सौंदर्यखणी : ‘खादीची साडी’

चरख्यावरची खादी-वस्त्राची निर्मिती पुढे कमी झाली, तरी आजही काही ठिकाणी अशी निर्मिती होत आहे.
Ashwini Mahangade
Ashwini MahangadeSakal

खादी हे नुसते एक वस्त्र नसून तो एक ‘प्रभावी विचार’ आहे. भारतात पूर्वी पुरेसे कापड तयार होत होते; पण इंग्रजांचे राज्य सुरू झाल्यावर पुढे युरोपमध्ये औद्योगिक क्रांती झाली आणि इंग्लंडमध्ये मोठ्या प्रमाणात कापडनिर्मिती होऊ लागली, तेव्हा भारतावरचे वर्चस्व कायम राहण्यासाठी इथल्या कापड उद्योगासकट इतर ग्रामोद्योगही इंग्रजांनी बंद पाडले. पुढे स्वातंत्र्यलढ्यात ‘स्वदेशी चळवळीची’ घोषणा करण्यात आली. सन १९२० च्या सुमारास एकूण आयातीतील तयार परदेशी कापडाचे प्रमाण सर्वाधिक होते. अशा परिस्थितीत वस्त्रोद्योगाचे पुनरुज्जीवन हा प्रभावी उपाय महात्मा गांधीजींनी अंमलात आणला. त्यामुळे घरोघरी चरख्याच्या व टकळीच्या साह्याने सूतकताई व खादीचे विणकाम सुरू झाले. गांधीजींमुळे या चळवळीला राष्ट्रव्यापी स्वरूप आले, खादीची वस्त्र-निर्मिती आणि खादीचा वापर वाढला. ‘स्वदेशी चळवळीच्या’ सन्मानार्थ पुढे ‘७ ऑगस्ट’ हा दिवस, ‘राष्ट्रीय हातमाग दिवस’ म्हणून जाहीर करण्यात आला.

चरख्यावरची खादी-वस्त्राची निर्मिती पुढे कमी झाली, तरी आजही काही ठिकाणी अशी निर्मिती होत आहे. आजही वर्ध्यात ‘ग्राम सेवा मंडळा’त, साबरमती आश्रमात आणि देशातील खादीनिर्मिती करणाऱ्या ग्रामोद्योगांत चरख्यावर खादीचे वस्त्र विणले जाते. पुढे चरख्यात ‘पेटी चरखा’, ‘प्रवासी’, ‘पुस्तक’, ‘किसान’ आणि ‘अंबर चरखा’ इत्यादी प्रकार बनवले जाऊ लागले. यातील ‘पेटी’, ‘प्रवासी’ आणि ‘पुस्तक चरखा’ घडी घालून एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी सहज नेता येण्यासारखे आहेत. खादी विचारांनी प्रभावित असलेली काही कुटुंबे आजही स्वतः सूतकताई करून विणलेली खादीची वस्त्रे वापरत आहेत. पुण्यातील माधव सहस्त्रबुद्धे आणि त्यांचे कुटुंब, त्यांच्या घरच्या ‘पेटी चरख्यावर’ रोज एक तास सूतकताई करून त्यापासून वर्ध्याहून हातमागावर कापड विणून घेऊन फक्त तेच कापड वर्षभर वापरतात. असे ते अनेक वर्षे करत आहेत. सहस्रबुद्धे म्हणाले, ‘‘सूतकताई ही मला सन्मानपूर्वक मिळालेली संधी आहे. रोज एक तास सूतकताई केली तर प्रत्येक जण आपल्या कुटुंबाला गरजेइतके कापड बनवण्यासाठी पुरेल इतके सूत सहज कातू शकतो.’’

कापसापासून सूत कातून त्याची साडी विणण्यापर्यंत अनेक टप्प्यांतून जाणारी खादीची साडी म्हणजे निसर्गस्नेही जीवनाच्या सर्व अंगांना जोडणारा एक मूलभूत धागा. कापूस बोंडांमधील बिया काढण्याच्या प्रक्रियेला ‘जिनिंग’ म्हणतात. मग कापसाचे पिंजण म्हणजे ‘कार्डिंग’ केले जाते. हा कापूस हाताने किंवा ‘धनुकली’ नावाच्या यंत्राचा वापर करून हाताने पिंजला जातो. त्याचे पातळ शीट्स तयार करून मग ते बारीक काठ्यांवर लपेटून लांबट नळ्या तयार केल्या जातात, त्यांना ‘पेळू’ किंवा हिंदीत ‘पुनी’ असे म्हणतात. मग त्यातील एक धागा पकडून त्याला टकळी किंवा चरख्याच्या साह्याने पीळ देत ओढला जातो. त्यातून एक लांबलचक धागा तयार होतो, याला सूत-कताई असे म्हणतात. रंगीत साडी हवी असेल, तर नैसर्गिकपणे ‘ऑफ व्हाईट’ रंगाच्या असलेल्या या गुंड्या आधी नैसर्गिक रंगात ‘डाय’ करून घेतल्या जातात. मग हातमागावर हे धागे तान्या-बान्यात लावून खादीच्या साड्या विणल्या जातात.

लांब तंतू असलेला देवकापूसापासून तलम कापड तयार होते म्हणून खादीच्या साडीसाठी तो वापरला जातो. खादीची साडी म्हणजे हाताने कातलेले सूत वापरून हातमागावर विणलेली साडी. परंतु अलीकडच्या काळात मोठ्या प्रमाणात खादीची निर्मिती करून विक्रीसाठी आणताना, बाह्य उर्जेचा वापर करून ‘अंबर चरख्यातून’ सूतकताई केली जाते, असे सुती धागे मिलमध्ये विणले जाऊन खादीचे तागे किंवा साड्या विणल्या जात आहेत.

