esakal | सौंदर्यखणी : ‘कांथा’ची रेशमी कलाकुसर
sakal

बोलून बातमी शोधा

Aishwarya Narkar

सौंदर्यखणी : ‘कांथा’ची रेशमी कलाकुसर

sakal_logo
By
रश्मी विनोद सातव

‘कांथा साडी’ म्हणजे, कॉटन किंवा सिल्कच्या साडीवर हाताने काही विशिष्ट प्रकारचे भरतकामाचे टाके घालून, सुंदर नक्षीकामाने सजवलेली साडी. पश्चिम बंगालची खासियत असलेल्या या साडीला ‘कांथा साडी’ हे नाव का पडले असावे? खूप वर्षांपूर्वीपासून बंगालच्या स्त्रिया, जुन्या साड्या एकत्रितपणे शिवून, वरून पांढरे सिल्कचे किंवा कॉटनचे कापड किंवा साडी लावून गोधडी बनवत असत आणि त्या गोधडीवर पांढऱ्या दोऱ्याने ‘धावदोरा’ नावाची ‘टिप’ हाताने घालत असत. ती ‘टिप’ वापरून हळूहळू त्या स्त्रिया वेगवेगळी नक्षीकामही करू लागल्या. या भरतकामात त्यांनी नवीन टाके विकसित करून वैविध्य आणले. बंगालमध्ये या गोधडीला ‘कांथा’ म्हणतात, त्यावरून नंतर या प्रकारालाच ‘कांथा स्टिच’ नाव पडले. ‘कांथा स्टिच’ने या स्त्रिया, साड्यादेखील भरू लागल्या आणि या साड्या जगभर लोकप्रिय झाल्या. पुण्यात केळकर म्युझियममध्ये एकोणिसाव्या शतकातील पश्चिम बंगालमधील अशी एक गोधडी जतन करून ठेवली आहे, ज्याच्यावर वेलबुट्टीचे सुंदर कांथावर्क हाताने केलेले आहे.

इसवीसनपूर्व १५०० च्या कालखंडातसुद्धा ही कला अस्तित्वात असल्याचे उल्लेख सापडले आहेत. ५०० वर्षांपूर्वीच्या कालखंडातील लेखक, कृष्णदास कविराज यांच्या एका पुस्तकात उल्लेख केलेली ‘कांथा-गोधडी’ आजही ओडिशामध्ये ‘पुरी’ या गावी जतन करून ठेवली आहे. त्या काळी काटकसरी स्त्रिया ‘कांथाचे धागे’सुद्धा इतर जुन्या वस्त्रांपासून ओढून काढत असत. खूप वर्षांपूर्वी बंगालमध्ये मुलगी जन्माला आल्यावर तिची आई नवीन साड्या वापरून कांथा-गोधडी शिवायला घेत असे. मुलीचे लग्न ठरेपर्यंत ती त्या गोधडीवर बारीक नक्षीकाम करत असे आणि मुलगी सासरी निघाली, की तिला ती ‘कांथा-गोधडी’ भेट म्हणून देत असे. ही शिवतानाच या गोधडीच्या आत अडीअडचणीला लागतील म्हणून काही मौल्यवान गोष्टीही ती ठेवत असे. ब्रिटिश काळात उतरती कळा लागलेल्या या कलेला १९४० च्या सुमारास गुरुदेव रवींद्रनाथ टागोरांच्या सुनेने म्हणजे प्रतिमाताई टागोरांनी शांतिनिकेतन येथे पुनरुज्जीवन दिले.

