esakal | सौंदर्यखणी : ‘बांधणी’च्या अन् ऋणानुबंधांच्याही ‘गाठी’
sakal

बोलून बातमी शोधा

Vishakha Subhedar

सौंदर्यखणी : ‘बांधणी’च्या अन् ऋणानुबंधांच्याही ‘गाठी’

sakal_logo
By
रश्मी विनोद सातव

गुजरात-राजस्थानमधील गावागावांमधून ‘बांधणी-काम’ येत असलेल्या स्त्रिया, घरातले काम उरकले, की लगेच कापडावर ‘बंधेज’ काम करायला बसतात. अत्यंत चिकाटीचे आणि कौशल्याचे असणारे हे काम या कष्टाळू स्त्रिया तासन्‌तास करत राहतात. या कलेला इतिहासही खूप जुना आहे. बांधणी कापड ज्या नैसर्गिक रंगात रंगविले जाते, त्याच पद्धतीचे नैसर्गिक रंग हजारो वर्षांपूर्वी सिंधू नदीच्या खोऱ्यातील वसाहतींमध्ये वापरले जात असल्याचे दाखले मिळाले आहेत. शिवाय अजिंठा लेण्यांमध्ये काढलेल्या सहाव्या शतकातील बुद्ध जीवनावर आधारित चित्रांमध्ये बांधणी कलाप्रकार दिसून येतो. अलेक्झांडरच्या कालखंडातील प्रवासवर्णनांमध्ये ‘बांधणी-कॉटन’चा उल्लेख - ‘भारतातील अतिशय सुरेख कॉटन’ असा केलेला आढळतो. कॉटनबरोबरच सिल्क, मसलिन, क्रेप, सिफॉन इत्यादी प्रकारांमध्येही बांधणी साड्या बनतात. सिंथेटिक कापडावर मात्र बांधणीकाम केले जात नाही- कारण ते कापड ‘डाय’ होत नाही.

बांधणी साड्या बनवताना सर्वांत आधी साडीसाठी योग्य कापडाची निवड होते, मग ते कापड धुवून, ब्लीच केले जाते, जेणेकरून नंतर ती साडी वेगवेगळ्या रंगात ‘डाय’ करतांना, ते रंग व्यवस्थित साडीवर चढतात. वाळल्यावर साडी इस्त्री करून ताणून बसवली जाते. त्यावर ‘ट्रेसिंग शीट्स’ ठेवले जातात. हे प्लॅस्टिकचे मोठे शीट्स असतात आणि त्यावर ठरवलेल्या डिझाईननुसार बारीक छिद्रे पाडलेली असतात. त्या शीट्सवरून इंडिगो किंवा गेरूचा वापर केलेल्या शाईचा बोळा फिरवला जातो, त्यामुळे खालच्या साडीवर, शीट्सवरच्या छिद्रांमुळे डिझाईननुसार डॉट्स छापले जातात. याच एकेका डॉटवर हाताने बांधणीकाम केले जाते, त्यामुळे ठरवलेले डिझाईन, बांधणीकामातून साडीवर उतरते. तो डॉट आणि त्याच्या आजूबाजूचे किंचितसे कापड बोटांच्या नखाने उचलले जाते आणि भोवती नायलॉनमिश्रित किंवा कॉटनचा धागा घट्ट गुंडाळला जातो आणि पोटलीसदृश गाठी बांधल्या जातात. या पोटलीसदृश गाठींमध्ये अनेक प्रकार आहेत. साडीला विशिष्ट प्रकारच्या घड्या घालून किंवा मणी, मोती, नाणी, डाळी, जाड दोरा इत्यादी वस्तू साडीवर डिझाईनप्रमाणे ठेवून त्याला दोऱ्याने घट्ट गाठी मारल्या जातात. अतिशय कल्पकतेने या गाठी मारून, वेगवेगळे पॅटर्न साडीवर घेतले जातात. बारीक डिझाईन असेल, तर एक मीटरसाठी अंदाजे १००० गाठी माराव्या लागतात. गाठी जितक्या जास्त, तितकी त्या साडीची किंमत जास्त. गाठी मारून झाल्यानंतर साडी हव्या त्या रंगात बुडविली जाते. साडी आधी फिक्या रंगात ‘डाय’ केली जाते आणि मग एकेक करून गडद रंगात साडी ‘डाय’ होते. पहिल्या रंगात ‘डाय’ करून झालेली साडी पहिल्या गाठी न सोडता वाळवून घेतली जाते. मग हा पहिला रंग जिथे जिथे हवा आहे तिथे परत दुसऱ्या गाठी मारल्या जातात आणि परत पुढच्या रंगात साडी ‘डाय’ केली जाते. अशा प्रकारे जितके रंग एखाद्या बांधणी साडीत आहेत तितक्या वेळा ही प्रक्रिया परतपरत केली जाते. शेवटच्या रंगात ‘डाय’ करून झाल्यानंतर साडी पूर्ण वाळवली जाते.

