esakal | सौंदर्यखणी : अद्‍भुत ‘रास्ता’
sakal

बोलून बातमी शोधा

सौंदर्यखणी : अद्‍भुत ‘रास्ता’

सौंदर्यखणी : अद्‍भुत ‘रास्ता’

sakal_logo
By
रश्मी विनोद सातव

होळकर साम्राज्याच्या राजमाता अहिल्याबाई होळकर यांनी, त्यांचे यजमान खंडेराव होळकर यांच्या निधनानंतर इंदूर संस्थानाच्या राज्यकारभाराची सूत्रं हाती घेतली आणि त्यांची राजधानी १७६५ मध्ये इंदूरहून नर्मदेकाठी महेश्वरला विस्थापित केली. अहिल्याबाईंनी सूत्र हाती घेण्याच्या आधी तिथल्या हातमागावरील छोट्याशा वस्त्रोद्योगाला अवकळा आली होती; पण अहिल्याबाई होळकरांनी सुरत आणि आजूबाजूच्या मालवा प्रांतातून काही विणकर बोलावून त्यांना महेश्वरमध्ये वसवले. खुद्द अहिल्याबाईंनी जातीने लक्ष घालून विणकरांकडून हातमागावर वेगवेगळ्या साड्या विणून घेतल्या. त्यातील काही साड्या महेश्वरी नावाने ओळखल्या जाऊ लागल्या, तर काही ‘इंदुरी साड्या’ म्हणून प्रचलित झाल्या. या साड्यांवरील नक्षीकामात होळकर राजवाड्याच्या दगडी भिंतींवरील कोरीवकामाचा मोठा प्रभाव दिसून येतो. त्या काळात विणल्या जाणाऱ्या साड्यांमधली एक खास साडी आपण पाहणार आहोत. तिचे नाव आहे- ‘रास्ता इंदुरी साडी.’

‘रास्ता’ साडीत पूर्वीपेक्षा आता बरेच बदल झाले आहेत. पूर्वीच्या काळात या ‘रास्ता इंदुरी साड्या’ नऊ, दहा किंवा अकरा वारांमध्ये विणल्या जात असत आणि उंचीलाही भरपूर असत. ‘रास्ता इंदुरी लुगडे’ नावाने ओळखली जाणारी ही साडी उच्चभ्रू घराण्यातील स्त्रिया खऱ्या सोन्याच्या जरीत आवर्जून बनवून घेत असत. या संपूर्ण साडीवर आडव्या बारीक जरीच्या रेषा असतात आणि म्हणूनच कदाचित ही साडी ‘रास्ता’ या नावाने ओळखली जात असावी. हातमागावर ताणून लावलेले उभे धागे म्हणजे ‘ताना.’ साडी विणताना या ‘तान्या’मध्ये रेशमाच्या धाग्यांबरोबर खऱ्या जरीचे धागे, जवळजवळ अंतरावर लावून घेतले जात असत आणि ‘बान्या’त म्हणजे आडव्या धाग्यांमध्ये उच्च दर्जाचे तलम आणि टिकावू सूती धागे टाकून ही ‘गर्भरेशमी रास्ता साडी’ विणली जात असे. जरीच्या बारीक धाग्यांमुळे साडीभर बारीक रेषा तयार होऊन खास ‘टेक्श्चर’चा भास होत असे. सिल्कच्या धाग्यांमधून डोकावणाऱ्या साडीभर पसरलेल्या बारीक जरीमुळे ती साडी अतिशय सुरेख दिसत असे. अलीकडच्या काळात बनवल्या जाणाऱ्या ‘टिश्यू’ साड्यांची कल्पना याच साडीवरून घेतली असावी असे वाटते.

इंदूर संस्थानात, ठिकठिकाणी महाराष्ट्रीयन कलेचा प्रभाव पडलेला दिसतो. होळकरांच्या राजवाड्यावरील कोरीवकाम महाराष्ट्रातील मंदिरांवरील कोरीवकामाशी मिळतेजुळते आहे आणि याचा प्रभाव थेट तिथे विणल्या जाणाऱ्या साड्यांवर दिसून येतो. तेव्हाच्या ‘रास्ता’ साडीचे काठसुद्धा पैठणीशी मिळते जुळते होते. पैठणीच्या पारंपरिक ‘नारळी बॉर्डर’सारखेच ‘रास्ता साड्यांचे’ काठ असून रुंदीला पैठणीच्या काठांपेक्षा जरासे कमी होते. शिवाय या साडीचा पदर पूर्ण भरजरी असून पदराचे उभे आणि आडवे दोन्ही धागे जरीचे असत. अलीकडच्या काळात विणल्या जाणाऱ्या ‘रास्ता’ साडीच्या काठा-पदरामध्ये वेगवेगळे प्रयोग दिसून येतात. परंतु, काही अभ्यासू विणकरांचे, ‘ओरिजिनल रास्ता साडी’ला त्याच रंगरूपात पुनरुज्जीवन देण्याचे प्रयत्न चालू आहेत.

या ‘रास्ता साड्या’ खूप सुंदर ‘ड्रेप’ होत असत. लांबी रुंदीला मोठ्या असलेल्या या साड्यांचा पदर डोक्यावरून घेऊन पुढे खांद्यावरून खाली लांबलचक उरत असे, त्यामुळे या साड्या म्हणजे ‘खानदानी सौंदर्य’ होतं. काही ‘रास्ता साड्या’ आजही काही घराण्यांमध्ये जतन करून ठेवलेल्या आढळतात. आश्चर्य म्हणजे इतक्या वर्षांत त्या साड्या जराही विरल्या नाहीत...विरल्या आहेत त्या फक्त, त्या साडीच्या आठवणी.

