चर्चा प्रिया बापट आणि तिच्या 'अजरख' प्रिटिंगच्या साड्यांची

Priya-Bapat
Priya-Bapat

सुमारे ४०० वर्षांपूर्वी गुजरातमधल्या कच्छच्या राजानं, सिंध प्रांतातून खत्री समाजातल्या काही कारागिरांना बोलावून कच्छमध्ये स्थायिक होऊन त्यांच्याकडील पारंपरिक कला फोफावण्यासाठी मदत केली होती. त्याच समाजातली आज दहावी पिढी गुजरात आणि राजस्थानातल्या काही भागांमध्ये इमाने-इतबारे हे काम करत आहे. कोणती आहे ती कला? नक्षीदार लाकडी ब्लॉक, नैसर्गिक रंगात बुडवून हातानं कापडावर छापण्याची ‘अजरख ब्लॉक प्रिंटिंग’ची कला. 

अरेबिक आणि पर्शियन भाषेत अजरखचा अर्थ आहे निळा रंग. या प्रिंटिंगमध्ये ‘इंडिगो ब्लू’ रंग मुख्य असतो. बाकी डिझाईनमध्ये जांभळा, पिवळा, हिरवा, केशरी यातले काही रंग दिसतात, तर नक्षीची आऊटलाईन काळ्या किंवा पांढऱ्या रंगाची असते. या प्रक्रियेत पांढऱ्या कापडाचं सुंदर नक्षीदार रंगीत कापडात झालेलं रूपांतर पाहून कारागिरांना ‘सॅल्यूट’ करावासा वाटतो! सोळा ते सतरा टप्प्यांमध्ये पूर्ण होणाऱ्या या छपाईपासून कुर्त्याचे कापड, पगड्या आणि साड्या बनतात. प्रिंटिंगसाठीचा प्रत्येक घटक नैसर्गिक असून फक्त कॉटन, सिल्क किंवा लिनन या नैसर्गिक धाग्यांवरच प्रिंटिंग होतं. रंगही नैसर्गिक घटकांपासून बनवले जातात आणि कापड कितीही वेळा धुतले तरी ते जात नाहीत. 

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

अजरख प्रिंटिंगमध्ये कोरं नैसर्गिक धाग्याचं पांढरं कापड घेऊन ते निलगिरी तेल किंवा शेंगदाणा तेल, सोडा आणि उंटाचं शेण एकत्रित करून त्यात रात्रभर भिजवत ठेवून दुसऱ्या दिवशी पाण्यानं धुवून ही प्रक्रिया स्टार्च जाईपर्यंत दोन ते तीन वेळा परत-परत केली जाते, मग पाण्यात ते कापड उकळून घेतलं जातं, त्यामुळे कापड एकदम मऊ होतं आणि त्यावर कोणतेही रंग एकसारखे आणि कायमचे बसतात. दुसऱ्या दिवशी हिरड्याच्या पाण्यात ते कापड भिजवून ठेवलं जातं, त्यामुळे एक छान पिवळसर रंग चढतो. उन्हात वाळवल्यानंतर हे कापड ब्लॉक प्रिंटिंगसाठी तयार होतं. ब्लॉक प्रिंटिंगही अनेक टप्प्यांत होतं. सर्वांत आधी चुना आणि अरेबिक गम एकत्र करून याची पेस्ट केली जाते, या पेस्टमध्ये लाकडी नक्षीदार ब्लॉक बुडवून एकेक करून शेजारी-शेजारी छापून घेतले जातात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

पेस्ट वाळल्यावर हीच क्रिया कापड उलटं करून तंतोतंत त्याच डिझाईनच्या मागच्या बाजूनेही ब्लॉक छापले जातात. याला ‘रेझिस्ट प्रिंटिंग’ म्हणतात, म्हणजे नंतर ज्या रंगांत कापड बुडवलं जातं तो रंग, या ‘प्रिंटिंग’चं डिझाईन सोडून इतर ठिकाणी लागतो आणि ‘रेझिस्ट प्रिंटिंग’च्या जागी पांढरा रंग राहतो. नंतर काळ्या रंगाच्या प्रिंटिंगच्या डिझाईनचे ब्लॉक वापरून पुढच्या टप्प्याचं प्रिंटिंग केलं जातं, यात ‘रेझिस्ट प्रिंटिंग’ सोडून उरलेल्या मोकळ्या जागेत डिझाईन छापलं जातं. त्याच्या पुढच्या टप्प्यात तुरटी, माती किंवा अलिझरी नावाचा घटक वापरून पिवळ्या किंवा लाल रंगाचं ब्लॉक प्रिंटिंग केलं जातं. शेवटी कापड इंडिगो रंगात दोनदा बुडवून वाळवलं जातं. इथं खरी गंमत असते. जिथं आधीच्या तीन टप्प्यांत प्रिंटिंग झालेलं असतं ते सोडून बाकीचं कापड इंडिगो ब्लू रंगाचं होतं. शेवटी ते कापड परत पाण्यात उकळलं जातं. या प्रक्रियेत प्रत्येक टप्प्याला एकेक दिवस जातो- म्हणून एका साडीला अठरा ते वीस दिवस लागतात! यामुळे साड्या महाग असल्या, तरी ‘हटके लूक’मुळे ग्राहकांच्या पसंतीस पडतात.