पश्चिम बंगालबरोबरच आता ओडिशा, आंध्र प्रदेश, त्रिपुरा आणि आसाममध्येसुद्धा ‘कांथा आर्टिस्ट स्त्रिया’ घरकाम सांभाळून साड्यांवर ‘कांथा वर्क’ करू लागल्या आहेत. कांथा-वर्कच्या नक्षीत पाने-फुले, वृक्ष-वेली, प्राणी-पक्षी, कमळे, मासे, मानवीय आकृत्या इत्यादी नैसर्गिक घटक; तसेच पौराणिक संदर्भ, भौमितिक आकार, कोयऱ्या, मंडाला आणि ते काम करणाऱ्या स्त्रियांच्या स्वप्नातील गोष्टीसुद्धा साडीवर उतरलेल्या दिसतात. विशेष म्हणजे, साडीवर वरच्या बाजूने पूर्ण भरलेले काम असले, तरी उलट्या बाजूने फक्त बारीक धावदोरा दिसतो. काम सुरू करण्यापूर्वी ट्रेसिंगपेपरवरील डिझाईन, साडीवर आधी छापून घेतले जाते. मग डिझाईनची आऊटलाईन, ‘रनिंग स्टिच’ किंवा ‘स्टेम स्टिच’ने करून घेतली जाते आणि मग आजूबाजूची बारीक नक्षी भरली जाते. ट्रेसिंग पेपर नव्हता, तेव्हा काल्पनिक रेषेनुसार काम केले जात असे. मलबेरी सिल्क, टसर सिल्क किंवा कॉटनच्या साड्यांवर हे ‘कांथा-वर्क’ केले जाते. साडीला लाकडी फ्रेम लावून सिल्कच्या धाग्याने ते केले जाते. या साड्यांच्या ‘बॉर्डर’मध्ये असंख्य प्रकार असून त्या काठांना ‘बांगला’ भाषेत वेगवेगळी नावे आहेत. कांथा डिझाईनच्या पॅटर्ननुसार साडीचा लूक बदलत जातो. काही साड्या पूर्ण भरलेल्या असतात, तर काही फक्त काठा-पदरावर आणि बुट्टीवर भरलेल्या असतात. पूर्ण भरलेल्या ‘रिव्हर्स कांथा’मध्ये साडीभर पसरलेली फुले, पक्षी, मासे किंवा तत्सम घटक सोडून बाकीची साडी कांथा-स्टिचने पूर्ण भरून टाकली जाते- त्यामुळे रंगीबेरंगी साडीमध्ये ते रिकामे पक्षी उठून दिसतात. ‘जाम-कांथा’ मध्ये जामदानी बुट्टीबरोबर केलेले कांथावर्क म्हणजे दोन कलेचे अप्रतिम कोलाज. टसर सिल्कवरच्या ‘हॅन्ड पेंटिंग’ किंवा ‘ब्लॉक प्रिंटिंग’मध्ये सरमिसळून गेलेले ‘कांथावर्क’ म्हणजे सुंदर कलाकृतीच असते. हे काम हाताने होत असल्यामुळे एका संपूर्ण भरलेल्या साडीवरचे काम पूर्ण व्हायला काही महिने लागतात. भरतकामामुळे साडीवर खास ‘टेक्श्चर’ आलेले असते. त्या अप्रतिम कलाकृतीवर हात फिरवताना त्या ‘कांथा आर्टिस्ट’ स्त्रियांच्या कलेला सलाम करावासा वाटतो.

‘ऐश्वर्या’च्या दोन ‘पॅशन’

