सौंदर्यखणी : कलेचा शिक्का : ‘बगरू साडी’

बगरू प्रिंटिंगसाठी लाकडाचे छाप वापरले जातात. हे कारागीरही या गावात अनेक वर्षांपासून शिसवी लाकडाच्या ठोकळ्यांवर कोरीवकाम करून सुंदर छाप बनवत आहेत.
Prajakta Mali
Prajakta MaliSakal

राजस्थानमध्ये नैसर्गिक स्रोतांची कमतरता असूनदेखील वर्षानुवर्षे नैसर्गिक घटकांचा मोठ्या कल्पकतेने वापर होत आला आहे. उपलब्ध साधनसामुग्रीतून राजस्थानमध्ये अनेक कला जन्माला आल्या आणि जोपासल्या गेल्या, त्यातीलच या ‘बगरू प्रिंट साड्या’! जयपूरजवळ ३२ किलोमीटरवर बगरू हे छोटेसे गाव. या गावात साधारण ४०० ते ५०० वर्षांपूर्वीपासून ‘छिपा’ समाजाचे लोक हाताने कापडावर ‘ब्लॉक-प्रिंटिंग’ करत आले आहेत. हाताने छापणारे म्हणून त्यांना ‘छिपा’ हे नाव पडले. या गावातल्या प्रिंटला ‘बगरू प्रिंट’ म्हणतात.

बगरू प्रिंटिंगसाठी लाकडाचे छाप वापरले जातात. हे कारागीरही या गावात अनेक वर्षांपासून शिसवी लाकडाच्या ठोकळ्यांवर कोरीवकाम करून सुंदर छाप बनवत आहेत. या छापांमध्ये निसर्गातील घटकांचा आणि भौमितिक आकारांचा कलात्मक वापर केलेला दिसतो. काही कुटुंबांतील छाप तर पुढच्या पिढ्याही वापरत आहेत. हे छाप नैसर्गिक रंगात बुडवून साड्यांवर दाब देऊन छापले जातात. वेगवेगळ्या नैसर्गिक फॅब्रिकवर बगरू प्रिंट केले जाते. कॉटनच्या बगरू साड्यांसाठी उच्च प्रतीचे मलमल-कॉटनचे पांढरे कापड वापरले जाते. त्यातील स्टार्च घालवण्यासाठी आधी कापड धुवून नंतर हिरड्याच्या पावडरच्या पेस्टमध्ये बुडवून वाळवून घेतले जाते. त्यामुळे कापड ‘ऑफ-व्हाईट’ होते आणि हिरड्यामुळे पुढचे रंगही व्यवस्थित बसतात. मग ही साडी लांबलचक टेबलवर पसरवली जाते आणि मग सुरू होते ब्लॉक-प्रिंटिंग.

यासाठी तीन प्रकारचे छाप वापरले जातात. ‘रेख-छापा’ने डिझाईनची फक्त आऊटलाईन छापली जाते. ही आऊटलाईन काळ्या किंवा लाल नैसर्गिक रंगात छापली जाते. हे कारागीर काळ्या रंगाला ‘शाई’ आणि लाल रंगाला ‘बेगर’ म्हणतात. हे रंगही निसर्गातील घटकांपासून तयार केले जातात. काळी शाई तयार करण्यासाठी पाण्यात गंजलेलं लोखंड आणि गूळ एकत्र करून मोठ्या ड्रममध्ये त्यावर तारीख टाकून महिनाभर ठेवतात. पाण्यात गूळ आणि लोखंडाची प्रक्रिया होऊन गडद काळ्या रंगाची दाट शाई तयार होते. लाल रंगासाठी झाडावर मिळणारा डिंक, तुरटी आणि गेरू एकत्र करून त्याची दाटसर पेस्ट केली जाते. ‘रेख-छापा’ने आऊटलाईन काढून झाल्यानंतर गरजेनुसार ‘गद-छाप’ वापरले जातात. या छापांद्वारे डिझाईनची बॅकग्राउंड भरून घेतली जाते आणि मग रंग पूर्ण वाळवून, साडी साध्या पाण्यात धुवून परत वाळवून घेतली जाते.

