सौंदर्यखणी : मडक्यावरचं ‘मटका सिल्क’

जगभरात लोकप्रिय असलेल्या ‘मलबेरी सिल्क’चं बाय प्रॉडक्ट म्हणजे ‘मटका सिल्क’! मलबेरी सिल्कचे धागे कसे तयार होतात, याची इत्थंभूत माहिती आपण मागच्या एका लेखात वाचली आहे.
Isha Keskar
Isha KeskarSakal

जगभरात लोकप्रिय असलेल्या ‘मलबेरी सिल्क’चं बाय प्रॉडक्ट म्हणजे ‘मटका सिल्क’! मलबेरी सिल्कचे धागे कसे तयार होतात, याची इत्थंभूत माहिती आपण मागच्या एका लेखात वाचली आहे.

पूर्ण वाढ झालेल्या ‘बॉम्बीक्स मोरी’ नावाच्या रेशमाच्या आळ्या त्यांच्या लाळग्रंथीतून स्रवणाऱ्या प्रोटिनयुक्त पदार्थापासून स्वतःभोवती कोश विणायला घेतात, त्या पदार्थात त्या आळ्यांच्या तोंडात ‘सेरीसीन’ नावाचा चिकट पदार्थ मिसळला जातो. तीन दिवसांत कोश बनून तयार होतो. मग पुढे पंधरा-सोळा दिवस आळ्या त्या कोशातच राहतात! सोळाव्या दिवशी आतील आळीचं पाकोळीत (मॉथमध्ये) रूपांतर होतं. या पाकोळीच्या तोंडातून अल्कली द्राव स्रवतो आणि त्यामुळे कोशाला छिद्र पडतं. या छिद्राच्या मदतीनं पाकोळी, कोश तोडून बाहेर येते. या तुटलेल्या कोशापासून रेशीम बनतं आणि त्या आळ्यांच्या तोंडातून स्रवलेल्या अल्कलीमुळे रेशमाचा रंगही बदलतो, परंतु व्यावसायिकदृष्ट्या अखंड रेशीम मिळवण्यासाठी आळीचं पाकोळीत रूपांतर होण्याच्या आधीच हे रेशमाचे कोश गरम पाण्यात टाकले जातात. गरम पाण्यामुळे ‘सेरीसीन’ नावाचा चिकट पदार्थ धुतला जातो आणि कोशातील धागे सुट्टे होतात आणि त्यातीलच एक सुट्टं टोक पकडून शुभ्र तकाकी असलेला मऊसूत अखंड मलबेरी सिल्कचा धागा मिळवला जातो.

Isha Keskar
सौंदर्यखणी : ‘शिफॉन’चं झुळझुळीत सौंदर्य

नैसर्गिकरित्या पाकोळ्या बाहेर येतात, तेव्हा ते कोश तुटतात आणि धाग्यातील ‘सेरिसिन’ नावाचा चिकट पदार्थ बऱ्याच अंशी तसाच राहतो. त्यामुळे या धाग्यांना मलबेरीपेक्षा तकाकी जरा कमी असते. तुटलेल्या कोशापासून अखंड रेशीम मिळत नाही, परंतु हातानं रेशमाचे तंतू काढले जातात आणि एखाद्या मडक्याला गुंडाळून ठेवले जातात. म्हणूनच या सिल्कला ‘मटका सिल्क’ असं नाव पडलं. मग कापसापासून जसं सूत काढलं जातं तशा पद्धतीनं रेशमांच्या मडक्यावरच्या तुटलेल्या या तंतूंना पीळ देऊन रेशमी सूत बनवलं जातं. त्यामुळे या सूतांचा पोत अखंड रेशमी सूताइतका मुलायम नसतो; पण त्याला एक खास टेक्श्चर असतं. पाच-सहा सूतांना एकत्र पीळ देऊन रॉ-सिल्कचा धागा बनविला जातो, तर दोन ते तीन सूतं पिळून मटका सिल्कचे धागे तयार होतात. त्यामुळे मटका सिल्कचे धागे वजनाला हलके आणि खास टेक्श्चर असलेले असतात आणि हीच त्या धाग्यांची खासियत आहे.

कर्नाटक, आणि गुजरातमधून तुटलेले कोश आणून पश्चिम बंगालमध्ये त्या कोशांपासून मटका सिल्कचे धागे बनविण्याचं आणि हे धागे वापरून हातमागावर मटका सिल्क साड्या विणण्याचं काम चालतं. तुटलेल्या कोशांपासून हे धागे बनत असल्यामुळे या साड्यांची किंमत मलबेरीपेक्षा कमी असते आणि या साड्या खूप टिकतातदेखील. विशिष्ट टेक्श्चर असल्यामुळे त्या सुळसुळीत नसतात आणि त्यामुळे छान ड्रेपदेखील होतात.

मटका सिल्कच्या साड्यांवर ‘पेंटिंग’ किंवा ‘जामदानी वर्क’ फार सुरेख दिसतं. पश्चिम बंगालचे प्रसिद्ध विणकर बिरेनकुमार बसाक यांनी मटका सिल्कच्या साडीला तलम मसलिनचा पदर विणून त्याच्यावर केलेल्या अप्रतिम ‘जामदानी वर्क’च्या साड्यांवर पौराणिक गोष्टी विणलेल्या आहेत. शिवाय बिरेनकुमार यांची ‘गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डस’मध्ये, जवळजवळ पावणेचार किलोमीटर लांब अशी जगातली सर्वांत लांब साडी विणल्याबद्दलसुद्धा नोंद झाली आहे.