दूरदर्शनवरून ‘महाश्वेता’ या मालिकेतून १९८८ मध्ये घराघरात पोचलेली ऐश्वर्या नारकर, मनोरंजन क्षेत्रात, ‘न ठरवता’ सहजपणे आली. डोंबिवलीच्या ‘स्वामी विवेकानंद विद्यामंदिर’मध्ये शिकणाऱ्या ऐश्वर्याला शाळेत असताना एका नाटकात घेतलं होतं. त्यात ती सोपानदेवांच्या भूमिकेचा सराव करत असताना तिचं अख्खं नाटक पाठ झालं होतं. नाटकाची तारीख जवळ आली आणि ज्ञानेश्वरांची मुख्य भूमिका करणारी मुलगी आजारी पडली. मग तिच्या नाटकाच्या पांडुरंगसरांनी ती भूमिका ऐश्वर्याला दिली आणि तिनं ती भूमिका अतिशय उत्तम केली. मग तिनं काही बालनाट्यात भाग घेतला; पण पुढे तिनं शिक्षणाला प्राधान्य दिलं आणि नाटक बाजूला पडलं. एफ. वाय.ला असताना त्याच पांडुरंगसरांनी तिची प्रभाकर पणशीकरांशी ओळख करून दिली, त्यावेळी पणशीकर ‘गंध निशिगंधाचा’ या नाटकासाठी एका सोज्व्वळ चेहऱ्याच्या अभिनेत्रीच्या शोधात होते. त्यांनी तिला नाटक वाचून दाखवायला सांगितलं आणि ऐश्वर्यानं ते इतकं अस्खलित वाचलं की पणशीकरांनी थेट मुख्य अभिनेत्रीची भूमिका दिली. याच नाटकादरम्यान तिला अविनाश नारकर भेटले आणि ते दोघं प्रेमात पडले.

ऐश्वर्या बऱ्याचदा आपल्याला सुंदर साड्यांच्या पेहरावात भेटत आली आहे. ‘अभिनय’ आणि ‘साडी’ या तिच्या दोन ‘पॅशन’ आहेत. ती संग्रहासाठी नेहमीच वेगवेगळ्या साड्या खरेदी करत असते. पण त्या मोठ्या दुकानांमधून न घेता, शूटिंगसाठी ज्या ज्या ठिकाणी जात असते त्या त्या ठिकाणाची खासियत असलेली साडी खरेदी करत असते. त्यामुळे स्थानिक कलेला प्रोत्साहन मिळतं, असं तिला मनापासून वाटतं. ऐश्वर्या म्हणाली, ‘‘मला साड्यांचे, सगळे प्रकार आवडतात. साड्यांच्या रंगसंगतीबाबत मात्र मी अत्यंत चोखंदळ आहे. साडी या वेशभूषेत स्त्रिया फारच ‘ग्रेसफुल’ दिसतात आणि त्यात कमनीय बांधा असेल तर अजूनच!’’

ती तिच्या आईकडे डोंबिवलीत जाते, तेव्हा तिची गाडी बघून ‘दीदी दीदी’ करत तिच्या आईच्या घराजवळ राहणारा मूळचा पश्चिम बंगालचा ‘छोटू’ नावाचा विणकर त्याचं साडीचं गाठोडं घेऊन लगेच येतो. तिची आई आणि ती नेहमी त्याच्याकडून साड्या घेत असल्यामुळे तो त्यांच्या घरातलाच एक झालाय. बंगालच्या दुर्गम भागातील गरीब विणकरांकडून तो साड्या आणत असतो. एक दिवस असंच तो घरी आला आणि त्यानं गाठोड्यातून एक सुंदर ‘कांथावर्क’ केलेली सिल्कची साडी बाहेर काढली. ऐश्वर्याच्या संग्रहात कांथाची साडी नव्हतीच, त्यामुळे साडीची किंमत जास्त असूनसुद्धा, त्या कलेचा मान राखत ऐश्वर्यानं ती साडी विकत घेतली आणि लगेच पुढच्या ॲवॉर्ड फंक्शनला नेसलीसुद्धा!

विशेष म्हणजे ऐश्वर्याइतकेच तिचे यजमान- अभिनेते अविनाश नारकरसुद्धा ‘साडी-प्रेमी’ आहेत. ऐश्वर्याच्या, अनेक साड्या त्यांनी त्यांच्या आवडीनुसार आणलेल्या असून, त्यांना साड्यांची उत्तम जाण आहे. सुंदर साड्यांचं सौंदर्य, ऐश्वर्यामुळे अजूनच खुलतं असं त्यांचं ठाम मत आहे आणि ऐश्वर्यानं नवीन साडी नेसल्यावर प्रत्येक वेळेस, कदाचित नव्यानं ते तिच्या प्रेमात पडत असतील.

loading image