पुढच्या प्रक्रियेत लाकडाची चूल पेटवली जाते. चुलीवर तांब्याच्या मोठ्या हंड्यात उकळत्या पाण्यात चिंचेची फुले (स्थानिक भाषेत ‘धवाईची फुले’) आणि थोड्या प्रमाणात ‘अलझरीन’ पदार्थ टाकला जातो. ‘अलझरीन’मुळे साडीवरील काळ्या किंवा लाल शाईवर प्रक्रिया होऊन ते रंग पक्के आणि गडद होतात आणि चिंचेच्या फुलांमुळे नक्षीच्या आजूबाजूला जास्तीचा लागलेला रंग निघून जायला खोडरबराप्रमाणे मदत होते. एकावेळेस जास्तही साड्या उकळल्या जातात आणि मधूनमधून लाकडाच्या बांबूने त्या ढवळून घेतल्या जातात. अंदाजे अडीच तासानंतर साड्या बाहेर काढून, निथळून पूर्ण वाळवल्या जातात.

पुढच्या टप्प्यात, साड्यांवर दुसरे रंग हवे असल्यास ‘दाबू प्रिंटिंग’ केले जाते. इथे ‘दाबू-दट्टा छाप’ नावाचे तिसऱ्या प्रकारचे छाप वापरतात. प्रिंटिंग करण्यासाठी आधी ‘दाबू पेस्ट’ करून घेतली जाते. पाण्यात काळी माती, चुना, झाडावरचा डिंक आणि खराब झालेल्या गव्हाची पावडर किंवा कोंडा एकत्र करून दाटसर वस्त्रगाळ पेस्ट करून घेतली जाते. या पेस्टमध्ये ‘दाबू-दट्टा छाप’ बुडवून छापले जातात. नक्षीच्या ज्या जागी पुढचा रंग नको असतो, त्या जागी छापानुसार ही पेस्ट लागली जाते. याला ‘रेझिस्ट प्रिंटिंग’ म्हणतात, ज्या जागी ही पेस्ट असते त्या जागी पुढच्या रंगाला शिरकाव नसतो. मग ही पेस्ट एकमेकांना चिकटू नये म्हणून त्यावर लाकडाचा बारीक भुस्सा टाकला जातो. नंतर साडी दोन दिवस तशीच ठेवून दिली जाते. मग ‘इंडिगो’ किंवा ‘कशिश’सारख्या किंवा इतर मानवनिर्मित रंगात बुडवून संपूर्ण साडी डाय करून घेतली जाते. त्यानंतर पुन्हा साध्या पाण्यात साडी धुतली जाते, धुण्यात दाबू पेस्ट निघून जाते आणि आतील सुंदर नक्षी दिसू लागते. साडीत जितके रंग असतात तितक्या वेळा ही प्रक्रिया करावी लागते.

हे कारागीर पाणी रि-सायकल करून वापरतात. अत्यंत कष्टाचे हे काम ‘छिपा’ कुटुंबांमधून पिढ्यान्‌पिढ्या चालू आहे. अशाच एका कुटुंबातील सहाव्या पिढीतील दिनेश छिपा स्वतः फॅशन डिझायनर आणि आर्टिस्ट असून, हे काम ते ‘नॅशनल ॲवॉर्ड’ मिळालेले त्यांचे आजोबा सीताराम छिपा आणि वडील शामबाबू छिपा यांच्यासोबत आजही अत्यंत कल्पकतेने करत आहेत. दिनेशजी म्हणाले, ‘‘इतके कष्टाचे काम करणारे लोक आता कमी झाल्यामुळे काही जण आता ब्लॉक-प्रिंटिंगऐवजी ‘स्क्रीन प्रिंटिंग’ने या साड्या तयार करत आहेत. आम्ही मात्र पारंपरिक पद्धतीने बगरूची ओळख असलेल्या ‘हँड ब्लॉक प्रिंटिंग’च्याच साड्या बनवत आहोत.’’

