सौंदर्यखणी : वैशिष्ट्यपूर्ण ‘इरकल’

Irkal-Saree
Irkal-Saree

महाराष्ट्रात ‘इरकल’ म्हणून प्रचलित असलेली साडी मूळची कर्नाटकची असून, कर्नाटकात या साडीला ‘इलकल’ साडी म्हणतात. कर्नाटकातील बागलकोट जिल्ह्यात इलकल आणि त्याच्या आजूबाजूच्या गावांत आठव्या शतकापासून देवांग, पद्मनाभ, पद्मशाली, वाल्मीकी इत्यादी जमातींचे विणकर, ही पारंपरिक इलकल साडी हातमागावर विणत असत. 

हातमागावर विणल्या जाणाऱ्या या साड्यांची खासीयत म्हणजे; मुख्य साडी आणि साडीचा पदर वेगवेगळा विणला जातो आणि ‘कोंडी’ नावाचे एक खास टेक्निक वापरून पदर मुख्य साडीला जोडला जातो. या साडीचा पदर एका विशिष्ट पद्धतीचा असतो. लाल-पांढऱ्या किंवा मरून-पांढऱ्या रंगाचे पट्टे या पदरावर असतात. या पदराला टोप-पदर म्हणतात. हल्ली मात्र दुसरेही रंग इरकलच्या पदरावर झळकताना दिसतात. ठरावीक डिझाइन असलेले हे पदर खुलून दिसतात, ते मात्र सुंदर अशा पारंपरिक गोंड्यांमुळे, त्यांना ‘टॅसल्स’ असेही म्हणतात.

पारंपरिक इरकल साड्यांचे काठ नेहमी कॉन्ट्रास्ट असून ४ ते ६ इंच रुंदीचे असतात. काठाच्या डिझाईनमध्ये पण काही सुंदर पारंपरिक प्रकार आहेत. उदाहरणार्थ, ‘चिक्की-पारस’, ‘गुमी’, ‘जरी’, ‘गायत्री’ वगैरे. यातील ‘चिक्की-पारस’ काठ खूपच लोकप्रिय प्रकार आहे. हे सुंदर काठ उठून यावेत म्हणून मधली साडी प्लेन किंवा चेक्सची (चौकडीची) असते. या चेक्समध्येही छान छान प्रकार आहेत. उदाहरणार्थ, बारीक चेक्स म्हणजे ‘कोंडी-चिक्की’, थोडे मोठे चेक्स म्हणजे ‘रागावली’, जवळ जवळ असणाऱ्या उभ्या रेषांचे चेक्स म्हणजे ‘पुथडी’ किंवा दोन वेगवेगळे रंग वापरून बनवलेले चेक्स म्हणजे ‘शेरटिंग’ !       

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

बागलकोट जिल्ह्यात पूर्वीपासून या विणकरांच्या घरातच हातमाग आहेत आणि घरातील सगळी मंडळी या कामात वाकबगार असतात. अतिशय कष्टाळू असणारी ही विणकर मंडळी साधारणपणे २ ते ७ दिवसात एक साडी विणतात. पुढे पॉवरलूम आल्यावर हीच साडी आता ३ ते ४ तासात बनते; पण अजूनही हे विणकर मनोभावे हातमागावर मोठ्या प्रमाणावर या साड्या बनवतात. फक्त त्यांच्या कष्टाचा म्हणावा तसा मोबदला मात्र त्यांना मिळत नाही ही शोकांतिका आहे. त्यामुळे चोखंदळ ग्राहकांनी खास हातमागावर बनवलेल्या या इरकल साड्या विकत घेतल्यास त्यातून या विणकरांना प्रोत्साहन मिळेल आणि ही कला पण जिवंत राहण्यास मदत होईल.

इरकल ओळखायची कशी?

  • ओरिजिनल इरकल ओळखण्याची खुबी म्हणजे पदर साडीला जिथे जोडला जातो तो भाग साडीच्या उलट्या बाजूने बघावा. ‘इंटर-लॉकिंग-लूप’ पद्धतीने साडीचे उभे धागे (साडीचा ताना) आणि पदराचे उभे धागे (पदराचा ताना) एकमेकांना जोडलेले दिसतात. ज्याला ‘कोंडी-टेक्निक’ असेही म्हणतात. मात्र, ही गोष्ट सरावानेच कळते, कारण हे अतिशय बेमालूमपणे जोडलेले असते.
  • इरकल गावाला या साडीने ओळख प्राप्त करून दिली आहे म्हणून या साडीला ‘भौगोलिक स्थानदर्शक’ प्रमाणपत्र (‘जीआय टॅग’) मिळाले आहे. 
  • बागलकोट जिल्ह्यात ही साडी ६ वार, ८ वार आणि ९ वार या मापात उपलब्ध आहेत. 
  • कर्नाटकात प्लेन इरकल साडीवर ‘कसुटी’ नामक भरतकामपण हाताने केले जाते. कसुटी म्हणजेच कर्नाटकी कशिदा. कापडाच्या दोन्ही बाजूने तंतोतंत सारखा दिसणाऱ्या या कर्नाटकी कशिद्यालाही ‘जीआय टॅग’ मिळाला आहे. 
  • कर्नाटकातल्या नववधू स्वतःच्या लग्नात खास कुंकवाच्या रंगाची इरकल नेसतात. 
  • ही सुंदर पारंपरिक साडी कॉटन किंवा सिल्क दोन्हीमध्ये बनते.    
  • प्लेन कॉटन इरकल साडी आणि कॉन्ट्रास्ट खणाचं ब्लाऊज ट्रेंडिंगमध्ये आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com