‘चला, जाऊ द्या’ 

रानी (राधिका देशपांडे), अभिनेत्री 
Saturday, 19 December 2020

मनात विचार आला, कंडक्टरना ‘चला, जाऊ द्या’ म्हणून कंटाळा येत नसेल का? पण खरं तर ‘चला, जाऊ द्या’ या शब्दातच खरं सुख आहे. इंग्लिशमध्ये आपण त्याला ‘लेट गो’ म्हणतो. म्हणजे धरून काहीच ठेवायचं नाही.

पायी चालत होते. एक बस समोर स्टॉपवर थांबली, म्हटलं बसावं बसमध्ये. दोनच तर चौक पुढे जायचंय. मी चढले आणि कंडक्टर मोठ्यानं ओरडला, ‘‘चला, जाऊ द्या.’’ लेडीज सीटवर जाऊन बसले. कंडक्टर म्हणाले ‘‘बोला कुठे?’’ मी म्हटलं, ‘‘दोन चौक पुढच्या स्टॉपवर थांबवा.’’ त्यांनी हातात तिकीट दिलं. अत्यंत पातळ कागदावर अकरा रुपये असं लिहिलं होतं. एक रुपया 25 पैशाचं तिकीट काढूनसुद्धा मी प्रवास केलाय. अर्थात त्याला आता अनेक वर्षं होऊन गेलीत. असो. बस सुरू झाली, टिंग टिंग घंटी वाजली आणि मी माझ्या भूतकाळात ब्लॅक अँड व्हाईट पिक्चरमध्ये दिसले. त्यात वर्ध्याचं एसटी स्टँड होतं, मामा, आई, तीन वर्षाचा माझा लहान भाऊ आणि सहा वर्षाची मी. त्यावेळेला बसमध्ये खचून गर्दी व्हायची, म्हणून मामा स्टेशनवर आम्हाला सोडायला यायचा. मला बस आवडते; पण तेव्हा फारशी आवडत नव्हती. बस आली, की सगळ्यांच्या चेहऱ्यावर एकच प्रश्नचिन्ह असायचं- ‘बसमध्ये जागा मिळते का?’ माझा मामा एअरफोर्समध्ये होता, त्यामुळे चपळशक्ती, शक्तिमान. तो खिडकीतूनच रुमाल, पिशवी फेकायचा- जेणेकरून तो बाक आमचा व्हायचा. आई गर्दीतून वाट काढत धक्कामुक्की सहन करत माझ्या भावाला कडेवर घेऊन आणि माझा हात घट्ट धरून ठेवायची. आम्ही कसेबसे आत शिरायचो. धूम्रपान करू नये या वाक्याखाली एखादा माणूस बिडी फुकत बसला, की मला मळमळायला लागायचं. कंडक्टर केव्हा एकदा ‘चला, जाऊद्या’ असं म्हणेल याची वाट मी पाहायचे. तुटलेल्या खिडकीतून येणारं वारं, दाटीवाटीने बसलेलो आम्ही, शिवाय रात्र झाल्यावर तो निळ्या रंगाचा गोल दिवा बसमध्ये लागायचा. खिडकीचा आवाज, त्यात कोणाच्यातरी घोरण्याचा आवाज मिसळायचा आणि मग बसच्या ब्रेकचा आवाज यांनी वातावरण भुताटकी वाटायला लागायचं.... आता सगळं बरंच बदललंय; पण ‘चला जाऊ द्या’, ‘थोडे सरकून घ्या’, ‘बोला, कुठे जायचंय’ हे शब्द आणि कंडक्टरकाकांचे खाकी कपडे काही बदलले नाहीत. 