आजीची सुगंधी साडी

पूर्वाश्रमीची चिन्मयी सुर्वे मूळची औरंगाबादची; पण शिकायला पुण्यात एसपी कॉलेजमध्ये होती. कॉलेजमध्ये पहिल्या ‘पुरुषोत्तम’मध्येच तिला त्या वर्षीचा, ‘सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार’ मिळाला. मुंबईत चंद्रकांत कुलकर्णी तेव्हा मोहन वाघांसाठी ‘ज्वालामुखी’ हे व्यावसायिक नाटक करत होते आणि त्यांनी लगेच चिन्मयीला त्या नाटकात घेतलं. याच नाटकाच्या दरम्यान चिन्मयीची आणि सुमित राघवनची ओळख झाली. ते दोघं प्रेमात पडले आणि ‘चिन्मयी सुर्वे’ - ‘चिन्मयी सुमित’ झाली. ‘ज्वालामुखी’तून सुरू झालेलं तिचं करिअर पुढे अनेक दर्जेदार नाटकं, सिनेमे आणि मालिकांमधून एका उंचीवर गेलं. तिच्या समृद्ध जीवनात तिच्या कुटुंबाचा आणि आजोळचाही मोठा वाटा आहे.

चिन्मयीचं आजोळ म्हणजे कर्नाटकातील संस्थानिक - ‘जलालपूरकर-देशपांडे घराणं.’ तिच्या आजोळचा दीडशे वर्षं जुना चौसोपी वाडा आजही तिथं उभा आहे. पाच मावशा आणि दोन मामांची मुलं अशी चिन्मयीला एकूण बावीस भावंडं. चिन्मयी आणि तिची एक मावसबहीण सर्वांत लहान असल्यानं प्रमिलाआजीची म्हणजे ‘चिन्मयीच्या आईच्या आईची’ त्यांच्यावर विशेष माया होती. या आजीच्या आईचे वडील म्हणजे ‘कर्नाटक केसरी- गंगाधरराव देशपांडे’, हे महात्मा गांधीजींचे कट्टर अनुयायी होते. एकदा गांधीजी ‘स्वातंत्र्य लढ्यासाठी’ पैसा उभा करण्यासाठी आपला पंचा झोळीसारखा पसरून जनतेकडे निधी मागत होते. तेव्हा प्रमिला आजोबांसोबत तिथंच होती. भारावलेल्या प्रमिलेनं आपल्या हातातल्या सोन्याच्या बांगड्या सर्रकन काढून महात्माजींच्या झोळीत टाकल्या होत्या. अशा या प्रमिला आजीला एकदा मध्य प्रदेशातून आलेल्या एका व्यापाऱ्याकडून तिच्या यजमानांनी एक आमसुली रंगाची, ‘दहा वार रास्ता साडी’ घेतली. तिच्या भरजरी पदरावर आणि संपूर्ण साडीवर खऱ्या जरीचे धागे विणलेले होते. त्या अप्रतिम साडीच्या, प्रमिला मनापासून प्रेमात पडली.

उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये चिन्मयी आणि तिची बहीण आजीच्या मागेमागे चैत्रातील हळदी-कुंकवांना जात असत. त्यावेळी आजी, ती रास्ता साडी नेसत असे. त्यावर मोत्यांची नथ, मंगळसूत्राबरोबर आठ पदरी कंठीची सोन्याची माळ आणि अंबाड्यात सोनचाफ्याची फुलं. आजी, त्या साडीचा घोळदार ओचाही काढत असे आणि त्याला गंमतीनं तिचा ‘खिसा’ म्हणत असे. जायच्या काही दिवस आधी आजीनं तिच्या सगळ्या मुलांना तिच्या वस्तू, एकेकाला भेट म्हणून दिल्या होत्या. तेव्हा ही रास्ता साडी आणि कंठीची माळ चिन्मयीच्या आईकडे आली. चिन्मयीच्या आईनं पुढे त्या साडीची सहावार साडी केली आणि उरलेल्या कापडात ब्लाऊज आणि चिन्मयीसाठी कुर्तादेखील शिवला. सत्तर-ऐंशी वर्षांपूर्वीची ती साडी चिन्मयीकडे अजूनही जतन करून ठेवली आहे आणि विशेष म्हणजे ती साडी जरासुद्धा विरली नाहीये.

चिन्मयी ती साडी बऱ्याचदा नेसते. या लेखाच्या निमित्तानं तिनं ती साडी नेसून आणि आजीनं दिलेली कंठीची माळ घालून खास फोटो काढले. चिन्मयी म्हणाली, ‘‘खूप वर्षांपूर्वी माझ्या आईनं, आजीला तिच्या साड्यांमध्ये ठेवण्यासाठी ‘सॅटीनच्या चंदनाच्या पुड्या’ दिल्या होत्या, त्या चंदनाचा सुगंध अजूनही साडीला येतो. जेव्हा जेव्हा मी ती साडी नेसते तेव्हा तेव्हा मी आजीची माया पांघरते आणि आजीच्या आठवणींचा सोहळा साजरा करते!’

loading image