सौंदर्यखणी : भरजरी सौंदर्याची झुळझुळीत साडी ‘बनारसी खड्डी जॉर्जेट’

गंगेच्या किनाऱ्यावर वसलेल्या सुंदर बनारसची अजून एक सुरेख साडी म्हणजे - ‘खड्डी जॉर्जेट!’ ‘खड्डी’ म्हणजे हातमाग, बनारसी शैलीत ‘जरी’काम करून हातमागावर विणलेली जॉर्जेटची साडी म्हणजे ‘बनारसी खड्डी जॉर्जेट साडी.’
amruta khanvilkar
amruta khanvilkarsakal
Summary

गंगेच्या किनाऱ्यावर वसलेल्या सुंदर बनारसची अजून एक सुरेख साडी म्हणजे - ‘खड्डी जॉर्जेट!’ ‘खड्डी’ म्हणजे हातमाग, बनारसी शैलीत ‘जरी’काम करून हातमागावर विणलेली जॉर्जेटची साडी म्हणजे ‘बनारसी खड्डी जॉर्जेट साडी.’

गंगेच्या किनाऱ्यावर वसलेल्या सुंदर बनारसची अजून एक सुरेख साडी म्हणजे - ‘खड्डी जॉर्जेट!’ ‘खड्डी’ म्हणजे हातमाग, बनारसी शैलीत ‘जरी’काम करून हातमागावर विणलेली जॉर्जेटची साडी म्हणजे ‘बनारसी खड्डी जॉर्जेट साडी.’

जॉर्जेट आणि शिफॉनचं कापड थोडंफार सारखं दिसत असलं, तरी बारकाईनं पाहिल्यास त्यांच्यात फरक जाणवतो. जॉर्जेट आणि शिफॉन या दोन्ही कापडाच्या धाग्यांमध्ये फरक असतो आणि त्यामुळे या फॅब्रिक्समध्ये तो दिसून येतो. सिल्क, कॉटन, नायलॉन, पॉलिस्टर किंवा व्हिस्कॉसचे तंतू इंग्रजी ‘एस’ आकारात, मशिनवर ‘अँटिक्लॉकवाइज’ पीळ देऊन जे धागे (यार्न) तयार होतात, ते धागे ‘तान्या-बाण्यात लावून ‘प्लेन-वीव्ह’मध्ये विणले तर जॉर्जेट फॅब्रिक तयार होतं आणि तेच तंतू इंग्रजी ‘झेड’ आकारात ‘क्लॉक वाईज’ पीळ देऊन तयार केलेल्या यार्नपासून फॅब्रिक विणलं तर शिफॉनचं फॅब्रिक तयार होतं. शिफॉन, जॉर्जेटपेक्षा जास्त पातळ, नाजूक आणि पारदर्शक असतं. जॉर्जेटच्या कापडाला यार्नमुळे खास ‘टेक्श्चर’ आलेलं असतं. जॉर्जेटच्या कापडात बारीक ग्रेन्स जाणवतात आणि तीच ओरिजिनल जॉर्जेटची ओळख आहे. शिवाय जॉर्जेटचं कापड जास्त टिकाऊ असून रंग व्यवस्थित शोषून घेतात. जॉर्जेटच्या अनेक गुणधर्मांमुळे बनारसमध्ये मोठ्या प्रमाणात बनारसी खड्डी जॉर्जेट साड्या विणल्या जातात.