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

जुनी कला
उत्खननात सापडलेल्या, हडप्पा, मोहेंजोदारो संस्कृतीतल्या शिल्पांच्या अंगावर अजरख प्रिंटिंगच्याच पद्धतीचं कापड गुंडाळलेलं दिसतं. यावरून ही कला किती जुनी आहे, याचे संदर्भ मिळतात. अशाच प्रकारचं प्रिंटिंग इजिप्तमधील कैरो भागातल्या उत्खननातदेखील सापडलं आहे.  

प्रियाचं ‘अजरख’ प्रेम!
अभिनेत्री प्रिया बापटनं अभिनयाबरोबरच अजून एक ‘पॅशन’ जोपासली आहे. प्रिया मासकॉम शिकत असताना तिची बहीण श्वेता टेक्सटाईल आणि फॅशन डिझायनिंगचं शिक्षण घेत होती. तेव्हा प्रिया, श्वेताला घरात ब्लॉक, बाटिक प्रिंटिंग वगैरे करताना पाहत असे. ते पाहून प्रिया, ‘ब्लॉक प्रिंटिंग’च्या प्रेमात पडली. निरनिराळे फॅब्रिक्स, त्यांची नावं, पोत, रंग, हातामागावरचे विणकाम, ‘अजरख प्रिंटिंग’.... या विश्वात ती श्वेताचा हात धरून शिरली आणि हरखून गेली!

 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

A post shared by Priya Bapat (@priyabapat)

पुढे श्वेतानं हातमागावर काम करणाऱ्या कुशल विणकरांसोबत अनेक प्रोजेक्ट्स केले; पण लॉकडाऊनच्या काळात व्यवसाय ठप्प झालेल्या त्या विणकरांचा श्वेताला मदतीसाठी फोन आला. श्वेता आणि प्रियानं त्या कलेला जिवंत ठेवण्यासाठी त्यांच्याकडच्या साड्या सोशल मीडियाद्वारे ग्राहकांपर्यंत पोचवल्या. साड्यांना पसंती आणि विणकरांना उत्पन्न मिळू लागलं.    

प्रिया म्हणाली, ‘‘हातमागावर साडी विणणं, ‘अजरख ब्लॉक प्रिंटिंग’ वगैरे इतकं कष्टाचं आणि क्लिष्ट काम आहे, की माझ्या मनात त्या विणकरांसाठी कमालीचा आदर निर्माण झाला आहे. त्यांच्या या कष्टाला आणि कलेला, प्रोत्साहन आणि योग्य किंमत मिळायलाच पाहिजे असं मी आणि श्वेतानं ठरवून टाकलं.’’ मग पुढे प्रिया आणि श्वेता मिळून कॉटन आणि सिल्कच्या सुंदर साड्या कारागिरांकडून बनवून घेऊ लागल्या. त्या साड्या इतक्या सुंदर बनल्या, की त्या सगळ्या उपक्रमाचं पुढे व्यवसायात रूपांतर झालं. परंतु, त्यांच्या व्यवसायाचं क्षितिज त्यांनी स्वतः आखून घेतलं. त्या फक्त हॅन्डलूमवर विणलेल्या आणि नैसर्गिक रंग वापरून केलेल्या ब्लॉक प्रिंटिंगच्या साड्याच विणकरांकडून हव्या तशा बनवून घेतात. दोघींनी या क्षेत्रात खूप नवनवीन प्रयोग केले. आता तर, श्वेताच्या स्वतःच्या डिझाईनचे ब्लॉक्सही बनू लागले आहेत. त्यांच्या प्रयोगातूनच त्यांचं पारंपरिक साड्यांचं एक नवं कलेक्शन उभं राहत आहे. विणकरांकडून घेतलेल्या कलेक्शनची पहिली ‘अजरख ब्लॉक प्रिंटिंग’ची साडी प्रियासाठी खूप खास आहे. मोडाल सिल्कवर प्रिंट केलेल्या या साडीच्या पदरावर नक्षीदार ब्लॉकनं अजरख प्रिंटिंग केलं आहे आणि साडीच्या मधल्या भागात ‘अजरख’च्या मोठ्या ब्लॉकवर ब्रशनं सुंदर स्ट्रोक दिले आहेत. प्रियाला ही साडी इतकी आवडली, की तिनं ही साडी खास फोटो शूटदेखील करून घेतलं. प्रिया ही साडी नेसते तेव्हा, त्या विणकरांना आणि अजरख ब्लॉक प्रिंटिंग करणाऱ्या कलाकारांना मनातून ‘सॅल्यूट’ करत असावी!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com