वुमनहूड : प्रकाशाचा आशयघन उत्सव

वुमनहूड : प्रकाशाचा आशयघन उत्सव

दिवाळी जवळ आली, की हवेत गारवा येतो, एक वेगळाच उत्साह असतो. वातावरण प्रफुल्लित करणारं असतं. अशा चैतन्यमयी वातावरणात सकारात्मकतेची ऊर्जा अधिक प्रमाणात असते. आजूबाजूची माणसं आनंदी आणि हसरी वाटतात. हळूच एखादं फुलपाखरू डोळ्यांसमोरून उडून जातं, आजूबाजूची झाडं बहरलेली असतात. दूरवर असलेल्या रातराणीचा सुगंध आपल्यापर्यंत पोचतो. असं तुम्हालाही जाणवत असेल नाही? दसरा, वसुबारस, दिवाळी, पाडवा आणि भाऊबीज हे सण एकापाठोपाठ येतात. हे सण साजरे करण्यासाठी लागणाऱ्या भेटवस्तू, फराळ, दिवे आणि नवनवीन कपडे हे सारं काही गोळा करण्यात आपण सध्या व्यग्र असू.

लहानपणी मी माझ्या आजीला प्रश्न करायचे, की ‘हे सगळे सण आपण का, कशासाठी साजरे करतो त्यामागची कहाणी सांग.’ तर आजी मला फक्त गोष्टरूपात सांगून थांबायची नाही, तर त्यामागील अध्यात्मिक कारणसुद्धा ती मला समजावून सांगायची. उदाहरणार्थ, दसरा आपण का साजरा करतो, तर ‘दुर्जनांचा नाश आणि सज्जनांचा विजय’ हा क्षण साजरा करण्यामागचं अजून एक कारण आहे. वसुबारस या सणामध्ये आपण गाय आणि तिचं वासरू या दोघांची पूजा करतो. आपण गायीला मातेचं स्थान दिलेलं आहे. वात्सल्यरूपी गोमातेला आपण स्मरण करायचं असतं. वंदन करायचं असतं. त्यानंतर येते दिव्यांची दीपावली. अंधकारापासून प्रकाशाकडे नेणारा दिवा मनामनात उजळला पाहिजे. त्याची ज्ञानज्योत तेवत राहायला हवी आणि त्याच्या प्रकाशानं इतरांचं आयुष्य उजळायला हवं. ज्या ज्ञानाच्या प्रकाशानं आपला आत्मा उजळला आहे, त्या ज्ञानानं आपण इतरांना अंधकारातून प्रकाशाकडे न्यायला आहे. दिवाळीत दिवे लावण्याची भारतीय संस्कृतीची परंपरा आहे. भारतीय संस्कृतीत ‘मदर्स डे’, ‘फादर्स डे’, ‘ब्रदर्स डे’ असे दिवस नाहीत, तर सण आहेत जे आयुष्यभर साजरे केले जातात. वसुबारस, पाडवा, भाऊबीज हे सण उत्कट भावनांना वाचा फुटून प्रकट होण्यासाठीच. भारतीय संस्कृतीत प्रत्येक क्षणाला शास्त्रोक्त अर्थ आहेच; पण त्यामागे अध्यात्मिक अर्थसुद्धा दडलेला आहे. ही अंधश्रद्धा नव्हे. कुठलीही गोष्ट श्रद्धेनं करायला हवी ही भावना भारतीय संस्कृतीत पूर्वकालीन आहे. मग ते कर्म असो व पूजा. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आपल्या सणांचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याला हेच करायला पाहिजे ते करायला नको अशी कुठलीही जोर जबरदस्ती किंवा सक्ती नाही आणि यातच त्याचं सौंदर्य दडलेलं आहे. अमुक गोष्ट केली नाही किंवा २१ दुर्वा वाहिल्या नाहीत, तर आपला देव आपल्यावर कोपत नाही. तोही समजून घेतो. या वर्षी सरकारनं फटाके उडवण्यास मनाई केली आहे. प्रदूषण खूप होत आहे, त्यावर आळा घालायला हवा, हा त्यामागील उदात्त हेतू बघता आपल्या समाजातील अनेक लोक या निर्णयाचं स्वागतच करतील. भारतीय संस्कृती ही पुढारलेली आणि नवनवीन गोष्टी स्वीकारणारी आणि सातत्यानं बदलत राहणारी आहे आणि त्यामुळेच ती आजही टिकून आहे आणि यापुढेही राहील. आज आपण स्वतंत्र, बंधनमुक्त अशा वातावरणात वावरू शकतो. मला माझा देश, आपली संस्कृती, आपले  सण साजरे करावेसे वाटतात. इथं जगणं म्हणजे एक उत्सव आहे. आपण आपले सण मोठ्या उत्साहात, जल्लोषात, आनंदानं साजरे करायला हवेत- कारण त्यामागील कारणं ही समाजाला एकत्र आणण्यासाठी आहेत, शास्त्रीय आहेत आणि त्याला अध्यात्माची जोड आहे. आपण अशा संस्कृतीत राहतो जिथं इतरांचे सणसुद्धा तितक्याच आनंदानं साजरे करण्यात येतात. प्रश्न फक्त एकच राहतो. पिढ्यान् पिढ्या चालत आलेला सांस्कृतिक वारसा आपण पुढच्या पिढीला देण्याचं काम करतो आहोत का? संस्कृतीचं बीज आपण त्यांच्यात  पेरून त्याला खतपाणी घालतो आहोत का? आपले सण, त्यांचं महत्त्व, त्याच्यामागची कारणं त्यांना पटतील अशा भाषेत समजावून सांगतो आहोत का? हे एकदा तपासून पाहा.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

आमच्याकडची दिवाळी आम्ही नातेवाइकांबरोबर एकत्र मिळून साजरी करतो. सण साजरे करणे म्हणजे देव देव करत न बसता माणसातला देव ओळखून त्याची पूजा करणं, त्याला जोपासणं हेच खऱ्या अर्थानं सण साजरे करणं आहे. यंदाच्या दिवाळीत चित्र, मूर्ती, दगडरूपी देवापुढे नतमस्तक होऊन हजारो, लाखो आत्मरूपी दिव्यांना तेलाचं अर्घ्य देऊन आपण तेवत ठेवण्याची प्रार्थना करूया. देव सगळ्यात असतो. दिवाळी वर्षातून एकदाच येते. तेव्हा ती निश्चित साजरी करा. आवाज न करता जर ती एखाद्या दिव्याप्रमाणे शांत, स्तब्ध, स्थिर, ऊर्जात्मक, आशयघन साजरी करता आली, तर आजूबाजूची हवा, वातावरण आणि परिस्थिती तुम्हाला प्रतिबिंबात्मक वाटेल. हवेतील गारवा वाढत चालला आहे. उबदार दुलईत शिरायला हवं. दादा, ताई, मावशीनं चार वेळा हाक मारून झाली आहे. सगळे माझ्याबरोबरच फराळ करायला थांबले आहेत. जायला हवं. जाता जाता... 

परत एकदा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com