सौंदर्यखणी : ‘जकार्ड साडी’चं विलक्षण तंत्र

आज आपण नक्षी विणण्याचे असे तंत्रज्ञान पाहणार आहोत जे निरनिराळ्या साडी प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते.
Sonali Kulkarni
Sonali KulkarniSakal

आज आपण नक्षी विणण्याचे असे तंत्रज्ञान पाहणार आहोत जे निरनिराळ्या साडी प्रकारांमध्ये मोठ्या प्रमाणात वापरले जाते. या तंत्रज्ञानामुळे साड्यांवर कोणतेही डिझाईन, साडी विणतानाच विणले जाते आणि त्यामुळे सुंदर नक्षीकाम असलेल्या साड्या तयार होऊ शकतात.

सन १८०४ मध्ये फ्रान्समध्ये जोसेफ जकार्ड यांनी कापडावर नक्षी विणण्याचे खास तंत्रज्ञान विकसित केले. ‘जकार्ड वीव्हिंग’ म्हणजे ‘जकार्ड लूम’वर कापडावर नक्षी विणण्याची एक खास पद्धत. या तंत्रज्ञानामुळे हातमागावर कापड विणताविणताच त्यावर सुंदर नक्षीकाम विणले जात असे. त्या काळात हातमागावर हे विणकाम करताना दोन विणकर लागत असत, त्यातील एक विणकर हातमागावर वरच्या बाजूला असलेल्या ‘डेक’वर बसून, नक्षीकामानुसार ‘तान्याचे’ उभे धागे नियंत्रित करत असे. या कामाला बराच वेळ आणि मेहनत लागत असल्यामुळे तेव्हा ‘जकार्ड फॅब्रिक्स’ची किंमत जास्त असे; पण नंतर हे तंत्रज्ञान खूप विकसित होत गेले, त्यामुळे वेळ आणि मेहनत कमी झाली आणि किंमतीही आटोक्यात आल्या.

पूर्वी ‘जकार्ड’ची साडी हातमागावर बनवताना साडीवर जी डिझाईन हवी आहे ती डिझाईन, ‘डिझाईन आर्टिस्ट’ हातानं ग्राफ पेपरवर काढून ते सुंदर रंगसंगतीत रंगवत असत. मग ग्राफ पेपरवरील डिझाईननुसार हातानेच एका विशिष्ट प्रकारच्या ‘कार्ड पंचिंग’ मशीनद्वारे साडीच्या रुंदीइतक्या आयताकृती जाड कार्ड्‌सवर पंच करून एका विशिष्ट पॅटर्नमध्ये छिद्रे पाडली जात असत.

साडीच्या लांबीनुसार त्यातील ठरलेले डिझाईन कितीवेळा रिपीट होणार आहे त्यानुसार तितके कार्ड्‌स पंच केले जात असत आणि मग ते एकमेकांना जोडले जाऊन ‘जकार्ड लूम’च्या आयताकृती सिलिंडरवर लावले जातात. त्या सिलिंडरच्या समोर आडव्या मोठ्या सुया अशा पद्धतीने बसवलेल्या असतात, की जिथे कार्डवर छिद्र आहे त्याच्या समोरची सुई आरपार जाते आणि जिथे छिद्र नसते तिथली सुई आरपार न जाता मागे ढकलली जाते. सुयांच्या हालचालीमुळे त्याला जोडलेले खालचे उभे धागे त्या पद्धतीत वर-खाली होतात आणि आडव्या धाग्यांबरोबर नक्षीनुसार विणले जातात. ही प्रक्रिया गुंतागुंतीची असली, तरी धागे मात्र एकमेकांत अशा प्रकारे गुंततात की त्यातून सुंदर कलाकृती तयार होते. पूर्वी या प्रत्येक टप्प्यावरचे काम हाताने केले जायचे. आता मात्र संगणक प्रणाली टप्पे नियंत्रित करते.

जकार्ड पद्धतीने साडी विणून झाल्यानंतर साडीच्या आतल्या बाजूने म्हणजे नक्षीत वापरले न गेलेले ‘फ्लोटिंग’ सुट्टे धागे एका खास पद्धतीने बेमालूमपणे कापले जातात. त्यामुळे जकार्डची नक्षी बारकाईने पाहिल्यास नक्षीच्या कडेने कापलेले धागे दिसतात. मागून जरी कापलेले धागे दिसत असले, तरी ते निघून येत नाहीत- कारण ते खास खुबीने आत विणले गेलेले असतात.

पश्चिम बंगालमध्ये जकार्ड साडी सिल्क किंवा कॉटनमध्ये तयार होते. कोणत्याही प्रकारची जकार्ड साडी वर सांगितल्या प्रकारे तयार होते. सोनाली कुलकर्णीने नेसलेल्या सुंदर पिवळ्या सिल्कच्या बंगाल जकार्ड साडीवर बंगाली नक्षीकामाचा प्रभाव दिसतो आहे. ‘जकार्ड’ साडी जितकी सुबक तितके त्या साडीसाठी वापरलेले तंत्र गुंतागुंतीचे आणि विलक्षण असते! पण या विलक्षण तंत्रामुळेच सुंदर कलाकृती तयार होत आहेत.

एक ‘अमूल्य ठेवा’ !