दोरे सोडणे आणि साडी पूर्ण उलगडणे हे कामही हे लोक मोठ्या कौशल्याने करतात. एकेक दोरा न सोडता साडीला विशिष्ट प्रकारे आणि ठराविक प्रमाणात ताण दिला जातो, त्यामुळे ते दोरे तटातट तुटतात आणि आतील कलाविष्कार बाहेर डोकावू लागतो. साडी उलगडल्यानंतर ती नक्षी पाहून बंधेज कलाकारांच्या चेहऱ्यावर जे समाधानाचे हसू उमटत असेल त्यात त्यांचे कष्ट विरून जात असतील.

अतिशय सुंदर रंगात तयार होणाऱ्या या साड्यांची लोकप्रियता फक्त गुजरात-राजस्थानपुरती मर्यादित न राहता देशभरात आणि देशाबाहेरही पसरली आहे.

कच्छमधील बांधणी

गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील लालबुंद आणि मरून रंगाच्या बांधणी प्रसिद्ध आहेत. कच्छमधील विहिरींच्या पाण्याला विशिष्ट गुणधर्म आहे आणि त्या विहिरींचे पाणी वापरून लाल बांधणी साडीचे रंग बनविले जातात, तेव्हा त्या लाल रंगाची शेड त्या साड्यांवर छान चढते, असा विश्वास कच्छच्या बंधेज कलाकारांना आहे. गुजरात-राजस्थानमध्ये ही बांधणी, नवऱ्या मुलीसाठी शकुनाची मानली जाते.

दोन रेशमी गाठोडी

‘टेन्शनवरची मात्रा, हास्य जत्रा!’ असं कानावर पडतं तेव्हा पहिलं स्किट आठवतं ते विशाखा सुभेदार आणि समीर चौगुले यांचं. विशाखा म्हणजे विनोदाचं असं अजब रसायन आहे, की लॉकडाऊनसारख्या कठीण काळात तिनं आपल्याला मनमुराद हसत ठेवलं. लहानपणी ‘भरतनाट्यम’चं प्रशिक्षण घेतलेल्या विशाखाला अभिनयाचीसुद्धा लहानपणापासूनच प्रचंड आवड होती; परंतु मनोरंजन क्षेत्रात तिचा प्रवेश लग्नानंतर झाला. तिचे यजमान महेशजी स्वतः डबिंग आर्टिस्ट, अभिनेता आणि दिग्दर्शक असल्यामुळे विशाखाला आवड जोपासायला पूरक वातावरण मिळालं आणि ती या क्षेत्रात आली आणि अफाट लोकप्रिय झाली. दर्जेदार विनोदी अभिनय हा सर्वांत कठीण समजला जातो, ज्याच्यावर विशाखाचं जबरदस्त प्रभुत्व आहे. या तिच्या अभिनयावर फिदा होऊन अभिनेत्री रेखा यांनी तिला एक सुंदर कांजीवरम भेट दिली. ‘सुपरनानी’ या चित्रपटात विशाखा, रेखाजींबरोबर काम करत होती आणि विशाखाच्या कामाच्या आणि स्वभावाच्या रेखाजी चक्क प्रेमात पडल्या होत्या.

