सौंदर्यखणी : ‘महावस्त्र’ पैठणी

Paithani
Paithani

सातवाहन काळात तेव्हाच्या प्रतिष्ठान आणि आत्ताच्या पैठणमध्ये हातमागावर पैठणीची निर्मिती होत असल्याचे संदर्भ सापडले आहेत; पण खऱ्या अर्थानं १७ व्या शतकात पेशव्यांनी या उद्योगाला उर्जितावस्था दिली. पेशव्यांच्या घरातील स्त्रियांसाठी पैठणहून पैठण्या मागवल्या जात असत. श्रीमंत थोरल्या बाजीराव पेशव्यांनी, त्यांना हव्या असलेल्या, पैठणी-नक्षीचा नमुना पैठणला पाठवून सुंदर रेशमी धोतर बनवून घेतल्याचा उल्लेख, संदर्भ ग्रंथांमध्ये आढळतो. पुढे पेशव्यांनी पैठणच्या, पैठणी विणणाऱ्या काही कारागिरांना नाशिकजवळ येवल्यात स्थायिक केलं.

पेशवेकालीन पैठण्या, सोळा हात लांब आणि चार हात रुंद असत आणि एकेक पैठणीचं वजन तीन-साडेतीन किलो असायचं! पूर्वी पैठण्यांमध्ये बावीस तोळे चांदी आणि वेगवेगळ्या वजनाचं सोनं वापरलं जात असे. साडेअकरा ग्रॅम सोनं वापरलेल्या पैठणीला ‘बारामासी’, साडेसतरा ग्रॅम सोनं वापरलेल्या पैठणीला ‘अठरामासी’ आणि साडेचौतीस ग्रॅम सोनं असलेल्या पैठणीला ‘छत्तीसमासी’ म्हणत. आता मात्र, चांदीच्या किंवा तांब्याच्या धाग्यांवर सोन्याचं पाणी लावून ‘जर’ तयार केली जाते. सध्या सेमी पैठण्यांमध्ये सिंथेटिक ‘जर’ वापरली जाते.

पूर्वी गर्भरेशमी पैठण्याही बनत असत. यात एक धागा तलम कॉटनचा आणि एक रेशमाचा असतो. आता पुन्हा एकदा डिझायनर गर्भरेशमी पैठण्या विणल्या जात आहेत. तीन ते पाच प्लाय रेशमाचे धागे खूप जवळजवळ म्हणजे एका इंचात १६० उभे आणि १७० आडवे धागे असल्यामुळे पैठणीची वीण घट्ट आणि जाड असते, त्यामुळे ओरिजिनल पैठण्या पिढ्यान्‌पिढ्या टिकतात. पुण्यातील केळकर वस्तुसंग्रहालयात सुमारे दोनशे वर्षांपूर्वीच्या पैठण्या बघायला मिळाल्या. त्यातील एका पोपटी पैठणीचे केशरी-पिवळ्या रंगाचे पारंपरिक नारळी काठ आणि खऱ्या जरीच्या पदरावर विणलेल्या सुंदर कोयऱ्या आणि दुसऱ्या आमसुली रंगाच्या पैठणीचे केशरी रंगाचे पारंपरिक नारळी काठ आणि खऱ्या जरीच्या पदरावर रेशमानं विणलेल्या सुंदर वेलबुट्टींनी पूर्वी पैठण्या किती मनोभावे विणल्या जात असतील याची ग्वाही दिली. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पूर्वी नैसर्गिक रंगांत पैठण्या बनत असल्यानं त्या काही ठराविक रंगांतच येत असत. लाल बॉर्डरची काळी पैठणी म्हणजे ‘चंद्रकळा’, पोपटी रंगाची ‘राघू पैठणी’, ‘क्षीरोदक’ नावाची पांढरी पैठणी, निळ्या रंगाची ‘निलीगुंजी’, पिवळ्या रंगाची ‘सोनकळी’, गुलाबी रंगाची ‘राणी’, लाल-हिरव्या रंगाची ‘पसिला’, काळ्या-पांढऱ्या रंगाची ‘गुजरी’, तर कांद्याच्या रंगाची ‘अबोली’ पैठणी! अंजिरी, दुधी, सोनकुसुंबी रंगाच्या नावानंही पैठण्या असत. आता मात्र अनेक रंगछटांमध्ये पैठण्या असतात. 