संपूर्ण प्रक्रिया हाताने करून विणलेली खादीची साडी आणि मिलमध्ये विणलेली खादीची साडी यातील फरक सहज ओळखता येतो. हाताने विणलेल्या खादीची वीण जराशी सैल असते, शिवाय धाग्यांतून बारीक तंतू बाहेर आलेले असतात. त्यामुळे हे कापड त्वचेला चिकटून न बसता त्यातून हवा खेळती राहते. घाम किंवा पाणी चांगले शोषले जात असल्याने खादीच्या साड्या कोणत्याही ऋतूत वापरता येतात. वापरलेल्या मऊसूत खादीच्या साड्यांच्या गोधड्या वापरणे म्हणजे तर स्वर्गीय सुख असते!

मी सहस्रबुद्धे यांच्याकडील पेटी चरख्यावर ‘सूतकताई’ केली, तेव्हा माझे मन एकाग्र आणि अंतर्मुख झाले. मनात विचार आला की ‘कोरोनाकाळाने’ शिकवलेली, उपलब्ध साधनसामुग्रीतून ‘मिनिमलिस्टीक लिव्हिंग’ अगदीच शक्य आहे. नवीन पिढीने, त्यांना उपलब्ध होत असलेल्या अनंत वस्तूंच्या भडिमारात ‘मिनिमलिस्टीक लिव्हिग’ची संकल्पना समजून घेण्यासाठी एकदा तरी ‘सूतकताई’ नक्कीच करून बघायला हवी!

समाजभानाला दाद

अभिनेत्री अश्विनी महांगडे ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ आणि ‘आई कुठे काय करते?’ या मालिकांमुळे खूप लोकप्रिय झाली. शेतकरी कुटुंबात जन्माला आलेली अश्विनी, पसरणीच्या एका छोट्याशा शाळेत शिकत होती. अश्विनीचे वडील प्रदीपकुमार महांगडे हौस म्हणून वाईमधील ‘युवा कला केंद्रा’मधून ‘राज्य नाट्य स्पर्धे’साठी आणि गावच्या यात्रेसाठी नाटकं बसवत असत. हेच संस्कार अश्विनीवर लहानपणीच झाले आणि तिच्यातली अभिनयाची आवड जोपासली गेली. अश्विनी कॉलेजमध्ये असतानासुद्धा तिने नृत्य आणि नाटकांमधून भाग घ्यावा म्हणून तिचे वडील- नाना तिला नेहमी प्रोत्साहन देत असत. नाना समाजसेवेचेही संस्कार करत असत. ते स्वतः एक समाजसेवक होते आणि आपण समाजाचे काहीतरी देणं लागतो हा विचार त्यांनी तिच्यात लहानपणीच रुजवला होता.

‘स्वराज्यरक्षक संभाजी’ मालिका करताना अश्विनीला उमगलं, की आपली अभिनयकला समाजातील प्रेक्षकांमुळेच जोपासली जात आहे आणि त्यामुळे समाजासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे. मग तिनं आणि नीलेश जगदाळे यांनी २०१९ मध्ये नानांच्या मार्गदर्शनानुसार ‘रयतेचे स्वराज्य प्रतिष्ठान’ ही संस्था स्थापन केली. या संस्थेमार्फत ती अनेक उल्लेखनीय सामाजिक कार्य आजही करत आहे. मे महिन्यात, ‘कोविड’मुळे वयाच्या अवघ्या छप्पन्नाव्या वर्षी नाना तिला कायमचे सोडून गेले. या मोठ्या आघातातून सावरून ती ‘समाजसेवेच्या मार्गावरून’ चालत आहे.

अश्विनीच्या सामाजिक कार्याची दखल घेऊन बारामतीत राहणारे तिच्या मित्राचे दाजी आणि त्यांचे कुटुंबीय तिचं कायम कौतुक करत असतात. दोन वर्षांपूर्वी तिच्या कामाचा सन्मान म्हणून उलगडे, शिंदे आणि जैन यांनी त्यांच्या स्वतःच्या दुकानातून ‘प्रिया साडीज’च्या कलेक्शनमधून एक छानशी खादीची साडी तिला भेट दिली. अश्विनीला तो एक ‘कल्पक सन्मान’ वाटला. अश्विनी म्हणाली, ‘‘आई-वडिलांनी केलेल्या संस्कारांमुळे माझ्यात समाजसेवेचं बीज रुजलं गेलं आणि त्या कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी भेट म्हणून खादीची साडी देणं याला मी माझा सन्मान मानते. हा सन्मान माझ्यासाठी खूप मोलाचा आहे.’’ अश्विनीच्या घरातले पारंपरिक संस्कारही उल्लेखनीय आहेत. अश्विनीच्या घरी पहिल्यादा आलेल्या प्रत्येक स्त्रीची साडीनं ओटी भरली जाते. शिवाय तिच्या सगळ्या वहिन्या त्यांच्या नवीन साड्यांच्या घड्या स्वतः न मोडता अश्विनीला नेसायला देतात.

अश्विनीला मिळालेल्या खादीच्या साडीची, खास प्रसंगी नेसायची म्हणून ठेवलेली घडी मोडायचा योग काही येत नव्हता; पण मागच्या महिन्यात १५ ऑगस्टला एका सामाजिककार्यात अश्विनीनं ती आवर्जून नेसली आणि तेव्हा तिला तिच्या नानांची प्रकर्षाने आठवण झाली... तिला, त्या साडीतले खादीचे धागे म्हणजे....तिचे नाना आणि तिचे समाजकार्य यांना जोडणारा एक प्रभावी दुवा वाटतो.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com