सौंदर्यखणी : ‘कोईमतूर’ची ‘गर्भरेशमी’ साडी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Amruta Subhash

सौंदर्यखणी : ‘कोईमतूर’ची ‘गर्भरेशमी’ साडी

तमिळनाडू राज्यातील ‘कोईमतूर’ जिल्ह्यात हातमागावर विणल्या जाणाऱ्या ‘कोरा कॉटन साडीला’ सन २०१४ मध्ये ‘भौगोलिक स्थानदर्शन प्रमाणपत्रक’ मिळाले आहे. दुसऱ्या शतकात ‘चोला साम्राज्या’त ‘कोईमतूर’ स्थापित झाल्याचे उल्लेख आहेत. पुढच्या काळात ‘कोईमतूर’मधील काळी कसदार माती आणि शेतीसाठी अतिशय अनुकूल घटकांमुळे तिथे चांगला कापूस पिकू लागला आणि त्यामुळे तिथे हातमागावर वस्त्र विणली जाऊ लागली. २००० वर्षांपूर्वी रोमन साम्राज्यातील व्यापारी, समुद्रमार्गे भारताच्या नैऋत्य किनाऱ्याला येऊन पुढे ‘कोईमतूर’पर्यंत प्रवास करून ‘कोईमतूर’चे तलम कॉटन खरेदी करत असत.

‘रोम’मध्ये ‘कोईमतूर’च्या कापडाला खूप मागणी होती. ‘रोम’मधील उच्चभ्रू लोक, ‘टोगा’ - म्हणजे त्यांचे लांब अंगरखे - खास कोईमतूरच्या कापडापासून बनवत असत. शिवाय रोमन स्त्रिया दक्षिण भारतात विणलेले सिल्कचे कापड मोठ्या प्रमाणात मागवत असत. त्यामुळे त्याकाळात ‘रोम’मधून बराच पैसा भारतात येत होता; पण याला आळा बसावा म्हणून रोमच्या राजदरबाराने भारतातील वस्त्रांवर खूप मोठ्या प्रमाणावर टॅक्स लावला, त्यामुळे रोमन व्यापारी कमी प्रमाणात कापड खरेदी करू लागले आणि पर्यायाने कोईमतूरच्या वस्त्रोद्योगाला खीळ बसली.

पुढे सोळाव्या शककात दक्षिणेकडील समृद्ध ‘विजयनगर साम्राज्या’ने या वस्त्रोद्योगाला पुन्हा उर्जितावस्था दिली. कालांतराने तिथला वस्त्रोद्योग भरभराटीला आला आणि अलीकडच्या काळात ‘कोईमतूर’ला ‘दक्षिण भारतातील वस्त्रोद्योगाची राजधानी’ असा दर्जा प्राप्त झाला. आजही तमिळनाडूतील स्थानिक लोक ‘कोईमतूर’ला ‘कोवाई’ असे संबोधतात, त्यामुळे इथे विणल्या जाणाऱ्या ‘कोरा कॉटन साडीला’, ‘कोवाई कोरा कॉटन साडी’ असेही म्हणतात. अनेक वर्षांपासून ‘देवांग’ समाजातील लोक, ‘कोईमतूर’ येथे ‘कोवाई कोरा कॉटन साडी’ विणत आले आहेत. आता ‘कोईमतूर’ जिल्ह्याबरोबरच ‘तिरुपूर’ आणि ‘इरोड’ जिल्ह्यातही या साड्या विणल्या जात आहेत.

या साड्या, एक धागा रेशमाचा आणि एक धागा कॉटनचा अशा ‘गर्भरेशमी’ प्रकारात विणल्या जातात. त्या हलक्याफुलक्या असतात. आकर्षक रंगांत विणल्या जातात आणि त्यांचा ‘कॉन्ट्रास्ट’ रंगसंगतीचा पदर आणि काठ अतिशय सुंदर असतात. कधी कधी काठावर आणि पदरावर जरीचा माफक वापरही केलेला आढळतो. पूर्वी या साड्या जास्त करून ‘प्लेन’ विणल्या जात असत; पण अलीकडच्या काळात रेशमी बुट्टी आणि पदरावरची नक्षी, साडी विणतानाच ‘जकार्ड’ पद्धतीने विणली जाते. या पारंपरिक बुट्टीमध्ये कोयऱ्या, हंस, मोरपीस, ‘कोडी’ म्हणजे वेलबुट्टी आणि तमिळनाडूच्या निसर्गातील इतर घटकांचा प्रभाव पडलेला दिसतो.