Isha Keskar
सौंदर्यखणी : भारतीय अभिजात कला ‘पाटण पटोला’

रेशमाच्या आळ्यांना हानी न पोचवता काढलेल्या मटका सिल्कच्या धाग्यांपासून हातमागावर विणलेल्या या पर्यावरणपूरक साड्यांना, ‘अहिंसा सिल्क साड्या’ असं नक्कीच म्हणता येईल!

ईशाची पहिली साडी

‘झी मराठी’वरील ‘जय मल्हार’ मालिकेतील ‘बानू’च्या भूमिकेमुळे प्रचंड लोकप्रिय झालेली ईशा केसकर नंतर आपल्याला ‘क्युट शनया’ म्हणूनही भेटली. तिच्या सहज-सुंदर अभिनयामुळे तिला मालिका, चित्रपटांच्या अनेक ऑफर्स आल्या आणि कामात ती पूर्ण बुडून गेली; पण अत्यंत व्यस्त शेड्युलमधून वेळ काढून ती एकदा आई-बाबांबरोबर केरळच्या ट्रिपला गेली होती. ‘मुन्नार’मध्ये ट्रिप आयोजकांनी हातमागावर साड्या कशा विणल्या जातात, हे दाखवायला नेलं होतं. तिथंच विणलेल्या ‘ताज्या’ साड्या विक्रीसाठी ठेवल्या होत्या. ईशाच्या आईला मोह आवरला नाही आणि ‘‘आम्ही दहा मिनिटांत येतो...’’ असं बाबांना सांगून त्या दोघी तिकडे नकळतपणे शिरल्यासुद्धा. तिथे कसला तामझाम नव्हता, काचेची तावदानं नव्हती की कसला भपका नव्हता. पांढऱ्या शुभ्र गाद्यांवर रंगीत साड्या मांडून ठेवल्या होत्या. सिल्कच्या अनेक प्रकारच्या साड्यांचं प्रदर्शनच.

मलबेरी सिल्क, कांची सिल्क, मटका सिल्क आणि सिल्कचे इतर अनेक प्रकार पाहिल्यानंतर तिच्या आईनं एक अतिशय सुंदर केशरी रंगाची एक सिल्कची साडी अंगावर टाकून पाहिली, आणि त्याच क्षणी त्या दोघी त्या साडीच्या प्रेमात पडल्या. कोणत्याही पारंपरिक चौकटीत न बसणाऱ्या त्या साडीला काठ नव्हते; पण अतिशय सुंदर मोर, पदरावर आणि साडीवर ठिकठिकाणी विणलेले होते. साडीची किंमत मात्र बरीच होती. उगाचच इतकी महाग घ्यायची की नाही म्हणून त्या दोघी ‘गहन’ विचारात पडल्या; पण साडीचा मोह स्वस्थ बसू देईना. इतक्यात त्या दोघींना साडी विकत घेण्याचं कारण सापडलं. काही दिवसांनीच ईशाच्या मामेबहिणीचं लग्न होतं, त्या लग्नात तिला किंवा तिच्या आईला ती साडी नेसता येईल....पण तरीही इतकी महाग नको घ्यायला... असा विचारविनिमय चालू असतानाच... ईशाचे बाबा आत आले आणि साडी पाहिल्यावर ते उत्स्फूर्तपणे म्हणाले, ‘‘घेऊन टाका ही साडी.’’ बाबांनी ग्रीन सिग्नल दिला म्हणून ईशानं ती साडी लगेच आईसाठी विकत घेतली आणि दहा मिनिटांसाठी गेलेल्या त्या दोघी, चक्क चाळीस हजारांची एक साडी घेऊन दोन तासांनी बाहेर आल्या. ईशा म्हणाली, ‘‘मला कॉटन किंवा सिल्कच्या ‘सोबर’ साड्या अतिशय आवडतात. या साडीचा प्रकार नक्की कोणता होता हे आता मला आठवत नाही; पण माझ्या ‘टेस्ट’मध्ये बसणारी ही साडी होती म्हणून मी ती लगेच विकत घेतली. मी विकत घेतलेली ही माझी पहिली साडी. मुन्नारला पाहिलेल्या साड्यांच्या त्या खजिन्यामुळे मी साडी या प्रकाराच्या प्रचंड प्रेमात पडले आणि तेव्हापासून मी हळूहळू साड्या घेऊन त्यांचा संग्रह करू लागले आहे.’’

मामेबहिणीच्या लग्नासाठी घेतलेली साडी, ईशाला इतकी आवडली की त्या लग्नाच्या आधीच ईशानं तिच्या एका मित्राच्या लग्नात ती साडी नेसूनसुद्धा टाकली. त्या लग्नात, ईशामुळे त्या साडीचं आणि साडीमुळे ईशाचं सौंदर्य इतकं खुललं होतं, की त्या साडीची खूपच चर्चा झाली. ईशासाठी ती साडी म्हणजे मुन्नारच्या आठवणींचा एक खास ठेवा आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com