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतलं एक ‘सो... कूल’ नाव म्हणजे सोनाली कुलकर्णी. अभिनय, गायन, नृत्य आणि लेखनावरही प्रभुत्व असलेली सोनाली बहुपैलू आहे. ‘रेड कार्पेट्स’वर, ‘प्रीमियर शोज’ना, पुरस्कार सोहळ्यांना आणि इतर कार्यक्रमांना सोनाली आवर्जून साडीच नेसून जाते. करिअरच्या सुरुवातीच्या काळामध्ये नाटकांच्या प्रयोगांना ती तिच्या आईच्या साड्या, त्यावर आईचेच ‘टाचलेले’ ब्लाऊज घालून मनसोक्त मिरवत असे. अकरावीत असताना दूरदर्शनवरील कार्यक्रमामध्ये तिच्या प्रिया वहिनीची साडी, ‘अरंगेत्रम’ला वृषाली वाहिनीची साडी, पहिल्या आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाला तिच्या बहिणीची- स्मिता दातेची साडी, तर कधी पौर्णिमा गानूच्या आईच्या साड्या, ती अगदी आवडीनं नेसत असे. करिअरच्या पुढच्या टप्प्यात एका मोठ्या व्यक्तिमत्त्वाच्या, अभिनयाचं जणू ‘उत्तरदायित्त्व’च साडीच्या घडीतून सोनालीकडे आलं.... ते सृजनशील व्यक्तिमत्त्व म्हणजे -‘स्मिता पाटील’!

स्मिता पाटील यांचं वयाच्या केवळ एकतिसाव्या वर्षी निधन झालं. त्यांची बहीण अनिता यांनी, स्मिताजींनंतर अनेक कलाकारांसोबत खास ऋणानुबंध जपले आहेत. सोनाली म्हणाली, ‘‘स्मिताजींच्या अनेक वस्तू अनिताजींनी अनेक कलाकारांना भेट म्हणून दिल्या आहेत आणि त्यातली मी एक भाग्यवान आहे!’’ एक दिवस सोनालीचा एक चित्रपट बघून अनिताजी खूप भारावून गेल्या. त्यांना कदाचित सोनालीमध्ये स्मिताजी दिसल्या असाव्यात. दुसऱ्या दिवशी सकाळी सोनालीला त्यांनी एक भेट पाठवली. फुलांचा गुच्छ आणि सुंदर पिवळ्या रंगाची - मऊसूत सिल्कची ‘बंगाल जकार्ड’ साडी. स्मिता पाटील यांच्या अभिनयाचा वारसा साडीच्या रूपात सोनालीकडे राहावा, असं त्यांना वाटत होतं, त्यामुळे स्मिता पाटील यांनी नेसलेली साडी त्यांनी सोनालीला भेट म्हणून पाठवली होती! स्मिता पाटील यांनी नेसलेली ती साडी सोनालीच्या ध्यानीमनीही नसताना त्या क्षणी तिच्या हातात होती. त्या साडीवर सोनाली कितीतरी वेळ हात फिरवत राहिली. साडीच्या धाग्यांनी एक ‘लिजंड’ दुसऱ्या ‘लिजंड’ला जोडला गेला.

पुढे काही वर्षांनी, चित्रपटसृष्टीतल्या पहिल्या ‘कॉस्च्युम’ आणि ‘आर्ट डिपार्टमेंट’च्या प्रदर्शनासाठी उद्‍घाटक सोनाली होती. स्मिताजींच्या याच साडीची घडी सोनालीनं मोडली. खरंतर सोनालीला, अशा वस्तूंबद्दल खूप ‘अप्रूप’ असल्यानं सुमित्रा भावे यांनीही निधनापूर्वी त्यांची एक साडी सोनालीला भेट दिली होती, आणि अशीच एक साडी सोनालीच्या नृत्य-शिक्षिका गुरू माणिकताईंनीही त्यांची आठवण म्हणून सोनालीला दिली आहे. साडीबद्दल वाटणाऱ्या अशा आदरयुक्त भावनेमुळेच सोनाली, स्मिताजींचीच साडी नेसून उद्‍घाटनाला गेली. प्रदर्शनात मधुबाला, साधना, वैजयंतीमाला अशा कितीतरी कलाकारांचे ‘कॉस्च्युम’ होते. सोनाली म्हणाली, ‘‘त्या थोर कलाकारांना आम्ही स्पर्श केला आहे, असं ती वस्त्रं मोठ्या अभिमानानं जणू सांगत होती... त्यातून मी भारावून जाऊन तिथं भाषण केलं!’’ सोनाली भाषणात म्हणाली, ‘‘मला इथं येण्यासाठी कोणी बळ दिलं असेल, तर ते मी नेसलेल्या या साडीनं.’’ भाषण संपल्यावर सगळ्यांनी तिच्याभोवती गराडा घातला, त्यांना स्मिताजींचा स्पर्श झालेल्या त्या साडीच्या पदराला फक्त एक स्पर्श करायचा होता.

तिथूनच पुढे सोनाली एका कार्यक्रमानिमित्त स्मिताजींचा मुलगा प्रतीक आणि अनिताजी यांना भेटायला गेली होती. सोनालीला त्या साडीत बघून त्या सगळ्यांना खूप गहिवरून आलं. अनिताजींनी सोनालीचा हात धरून त्या कार्यक्रमात नसरुद्दिन शहा, दीप्ती नवल आणि स्मिताजींच्या मित्रपरिवारापैकी प्रत्येकाला जाऊन सांगितलं, ‘This is Smita’s Saree!’ तेव्हा सोनालीलाही अभिनयाचा एक देदीप्यमान वारसा आपल्या अंगावर ल्यायल्याचा सार्थ अभिमान वाटला असावा. प्रतीक तर खूप भावुक झाला होता. सोनालीबरोबर त्यानं आठवण म्हणून फोटोदेखील काढला.

सोनालीनं कपाटाबरोबरच तिच्या मनाच्याही खोल कप्प्यात जतन केलेली ती साडी म्हणजे सोनालीकडे आलेला अमूल्य कलेचा एक वारसा आहे!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com