पैठणीवरील नक्षीकामाचा सर्वांत जुना प्रकार म्हणजे ‘आसावली’. पदरावर, काठावर पाना-फुलांची सुंदर वेलबुट्टी असलेला. पदरावर, काठावर गोलाकार मोर असल्यास ‘मोरबांगडी’;  पोपट असल्यास ‘मुनिया’, डार्क कॉन्ट्रास्ट बॉर्डर असेल तर ‘कडीयाल’ पैठणी. चौकोनी फुलांच्या नक्षीला ‘अक्रोटी’ म्हटलं जायचं. सातवाहन काळात पैठणीच्या पदरावर बगळे आणि राजहंस, तर यादवकालीन पैठण्यांवर कमळं जास्त असत. मुघलकाळात पानं, फुलं, पक्षी विणले जात असत, तर आता मोर, पोपट, वाद्यं, नथ, कोयऱ्या, कमळ, कळस, राधाकृष्ण वगैरे दिसतात. विणताना पदर आणि काठावरची नक्षी, आलेख पेपरवर काढून घेतली जाते; विणताना पैठणीच्या उभ्या धाग्यांच्या मागे आलेखाचा कागद ठेवला जातो आणि मग डिझाईनप्रमाणे उभे धागे मोजून नक्षीला लागणारे रंगीत रेशमी धागे आडवे टाकून, नक्षी साडीवर उतरवली जाते. पूर्वी फक्त राजघराण्यांमध्ये पैठण्या वापरल्या जात असत, म्हणून पैठणीला ‘महावस्त्र’ म्हटलं जाई. आता प्रत्येक चोखंदळ स्त्रीकडे एक तरी पैठणी असतेच आणि तिचं पैठणीसोबत घट्ट रेशमी नातं असतं... अगदी पैठणीच्या विणीसारखं! 

‘साडी-वेडी’ समृद्धी!
‘फुलाला सुंगध मातीचा’ मालिकेतील गुणी अभिनेत्री म्हणजे समृद्धी केळकर. लहानपणापासून अभिनयाबरोबरच शास्त्रीय नृत्याचीही अभिजात जाण असलेल्या समृद्धीनं, कथक नृत्यात ‘अलंकार’ पदवी संपादन केली आणि आता ती, तिची ही कला तिच्या अनेक विद्यार्थिनींनासुद्धा शिकवत आहे. 

समृद्धीला साड्या नेसायला खूप आवडतात. साडी नेसायची कोणतीही संधी ती सोडत नाही. ‘साडी’वर प्रचंड प्रेम करणाऱ्या समृद्धीनं आपल्या बहिणीच्या लग्नात खास पैठणीच घ्यायची, असं ठरवूनच टाकलं होतं. त्यासाठी ती खास येवल्याला गेली होती. तिथल्या सगळ्या साड्यांमध्ये तिच्या आवडीच्या निळ्या रंगाच्या, खास तिच्या आवडत्या शेडची पैठणी मात्र मिळत नव्हती. मग तिनं कारागिरांना तिच्या मनातल्या निळ्या रंगाची पैठणी विणायला सांगितली. महिन्याभरानं, ऑरेंज काठापदराची निळीशार पैठणी बनून आली, तेव्हा तर समृद्धी कितीतरी वेळ त्या साडीवर हात फिरवीत राहिली आणि पदरावरच्या मोरांशी खूप वेळ हितगुज करत राहिली म्हणे!  

आपल्या पेहरावाच्या बाबतीत चोखंदळ असणाऱ्या समृद्धीकडे अनेक सुंदर साड्यांचा संग्रह आहे. तिच्या स्वर्गवासी आईच्या साड्यासुद्धा, आईची आठवण म्हणून समृद्धीनं, खूप जीवापाड सांभाळून ठेवल्या आहेत. कार्यक्रमांमध्ये आपली आई आपल्याबरोबर राहावी या भावनेनं समृद्धीनं काही साड्यांचे स्वतः डिझाईन करून वेगवेगळे ड्रेस शिवून घेतले आहेत. आईच्या पैठणीचा, तर स्वतः डिझाईन केलेल्या अतिशय हटके पॅटर्नचा, अतिशय सुंदर पायघोळ ड्रेस तिनं शिवून घेतला आहे. आईच्या पारंपरिक पैठणीला आधुनिक ‘टच’ देणाऱ्या समृद्धीकडे अभिनय आणि नृत्याबरोबरच, फॅशनचीसुद्धा एक जबरदस्त जाण आहे, असं म्हणायला हरकत नाही. सध्या तरी मालिकेमुळे दिवसभर साडीत असल्यामुळे ‘साडी-वेडी’ समृद्धी खूपच खूश असते.

‘प्युअर पैठणी’ ओळखायची कशी?
पदरावरचे आणि काठावरचे डिझाईन आणि बुट्टी पुढून आणि मागून सारखीच दिसते आणि प्रत्येक डिझाईनला मागून हाताने मारलेली रेशमाच्या धाग्याची एक खूप बारीक गाठ असते. 

पॉवरलूमवरच्या पैठणीचे धागे मागच्या बाजूनं सुट्टे असतात. ते कशात अडकूही शकतात. मात्र, हातमागावरच्या पैठणीत एकही धागा सुट्टा नसतो. 
हातमागावरील पैठणीचं रेशीम, जाड आणि घट्ट विणीचें असते. मधूनमधून त्या रेशमाच्या बारीक गाठी दिसतात आणि त्यांच्यावरूनच प्युअर सिल्कची खात्री पटते. 

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com