शूटिंगच्या शेवटच्या दिवशी रेखाजींनी विशाखाला आपल्या ‘व्हॅनिटी व्हॅन’मध्ये बोलावून घेतलं आणि प्रेमाखातर एक सुंदर रेशमी गाठोडं विशाखाच्या हातात ठेवलं. आश्चर्यचकित झालेल्या विशाखानं नकळत ते गाठोडं उघडलं, तर आत एक सुंदर रेशमी कांजीवरम तिच्याकडे डोकावून पाहत होती. रेखाजींनी आपल्या खजिन्यातली एक खास कांजीवरम विशाखाला भेट दिली होती आणि त्यासोबत रेखाजींचा एक जुना दुर्मीळ फोटो आणि त्या फोटोच्या मागे स्वतःच्या हस्ताक्षरात विशाखाच्या कामाचं कौतुक करणारा एक खास मेसेज होता. विशेष म्हणजे रेखाजींनी विशाखाशी मराठीतून खूप गप्पा मारल्या. विशाखासाठी हे सगळं स्वप्नवत होतं. ती ते रेशमी मौल्यवान गाठोडं घेऊन, ‘ही साडी कोणत्या खास प्रसंगाला नेसू...’ असा विचार करतच घरी परतली. गंमत म्हणजे आजतागायत खास प्रसंगाची वाट बघत ती साडी अजूनही त्या रेशमी गाठोड्यातच आहे. अशीच एक रेशमी भेट तिला नंतरही मिळाली..

विशाखाच्या यशाचं रहस्य म्हणजे- आत्मपरीक्षण! विशाखा म्हणते, ‘‘भाकरी सतत फिरवत ठेवावी लागते, नाहीतर करपते. माझ्या अभिनयात सतत नवीन काहीतरी देण्यासाठी मी सतत आत्मपरीक्षण करत असते. सतत नव्याचा शोध घेत राहते...’’ हे तिचे नावीन्याचे प्रयोग कायमच ‘हास्यजत्रा’मध्ये पहायला मिळतात. ‘हास्यजत्रा’मध्ये एकदा ‘सेलिब्रेटी गेस्ट’ म्हणून दिग्गज अभिनेत्री भारती आचरेकर आल्या होत्या. येताना त्यांनी सर्व कलाकारांसाठी खाऊ आणि गिफ्ट्स आणले होते. त्यांनी आणलेले मस्त उकडीचे मोदक आणि डोसे संपवल्यावर भारतीताईंनी सगळ्यांना गिफ्ट्स दिले. त्यात विशाखाला एक सुंदर ‘पिच कलर’ची बांधणी सिल्कची साडी भेट म्हणून दिली आणि त्या म्हणाल्या, ‘‘विशाखा कमाल काम करते, आज मी विशाखाच्या वयाची असते तर विशाखासारखंच काम करताना तुम्हाला मी दिसले असते.’’ विशाखासाठी हे खूप मोठं प्रशस्तिपत्रक होतं. विशाखाला त्या साडीतून जणू भारतीताईंचे आशीर्वादच मिळाले होते.

साडी प्रकार आवडणाऱ्या विशाखासाठी या दोन्ही साड्या खूप खास आहेत. भारतीताईंनी दिलेल्या साडीवर विशाखाने लगेच एक वेगळ्याच धाटणीचे ब्लाऊज शिवलं. विशाखाची स्टायलिस्ट अर्चना ठावरेनं तिच्यासाठी वेगवेगळ्या साड्यांवर घालता येईल असं मल्टिशेडेड लांब पॅटर्नचं ब्लाऊज शिवून आणलं. साडी ड्रेप करण्यात वाकबगार असलेली विशाखा एका कार्यक्रमात ती साडी नेसून गेली. त्या खास ब्लाऊजवर ती बांधणी साडी तिनं वेगळ्याच स्टाईलनं नेसली होती.

विशाखाच्या कामाला मनापासून मिळालेली दाद म्हणजे ही ‘दोन रेशमी गाठोडी’ विशाखासाठी खूप मोठा मौल्यवान ठेवा आहे, जो तिनं जतन करून ठेवलाय.....कायमचा!