वुमनहुड : डोंगरावरचा राजकुमार! 

वुमनहुड : डोंगरावरचा राजकुमार! 

दूर डोंगरावर एक राजकुमार राहतो, सोनसळी रंगाचा अंगरखा घालून, डोक्यावर चुटुक लाल रंगाचा फेटा बांधून, गळ्यात मोत्यांची माळ घालून, हातात चांदीचं हिरे पाचू माणिक मोत्यांनी मढवलेलं कडं घालून तो पांढऱ्या शुभ्र घोड्यावर स्वार होऊन डोंगरावरील झऱ्याजवळ कविता करत बसलेला असतो. माझी आजी ‘डोंगरावरचा राजकुमार’ या गोष्टीची सुरुवात अशी करायची. तेव्हापासून मला वाटतं, की डोंगरावर खरंच एक राजकुमार असतो. खरंतर डोंगर साधू, संत, राजे राजवाड्यांचं ठिकाण. तिथं गोष्टीतला हा रंगीत, लोभस राजकुमार कसा यायचा, हे आजीलाच ठाऊक. 

मी गेली दोन वर्षं त्याचा शोध घेते आहे. मला डोंगर आकर्षित करतात. त्यांच्यावर चढून जाण्याचा चंगच बांधला आहे मी. नागमोडी, अनवट वाटा, पायथ्याशी असलेली ठाकरवाडी, तेथील झोपडीत असतात पेरू, चिंचा, कैऱ्या, बोरं आणि लिंबू सरबत. आज लॉकडाउननंतर पहिल्यांदा बाहेर पडले आहे आणि थेट घराजवळ असलेला डोंगर गाठला आहे. तिथूनच हा लेख लिहिते आहे. हवीहवीशी पायवाट, पावलोपावली छोटे मोठे दगडधोंडे, लपाछुपी खेळणारी सूर्याची किरणे, आणि पाठीवर बॅगेत असलेल्या वॉटर बॉटलमधल्या पाण्याचा छप छप आवाज हे सगळं अनुभवत मी प्रवास करत होते. गेल्या ५ वर्षांत मी लेह-लडाखपासून कन्याकुमारीपर्यंतचा प्रवास एकटीनंच केला आहे. पण, डोंगर चढणं मला नेहेमीच माझ्या मित्र-मैत्रिणींबरोबर करायला आवडतं. काही जण व्यायाम, छंद, आवड, अभ्यास, निसर्गप्रेम म्हणून पर्वतारोहण करतात, तर काही माझ्यासारखे कुठलंच कारण नसताना. डोंगर चढताना मी संवाद साधत असते. त्यावेळी अनेक विचार मनाला शिवून जातात, काही काल्पनिक, काही आठवणीतले, काही दंतकथेतले. पण काही विचार डोंगराच्या इच्छा, आकांक्षा आणि मनाचा वेध घ्यायला लावतात. मला आजूबाजूचे आवाज येत असतात, पण माझ्या आत एक वेगळंच गाणं तयार होत असतं. तिथल्या गोष्टी माझ्याशी बोलू लागतात. त्यांचं काहीतरी सांगणं, मागणं असतं. डोंगराच्या पलीकडं चांगल्या गोष्टी असतात म्हणे आणि त्यावर माझा भाबडा विश्वास असल्यामुळं मी मोजून लांब पावलं टाकीत चढते. पाऊल वाकडं पडतं, पाऊलखुणा उमटतात. पावलोपावली नवा अनुभव घेत, स्वतःचं ओझं उचलत मी वेडी वरच्या दिशेला कूच करते. अत्यंत सुंदर, जादू करणाऱ्या निसर्गाचा शोध मी घेत असते. आव्हान देणाऱ्या, धमकावणाऱ्या, अनियंत्रित अनुभवांचा ही मी शोध घेत असते. सुप्त क्षणांमधे मला जागृत करणारे काही क्षण येतात. माझ्या आतलं जग बाहेरच्या जगाशी मग लपाछुपी खेळतं. मला काही प्रश्न पडतात.