आणखी लेख वाचण्यासाठी क्लिक करा

आताशा बसचा प्रवास फारसा होत नाही; पण लाल रंगाच्या एसटीची बस मला पाच वर्षं आधी जास्त आवडायला लागली, तेव्हा मी शूटिंगसाठी पुण्याहून मुंबईला बसनं जात असे. पहाटे पाचची बस पकडायची, साडेआठला कांदिवलीच्या पारवानी स्टुडिओत पोचायचं. नऊ ते रात्रीचे दहा शूट संपवून अकरा, साडेअकरा, बाराच्या मिळेल त्या बसनं परतीचा प्रवास. असं मी ‘होणार सून मी या घरची’ ही सिरीयल संपेस्तोवर केलं. एसटीची बस मला फारशी कधी आवडली नव्हतीच; पण मी एक नियम करून घेतला होता, की रात्रीचे दहा वाजून गेले, की परतीचा प्रवास फक्त एसटी बसनं करायचा. एकटी प्रवास करते आहे म्हटल्यावर कंडक्टरकाका मला त्यांच्या बाजूची राखीव सीट बसायला द्यायचे. बसल्यानंतर कंडक्टरकाकांचं ‘चला जाऊ द्या’ हे ऐकल्यावर मी एक छोटीशी झोप काढायचे- कारण माहिती असायचं, की आपण घरी पोचणार. कशी गंमत असते नाही. तिकीट काढायला गेलो, की तिकीट मिळेल का नाही याची चिंता; वेळेवर बस आली तर आनंद, नाहीतर वेळ झाली तरी बस आली नाही म्हणून घालमेल; बस आल्यावर बसण्याची घाई, अर्धा रस्ता पोचत नाही तर साधारण किती वाजता पोचू याचे उगाच अंदाज, घर जवळ यायला लागलं, की घरी काय करायचं त्याचे विचार. म्हणजे बसचा प्रवास होत असताना आपल्या विचारांचाही तितकाच, किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त वेगानं होत असलेला प्रवास आपण सगळेच अनुभवतो. कधी प्रवास सुखकर होतो, तर कधी निराशाजनक, दुःखद आणि अनपेक्षितही. प्रत्येक स्टॉपला कंडक्टरनं ‘चला जाऊ द्या’ म्हटल्यावर आपण विचारातून बाहेर येतो आणि आजूबाजूला काय चाललंय हे बघतो, परत वर्तमानात येतो. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मनात विचार आला, कंडक्टरना ‘चला, जाऊ द्या’ म्हणून कंटाळा येत नसेल का? पण खरं तर ‘चला, जाऊ द्या’ या शब्दातच खरं सुख आहे. इंग्लिशमध्ये आपण त्याला ‘लेट गो’ म्हणतो. म्हणजे धरून काहीच ठेवायचं नाही. २०२० हा काळ आपल्या सगळ्यांकरता एखाद्या न आवडलेल्या बसच्या प्रवासासारखा राहिलेला आहे. आपण त्यातून कधी उतरतो आणि कंडक्टर कधी म्हणतो ‘चला, जाऊ द्या’ याचीच वाट पाहत आपण थांबलेलो आहोत. २०२० या नंबरची बस वाकड्या तिकड्या वळणातून, खाच-खळग्यांतून, काटेरी रस्त्यातून मार्ग काढत २०२१ नंबरच्या बस स्टॉपवर पोचत आहे आणि आपण मात्र बसूनच राहिलो आहोत. आपलं लक्षच नाहीये, आपण आपल्याच विचारांमध्ये मग्न... 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

... अचानक बस कंडक्टरकाकांचा आवाज आला, ‘‘ओ ताई, आलं की तुमचं ठिकाण, उतरता आहात का चलता आहात बस यार्डात?’’ मी मनातल्या मनात म्हटलं, दादा उतरायचं आहे. २०२० नंबरच्या बसमध्ये कोणाला थांबावंसं वाटेल?’’ मी लगेच उतरले आणि कंडक्टरकाकांना, बसवर एक थाप मारून म्हटलं, ‘‘चला जाऊ द्या.’’


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: radhika deshpande write article about bus journey let go

Tags
टॉपिकस
Topic Tags: