माझ्या प्रिय देशवासियांनो... 

radhikadeshpande
radhikadeshpande

प्रिय मित्र-मैत्रिणींनो स. न. वि. वि. 
कराग्रे वसते लक्ष्मी 
करमध्ये सरस्वती 
कर मूले तू गोविंदम 
प्रभाते कर दर्शनम 

सूर्याच्या असंख्य किरणांनी न्हाऊन निघाल्यावर ‘चाय पे खत’ असं म्हणत मी लॉकडाउनच्या दहाव्या आठवड्यात पुण्याहून तुम्हाला हे पत्र लिहितेय. मला कल्पना आहे, माझं हे पत्र संपूर्ण महाराष्ट्रभर वाचलं जाणार आहे. पण, खरंतर हे पत्र संपूर्ण भारताला उद्देशून लिहिलेलं आहे. कारण, आपला काळ, वेळ आणि स्थळ एकच आहे. आपला देश, आपली माती, आपली माणसं सगळे मिळून आपण एकाच माळेचे मणी. मला आज आपल्या सगळ्यांबद्दल लिहावंसं वाटतं आहे, कारण गोष्ट आपली आहे. लॉकडाउन, क्वारंटाईन, कोविड-१९, कोरोनासारख्या भयावह, नकारात्मक वातावरणात खुललेली, सकारात्मक ऊर्जा देणारी, उदात्त हेतूंनी ओतप्रोत, वैश्विक शक्तींशी लढा देत जगाला उदाहरण ठरलेली ही आपली गोष्ट आहे. निसर्ग संकटांवर संकटांचे बाण सोडत असताना भारताने मानवधर्म पाळण्याची प्रतिज्ञा घेऊन शौर्य दाखवले आहे. विदेशातले अनेक लोक ‘‘आता भारताचं काय होणार? न पेलवणारी लोकसंख्या असलेल्या, अज्ञानी, काही अर्थानं अप्पलपोटी आणि अनेक नोकऱ्या विदेशी उलाढालींवर अवलंबून असलेल्या देशाचं काय होणार?’’ असे हतबल, घाबरवून सोडत होते. मी शांत राहायचं ठरवलं. जेव्हा अविश्वास, अज्ञान आणि अंधकार पसरवलेला असतो तेव्हा आपण गप्प राहायचं असतं. निदान आपल्या शब्दांत सकारात्मकतेचं बळ येत नाही आणि आपण निश्चित अशी दिशा ठरवत नाही, तोपर्यंत. मी दहा आठवडयांपासून घरातून बाहेर पडले नाही. यात कौतुक करण्यासारखं काहीच नाही. आपल्याला काहीच कळेनासं होतं, तेव्हा आपण वडिलधाऱ्या माणसांचं ऐकतो. हे आपले संस्कार आहेत. माझ्यासारख्या बहुतांश भारतीयांनी हेच केलं आहे. भारताच्या १३० कोटी लोकांचं आज मला कौतुक करायचंय. आपण एक सक्षम, जबाबदार, कर्तृत्ववान, सर्वगुणसंपन्न देश आहोत, याची जाणीव करून द्यायची आहे. मी त्या ९०% भारतीयांबद्दल बोलतेय जे खऱ्या अर्थानं आपल्या समाजाचं प्रतिनिधित्व करताहेत. 