‘कॉटनप्रेमी’ प्राजक्ता

प्राजक्ताच्या फुलांच्या सड्याप्रमाणे, प्राजक्ता माळीचं लक्षात राहणारं ‘टपोरं हास्य’ म्हणजे पारिजातकाच्या झाडाखाली भरलेली ‘हास्यजत्रा’ वाटते. प्राजक्ताच्या अँकरिंगला, नृत्याला आणि अगदी तिच्या ‘दाद देण्यालाही’ दाद द्यावीशी वाटते. ‘स्टारप्रवाह’वरील ‘सुवासिनी’ या मालिकेतून सुरू झालेला तिचा प्रवास, झी मराठीवरील ‘जुळून येती रेशीमगाठी’ मालिकेमुळे अधोरेखित झाला आणि नंतर सोनी टीव्हीवरील ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’मधून तिनं लोकप्रियतेची एक उंची गाठली.

कॅमेरासमोर ती जेवढी सहज वावरते, तेवढीच सहज ती खऱ्या आयुष्यातही वावरत असते. पंढरपूरमध्ये जन्म झालेल्या प्राजक्ताच्या आवडी-निवडीसुद्धा साध्या राहणीमानाला साजेशा. प्राजक्ता म्हणाली, ‘‘या क्षेत्रात मला नेहमी ग्लॅमरस राहावं लागतं; पण इतर वेळेस मला मोकळे ढाकळे- ढिले कपडे जास्त आवडतात. घरात, प्रवासात आणि शूटिंग नसताना इतर वेळेस मी फक्त कॉटनच वापरते. साडी हा माझा सर्वांत आवडता पेहेराव. स्त्रीचं सौदर्य साडीत अजूनच खुलतं. त्यात ती कॉटनची साडी असेल तर सोन्याहून पिवळं! माझ्याकडे कॉटनच्या साड्यांचं मस्त कलेक्शन आहे. शिवाय आपण विषुववृत्तीय प्रदेशात राहतो, अशा ठिकाणी राहणाऱ्या लोकांनी तर खास कॉटनच वापरावं!’’

या कॉटन-प्रेमी प्राजक्ताला तिच्या एका ‘ड्रेस डिझायनर’नं एक सुंदर पिवळ्या रंगाची बगरू प्रिंटची साडी आणि त्यासोबत सुंदर ईकतचं काळ्या रंगाचं ब्लाऊज भेट दिलं. त्या डिझायनरची इच्छा होती, की प्राजक्तानं ती साडी ‘हास्यजत्रेच्या’ एका एपिसोडला नेसावी आणि प्राजक्तानं खरंच एका एपिसोडला ती नेसली. सुंदर ड्रेप होणाऱ्या त्या सोनसळी पिवळ्या साडीवर ‘ईकत’चं ते काळं ब्लाऊज सुरेख दिसत होतं. त्या ‘डिसेंट’ साडीमध्ये प्राजक्ता खूप ग्लॅमरस दिसत होती, सेटवर सगळे तिला ‘हॉट अँड स्वीट’ म्हणत होते. प्राजक्ता, साडी हा प्रकार खूप ‘ग्रेसफुली’ कॅरी करते. हास्यजत्रेच्या सेटवर तिनं त्या दिवशी पहिल्यांदाच कॉटनची साडी नेसली होती, म्हणून सेटवर सगळे तिला ‘शिक्षिका’ म्हणत होते. पिवळ्या-काळ्या कॉम्बिनेशनमुळे समीर चौगुले तर तिला गंमतीनं ‘मुंबईची टॅक्सीवाली’ म्हणत होता. प्राजक्ताला ती साडी इतकी आवडली होती, की तिनं सेटवर ती खूप मिरवली आणि खास फोटो शूटही करून घेतलं. प्राजक्ताचं ते कॉटन-प्रेम बघून, पुढे ‘हास्यजत्रेचे’ अजून दोन एपिसोड्स तिच्या वेगवेगळ्या कॉटन साड्यांमध्ये शूट झाले.

प्राजक्ताचं हे ‘कॉटन प्रेम’ कदाचित लहानपणापासून असावं... तिच्या आजीच्या वापरलेल्या मऊसुत नऊवार साड्यांच्या- तिच्या आजीनंच शिवलेल्या गोधड्यांशिवाय तिला लहानपणी झोप येत नसे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com