esakal | वूमनहूड :  धन्नो आणि बसंती 
sakal

बोलून बातमी शोधा

वूमनहूड :  धन्नो आणि बसंती 

सायकल माझा जिव्हाळ्याचा विषय आणि फिटनेसचं सिक्रेटही. माझी २१ गियरची सायकल आहे. तिचं नाव मी धन्नो ठेवलंय. धन्नोशिवाय आमच्याकडं तिची मोठी बहीण ‘लाल परी’ आहे. नवऱ्याला वाढदिवसाला भेट म्हणून दिली होती.

वूमनहूड :  धन्नो आणि बसंती 

sakal_logo
By
राधिका देशपांडे

‘चल धन्नो, पलट सबास!’ असं मी तोऱ्यात माझ्या धन्नोला म्हणते आणि ती पुण्याच्या रस्त्यांवरून मला सुसाट घेऊन पळते. आम्ही दोघी एकमेकींना साद घालत जादूई प्रवास सुरू करतो. धन्नो माझी सायकल आहे आणि मी तिची बसंती! 

सायकल माझा जिव्हाळ्याचा विषय आणि फिटनेसचं सिक्रेटही. माझी २१ गियरची सायकल आहे. तिचं नाव मी धन्नो ठेवलंय. धन्नोशिवाय आमच्याकडं तिची मोठी बहीण ‘लाल परी’ आहे. नवऱ्याला वाढदिवसाला भेट म्हणून दिली होती. तो चालवतच नव्हता. मी सारखी त्याची सायकल चटक लागल्यासारखी पळवायला लागले. ती आयुष्यात आल्यापासून मला एकटं वाटत नाही. मी खूप दिवस सायकल न चालवल्यास ती मला खुणावते, ‘चल ऊठ, आपण फिरायला जाऊ.’ लोक सायकल व्यायामाचं साधन म्हणून वापरतात, बऱ्याचदा सकाळी सायकलिंग करतात. मला गर्दीच्या वेळी सायकल चालवायला आवडतं. माझा रस्ता ठरलेला नसतो. घरून बालगंधर्व रंगमंदिर आणि परत घरी, असा १८ किलोमीटरचा रस्ता पूर्ण केल्याशिवाय पाय मोकळे झाल्यासारखं वाटत नाही. कधीतरी गुडलक कॅफेला मित्रांबरोबर चहा पिणं, कधी पेरू खाण्यासाठी सायकल थांबवणं हे ठरलेलं आहे. सायकलीचा वेग वाढताना मला अनेक कल्पना सुचतात. माझा सायकलीबरोबरचा संवादही सुरू होतो. मी वेड्यासारखं बोलते आहे असं वाटेल तुम्हाला, पण सायकल माझ्याशी बोलते. ‘शोले’ चित्रपटातील बसंतीसारखं धन्नोही मला विचारते, ‘बोलो, कहां जाओगी? सिंहगड, कामशेत, खडकवासला, लोहगड, लोणावळा, लवासा या मुंबई, बोलो बोलो?’ आणि मी ‘हां चलो’ म्हणत, आम्ही दोघी या सगळ्या ठिकाणी गेलो आहोत. पुण्यात शूटिंग असल्यावर मी सायकलवरच जाते. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

आपण सायकलशी जोडलेल्या सगळ्याच आठवणी मोरपिसाप्रमाणं जपून ठेवलेल्या असतात. मी पाच वर्षांची असताना माझे आजोबा नागपूरच्या आनंद-आश्रम उपाहारगृहात सायकलवर पुढं लावलेल्या बास्केटमध्ये बसवून न्यायचे. मी दहा वर्षांची असताना श्रीरंगदादाच्या सायकलीवर पहिलं पेडल मारलं. एका दिवसात सायकल शिकलेले पाहून वडिलांनी मला दुसऱ्याच दिवशी नवीन सायकल घेऊन दिली. नवीन पंखच मिळाले, असं काहीसं वाटलं मला. मी अनेकदा त्या सायकलवरून पडले. आजही गुडघ्यावरील डाग त्याची आठवण करून देतात. मी बारा वर्षांची होते. एक अनोळखी मुलगा माझा सायकलवरून दोन दिवस पाठलाग करत होता. त्यानं सायकल चालवताच विचारलं, ‘माझी मैत्रीण होशील का?’ आता यात संतापण्यासारखं काही नव्हतं म्हणा, पण माझ्यात दुर्गा संचारली आणि मी दिली हवेत लाथ मारून. तो मुलगा सायकलवरून पडला आणि मी तेथून पळ काढला. तो माझा पहिला पराक्रम. नवीन सायकल शाळेत नेताना गंमत वाटे. लहान भावाला डबल सीट नेण्यातही वेगळाच आनंद होता. सायकल स्पर्धेत भाग घेऊन बक्षीस घेण्यात वेगळीच मज्जा होती. सायकल पंक्चर झाल्यावर मात्र फजिती व्हायची. मी अनेकदा सायकलची किल्ली हरवली आहे. आई रागवेल म्हणून हळूच पप्पांना सांगायचे. ते प्रेमानं ड्युप्लिकेट किल्ली द्यायचे. सायकलीला असं तसं समजण्याची चूक करणं योग्य नाही. सायकलवर बसून क्रांती घडवून आणली जाऊ शकते, यावर माझा विश्वास आहे. फास्ट लाइफमध्ये स्लो पेस पकडायची असल्यास, प्रदूषण कमी करायचं असल्यास घरात सायकल पाहिजेच. सुदृढ राहण्यासाठी सायकल हवीच. आजकाल अनेक मानसोपचारतज्ज्ञ मानसिक स्वास्थ्यासाठी सायकल चालवायला सांगतात. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

पुणे शहर सायकलीचं शहर मानलं जातं. इथं सायकल चालवणाऱ्यांसाठी जागोजागी वेगळ्या लेन दिसतील. माझी धन्नो मला ‘कीप गोइंग, नेव्हर गिव्ह अप ॲटिट्यूड’ शिकवते. मी नुकतीच इलेक्ट्रिक सायकल विकत घेतली. धन्नो असताना नवीन का? कारण माझी सायकल आता मुलगी पळवायला लागली आहे. नवीन सायकलीचं नाव आम्ही ‘बिजली’ ठेवलं आहे. लवकरच आमचं ‘आई कुठे काय करते’ मालिकेचं शूटिंग सुरू होणार आहे. ‘बिजली’ला कारमध्ये घालून मुंबईला नेणार आहे. एक दिवस शूटिंग संपल्यावर तिला ठाण्याहून नरिमन पॉइंटला नेणार आहे. ‘बस धन्नो, रुक जा सबास! घर आलं आहे....’ तुम्ही कधी घेताय नवीन सायकल? नामकरण विधीला मला नक्की बोलवा, बसंती येईल तिच्या ‘धन्नो’ला घेऊन. 

loading image
go to top