खरंतर हे पत्र लिहण्यामागं अजून एक कारण आहे. काही आठवड्यांपूर्वी नावाजलेल्या लेखिका फ्रान्सेसका मेलँड्री यांनी रोममधून युरोपियन देशांना उद्देशून एक पत्र लिहिलं होतं. ‘तुमच्या भविष्यकाळातून लिहिलेलं पत्र,’ असं त्याचं शीर्षक होतं. सद्यपरिस्थितीला अधिक भयावह करून दारुण आणि करुण रसातलं निराशाजनक पत्र तिनं लिहिलं होतं. त्यात तिनं येणाऱ्या काळातले भयावह संकट, त्यातून होणारे मानसिक, सामाजिक, भौगोलिक आणि काहीसे काल्पनिक चित्र तिच्या लेखणीतून रेखाटलं होतं. या पत्राचा मराठीत अनुवादही झाला होता. आपलंही वुहान, इटली, अमेरिकेसारखं झालं तर? असा हताश करणारा विचार येणं साहजिक आहे. पण माझं तसं होत नाही. मी आजच्या काळातली आशावादी, आत्मनिर्भर भारतीय आहे. मी वाईट विचारांना झटकून दिलं आणि रामरक्षा स्तोत्र म्हणत स्वतः भोवती सुरक्षिततेचं आवरण तयार करून घेतलं. सद्यपरिस्थितीच्या खोलात शिरायचं ठरवलं. फक्त माझाच विचार न करता माझ्या भारतीय कुटुंबीयांचा विचार करायला लागले. माझ्या असं लक्षात आलं की, मुळात पाश्चात्य देशांमध्ये आणि माझ्या देशामध्ये जमीन-अस्मानाचा फरक आहे. त्यांनी हा व्हायरस नुसता फ्लू समजला त्याचवेळेला आपण ह्याला गांभीर्यानं घेतलं. ते अशा काळात वागायचं कसं, राहायचं कसं हे शिकत होते, तेव्हा माझ्या देशातल्या बांधवांनी विविध कलांमध्ये स्वतःला बुडवून घेतलं होतं. ते ब्रेड आणि बटर खात असावेत, तेव्हा मात्र आपण देशाच्या उत्तर, दक्षिण, पूर्व, पश्चिमेकडच्या पाककृती घरी करत होतो. पुरुष मंडळींनीही झाडणं - पुसणं, भांडी आणि स्वयंपाक करण्यात उत्साह दाखवला. त्या लोकांची झोप उडाली होती, तेव्हा आयुष्यभर काबाडकष्ट करणाऱ्या भारतीय नागरिकांना मात्र सुखाची झोप मिळाली. ते वेगवेगळे व्यायामप्रकार शोधत होते, तेव्हा माझा देश सूर्यनमस्कार घालत होता. सोशल मीडियाचं व्यसन आपल्यालाही लागलं म्हणा, पण मुळातच आपला देश सोशल आहे आणि मला असं वाटतं की, आपल्या सगळ्यांना आज एकत्र आणण्यासाठीच ह्या मीडियाचा जन्म झाला असावा. पक्षी, प्राणी, आकाश, नद्या, निसर्गाचे असंख्य घटक सुखावताना पाहून दुपटीनं सुखावणारे आपणच होतो. माझ्या अनेक बांधवांचे पगार कापले, अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, तेव्हा काहींनी घरचा मार्ग धरला तर काहींनी त्यांच्या कल्पनेतून विकल्प शोधले. मैलोनमैल चालत जाणाऱ्या मजूर बांधवांना सर्वसामान्यांनी मदत केली. पोटतिडकीने घरकाम करणाऱ्या नोकरवर्गाचे पगार कापले गेले नाहीत. ह्या काळात लहान मुलांनी दाखवलेले सामंजस्य उज्ज्वल भविष्याची हमी आहे. 

भारत एक शक्तीपीठ आहे, कारण १३० कोटी जनतेचे २६० कोटी हात कामाला जुंपले आहेत. आपणच आपल्याला कमी लेखण्याचा प्रश्न येतोच कुठं! पैसा सर्वांत महत्त्वाचा नसून, अनेक दानशूर आपला खजिना हलका करताना आपण पहिले. भारतानं प्रसिद्धी मिळवली ती शील, मानवतेचं आणि एकात्मतेचं उदाहरण देऊन. अगदी जगबुडी झालीच, तर भारताची बोट बनवण्याची नेट प्रॅक्टिस झाली आहे. आपण सगळे एकटे असलो तरी, भारतात राहत असताना आपण एकलकोंडे राहणार नाही, हे पटतयं. सूर्याचा प्रकाश आपल्या देशावर आहे, तोवर आपल्यातील चेतना, आत्मीयता, मानवता आणि ‘वसुधैव कुटुंबकम’ ही भावना जगाला जोडत राहील. एकेदिवशी या व्हायरसला आपण चितपट केल्याशिवाय राहणार नाही. 

हे पत्र तुम्हाला मी माझ्या वर्तमान काळातून लिहितेय. माझं हे पत्र तुमच्या भविष्य काळातलं निश्चित नाही, कारण मला माहितीये, मी माझ्या मातीतून जन्माला आलेली निव्वळ एक कलाकार आहे. म्हणूनच समाजाच्या भावनांशी एकरूप होऊ शकते. परिस्थितील बदल हा आपल्या अनुरूप असणार आहे. ‘सकाळ’च्या निमित्तानं माझं हे खुलं पत्र तुम्हाला चहाच्या पहिल्या घोटाबरोबर मिळो. खिडकीबाहेर बघतेय, पावसाची हलकी सर येऊन गेलीय. ऋतू बदलतो आहे. हेही दिवस जातील आणि मी बाहेर पडेन, तेव्हा आनंदाच्या सरींचा वर्षाव माझ्यावर होईल, यावर माझा पूर्ण विश्वास आहे. 

कळावे, लोभ असावा, 
तुमची, 
रानी

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com