गेल्या काही वर्षांत औद्योगीकरणाच्या लाटेत ‘कोईमतूर’च्या ‘कोरा कॉटन साड्या’ आता पॉवरलूमवरही बनू लागल्या आहेत. पॉवरलूमवरच्या साड्यांची किंमत कमी असली, तरी हातमागावर विणल्या जाणाऱ्या कोरा-कॉटन साड्यांमध्ये विणकरांच्या कल्पकतेमुळे खूप वैविध्य आढळते. अनेक वर्षांपासून तमिळनाडूतील अनेक लोकप्रिय साड्यांमध्ये ‘कोरा कॉटन साडीला’ एक वेगळेच खास स्थान आहे.

कौतुक करणारी साडी!

दिल्लीच्या ‘नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा’मध्ये शिक्षण घेतलेल्या अमृता सुभाषने अनेक दर्जेदार नाटकांमधून आपल्या सहज अभिनयाचा ठसा उमटवला आणि २००४ मध्ये राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘श्वास’ या चित्रपटातून तिच्या चित्रपट क्षेत्रातील करिअरला सुरुवात केली. अभिनयाबरोबरच शास्त्रीय संगीतावर आणि शास्त्रीय नृत्यावरही तिचे प्रभुत्त्व आहे. आत्तापर्यंत तिच्या जबरदस्त ताकदीच्या अभिनयाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले. २०१३ मध्ये ‘अस्तु’ या मराठी चित्रपटातील तिच्या अत्यंत हटके भूमिकेसाठी राष्ट्रीय पुरस्कार आणि २०१९ मध्ये ‘गली बॉय’ या हिंदी चित्रपटातील तिच्या भूमिकेसाठी ‘फिल्मफेअर ॲवॉर्ड’ने सन्मानित करण्यात आले. अनेक नाटके, मालिका आणि चित्रपटांमधून अमृताने आपल्या अभिनयाची खास मोहर उमटवली आहे. अनेक दर्जेदार कलाकृती तिच्या नावावर नोंदवल्या गेल्या आहेत. ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’वरही तिचे पदार्पण खूप दमदार झाले आहे. ‘नेटफ्लिक्स’वर चित्रपटांबरोबरच अनेक वेबसिरीज प्रदर्शित होत असतात. ‘सिलेक्शन डे’, ‘सेक्रेड गेम्स’, ‘बॉम्बे बेगम’सारख्या वेब सिरीजमधल्या तिच्या अभिनयाला प्रेक्षकांकडून खूप मोठी दाद मिळाली आहे.

यंदाच्या जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने ८ मार्च रोजी ‘नेटफ्लिक्स’तर्फे, ‘नेटफ्लिक्स’वर प्रदर्शित झालेल्या चित्रपटांमधील आणि वेबसिरीजमधील सशक्त स्त्री व्यक्तिरेखांच्या सन्मानार्थ ‘Now स्त्रीMing’ नावाचे संमेलन आयोजित केले होते. त्या कार्यक्रमात इतर काही मोजक्या अभिनेत्रींबरोबर अमृताच्या कसदार अभिनयाचा सन्मान करण्यासाठी अमृतालाही निमंत्रित केले होते. तिथे ‘नेटफ्लिक्स’च्या नायिकांचे चर्चासत्र आयोजित केले होतं आणि त्यात भाषण करताना अमृता म्हणाली, ‘‘नेटफ्लिक्समुळे चांगल्या अभिनेत्रींना सशक्त भूमिका मिळू लागल्या आहेत आणि त्यामुळे ‘ओटीटी प्लॅटफॉर्म’ कसदार अभिनेत्रींसाठी वरदान ठरत आहे....’’ चर्चासत्र संपल्यानंतर अमृता आणि तिथे उपस्थित इतर अभिनेत्रींना, ‘नेटफ्लिक्स’तर्फे प्रत्येकीला एक टोमॅटोचे रोप आणि एकेक साडी भेट देण्यात आली. अमृता म्हणाली, ‘‘चाकोरीबद्ध भूमिका न करता सतत नवीन काहीतरी देण्याच्या प्रक्रियेतून माझ्याकडून सुंदर कलाकृती घडत गेल्या आणि त्या कलाकृतींचा आदर आणि कौतुक करणारी ही साडी माझ्यासाठी खूप खास आहे.’’

अमृताला भेट म्हणून मिळालेल्या कोरा कॉटनच्या ऑरेंज साडीला गुलबक्षी काठ आणि जरीचा पदर आहे, ही रंगसंगती तिला फारच आवडली आणि तिने ती लगेच येणाऱ्या पाडव्याला आवर्जून नेसली. आधुनिक ‘लूक’ असलेल्या या साडीवर नथ घालून अमृताने आणि तिच्या यजमानांनी म्हणजे संदेश यांनीसुद्धा मुद्दाम तिच्या साडीच्याच रंगाचा कुर्ता घालून भरपूर फोटोशूट केले आणि कोरोना काळात आलेल्या त्या गुढीपाडव्याला सकारात्मकतेची गुढी उभारली!

टॅग्स :Rashmi Satav