडायला नको. तुम्हाला कोणी चांगलं म्हटल्यावर आम्हालाबी लई चांगलं वाटतं बघा.’ अत्यंत जीवा भावाची माणसं आहेत ही माझी सगळी. आम्ही सगळे इथं काम करायला आलो आहोत, हा भाव आहेच. मात्र, नुसतं काम काम नसून तो एक अनुभव आहे आणि तो जितका सुखकर, मजेशीर आणि जिव्हाळ्याने होईल तितकाच हा प्रवास सुंदर. प्रवासाचा शेवट सुंदर हवा; पण त्याहून तो हसत खेळत, खेळीमेळीच्या वातावरणात झाल्यावर असे फोटो निघतात. हे सगळं मी सेटवर पुण्यासाठी निघण्याच्या बेतात असताना कारमध्ये बसून लिहीत होते. तेवढ्यात धावत आमचे स्पॉटदादा विनोद भोसले आले, मी विसरलेली पाण्याची बाटली घेऊन आणि म्हणाले, ‘अहो ताई, तुम्ही पाण्याची बाटली विसरलात. पुण्यापर्यंत जायचं आहे तुम्हाला. सावकाश जा. काळजी घ्या.’

‘जसा राजा तशी प्रजा’, हा अनुभव फोटोमधल्या कलाकार माणसांनी मला करून दिला. डॉ अमोल कोल्हे आणि संपूर्ण जगदंब क्रिएशनस टीमचे व झी मराठीचे कौतुक आणि धन्यवाद मानायला मी इथे शब्द कमी पडू देणार नाही. अनेक वर्षं येतील, अनेक कलाकार भेटतील, अनेक भूमिका ही मी वटवीन; पण आठवणींच्या गंधानं मी  ‘राजकुँवर’ला अनुभवत राहीन. जय भवानी! जय शिवाजी!

कृतज्ञ.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Radhika deshpande article Womanhood