एखादी अनोळखी अज्ञात झाडाची फांदी मला उत्तर देऊन जाते. निःशब्द झालेली मी त्यांच्याकडे एकटक बघू लागते. इतके दिवस मी शोधत असलेल्या “असं का?”चं उत्तर मला इतकं सहजरित्या मिळतं की, अलगद माझ्या गालावर हसू फुटतं. मैत्रीण विचारते, “हसतेस कशाला?” तर मी “झाडावरच्या फांद्यांइतकेच मेंदूतल्या विचारांना फाटे फुटताहेत,” असं काहीसं उत्तर देते. तिच्या डोक्यावरून जाणाऱ्या फुलपाखराकडे माझं लक्ष जातं आणि मनोमन असंख्य काल्पनिक फुलपाखरांना कवेत घेऊन मी पुढचा प्रवास सुरु करते. 

मला डोंगर चढण्याचा प्रवास नाट्यमयी वाटतो. आजूबाजूला नाट्य घडत असतं आणि आपल्या मनाचे पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या अंकासारखे पडदे उघडत जातात. स्वतःशीच पैजेचा विडा घेऊन आपण आडमार्ग शोधत, मोठी जोखीम पत्करत चढत असतो. डोंगरावर पोचताच आत्मानंदाचा क्षण येतो. जरा वेळ निवांत झऱ्यापाशी बसते, वाहत्या पाण्याबरोबर लेख पूर्ण करते आणि उतरते. असंख्य दगडांच्या एकमेकांना धरून ठेवण्याच्या इच्छाशक्तीतून जन्माला आलेले हे थंडगार भासणारे डोंगर. खरंतर ह्या डोंगरांना आपल्याकडून काहीच नको आहे. गरज असते ती आपल्याला. त्यांच्या मोठेपणामुळं चढून आलेल्या उद्धट, माजोरड्या लोकांचं मतपरिवर्तन होतं. हत्तीच्या पावलांनी डोंगर आपल्यावर चालून आल्यास आपलं अस्तित्व धोक्यात येईल, पण तो त्याचं वात्सल्य जपतो. मी डोंगराकडची वाट का धरते ह्याचा शोध मी अजूनही घेते आहे. कदाचित व्यग्रता आणि निवांतपणा ह्यांची सांगड घालायची असते. स्वतःचं दुःख जड वाटलं की, उंच डोंगरावर ते हलकं वाटायला लागतं. डोंगर चढत असताना इतरांबरोबर सहकार्य, सुसंवाद साधणं शक्य होतं. अश्या वेळेस मी कलाकार नसून प्रवासी होते. 

आता मात्र उतरायला हवं. ऊर भरून एक दीर्घश्वास घेते आणि कमलपत्राप्रमाणे अलिप्त, साक्ष, अनासक्त होऊन मी खाली उतरते. तुम्ही म्हणाल त्या राजकुमाराचं काय? खरंतर तो पाचही इंद्रियांनी, पंचकोषातून बनलेला असल्यास तो अद्याप अदृष्य आहे. सध्यातरी तो मला सूक्ष्म अणुरेणू, झाडं, पानं, फुलांमध्ये लाजऱ्या मुद्रेत भासतो. जिज्ञासा आणि क्रीडाप्रवृत्तीमुळं मी त्याला भेटायला परत डोंगरावर येते. प्रेम, वात्सल्य आणि त्याही पलीकडं जाऊन भक्तिरूपात मी विलीन असेन, तेव्हा तो नक्की प्रकटेल. आजी राजकुमाराची गोष्ट सांगत असताना आम्ही डोंगरावर पोचल्या पोचल्या मला नेहेमीच शांत झोप लागली आहे, हे मात्र नक्की. त्यामुळं गोष्टीतल्या राजकुमाराच्या शोधात मी आजही आहे, कारण दूर डोंगरावर एक राजकुमार राहतो! 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com