बनारसी जॉर्जेटच्या साड्या विणण्यासाठी खास त्यासाठी वापरले जाणारे सिल्कचे ‘एस ट्विस्ट’चे पांढरे धागे हातमागावर ‘तान्या-बाण्यात’ लावून घेतले जातात. विणकाम अचूक होण्यासाठी धाग्यांना आधीपासूनच किंचित स्टार्च केलेलं असतं. साडी विणता-विणताच त्यात जरीचे आडवे धागे टाकून बनारसी शैलीत काठापदरावरची भरजरी नक्षी आणि साडीच्या मधले बुट्टे विणले जातात. यासाठी उच्च प्रतीची ‘गोल्ड प्लेटेड’ किंवा ‘सिल्व्हर प्लेटेड’ टेस्टेड जर वापरली जाते. साडीवरचं हे जरीचं नक्षीकाम ‘कढुआ’ किंवा ‘फेकुआ’ पद्धतीनं केलं जातं. ‘फेकुआ’ पद्धतीत ‘शटल’नं आडवे टाकलेले धागे साडीच्या आतल्या बाजूनं ‘फ्लोटिंग’मध्ये राहतात आणि साडी पूर्ण विणून झाल्यावर जास्तीचे असणारे ते ‘फ्लोटिंग’चे धागे अत्यंत बारकाईनं कापले जातात. अशा साड्यांना बनारसी कटवर्कच्या साड्या असंही म्हटलं जातं. ‘कढुआ’ पद्धतीत नक्षीनुसार ‘जरी’चे धागे आडवे टाकल्यानंतर वळवून घेतले जातात, त्यामुळे साडीच्या आतल्या बाजूनं ‘फ्लोटिंग’चे धागे नसतात. ‘कढुआ’काम जास्त कौशल्याचं असून त्याला ‘फेकुआ’पेक्षा दुप्पट वेळ लागतो, त्यामुळे ‘कढुआ’च्या साड्या जास्त महाग असतात.

साडीवरील नक्षीनुसार जॉर्जेट बनारसी साडीचे उपप्रकारदेखील पडतात, जसे की ‘जालावर्क’ किंवा ‘बुट्टेदार’ इत्यादी. त्यातील बुट्टेदार जॉर्जेट बनारसी जास्त लोकप्रिय आहे. गोल्डन किंवा सिल्व्हर ‘जर’ वापरून विणून तयार झालेली ही साडी पूर्ण पांढरी असते. अशी तयार झालेली साडी पुढे ‘खराई’काम करणाऱ्या ‘खरारी’ कलाकारांकडे पाठवली जाते. ‘खराई’मध्ये साडीच्या धाग्यांमध्ये असलेला स्टार्च काढून टाकला जातो. त्यासाठी ठरावीक साबणाचं लिक्विड, ठरावीक प्रमाणात पाण्यात टाकून त्या मिश्रणात काही वेळ साडी बुडवून ठेवली जाते आणि हलक्या हातानं साडीतला स्टार्च काढून टाकला जातो आणि मग साडी वाळवून पुढच्या प्रक्रियेसाठी पाठवली जाते. स्टार्च काढून टाकल्यामुळे साडी एकदम मऊ-सुळसुळीत आणि हलकी होते. ‘खराई’नंतर साडी ‘रंगाई’ला जाते. साडी डाय करणारे कुशल कलाकार ती साडी विशिष्ट प्रकारे डाय करतात. उकळत्या पाण्यात साडीचा ठरलेला रंग आणि मीठ ठरावीक प्रमाणात टाकून ‘डाय’चं मिश्रण तयार करून घेतलं जातं.

साडी ‘डाय’मध्ये टाकण्यापूर्वी साध्या पाण्यात बुडवून निथळून मग ‘डाय’मध्ये टाकली जाते आणि त्यात साडी थोडा वेळ उकळून घेतली जाते. कॉन्ट्रास्ट काठ-पदर असेल, तर साडी गुंडाळून काठा-पदराच्या तेवढ्या भागाला पॉलिथिनचं शीट दोऱ्यांनी घट्ट बांधलं जातं आणि साडी, तिचा मधला भाग ‘डाय’ करण्यासाठी ‘डाय’मध्ये टाकली जाते- जेणेकरून पॉलिथीन लावलेल्या भागात रंग शिरत नाही. मधला भाग ‘डाय’ झाल्यावर नंतर त्या भागाला आता पॉलिथीन बांधलं जातं आणि काठापदराचं बांधलेलं पॉलिथीन सोडून तो भाग ‘डाय’ करून घेतला जातो. नंतर साडी निथळून ‘ड्रायर’मध्ये टाकून, साडी बऱ्यापैकी वाळल्यानंतर ते दोरे सोडले जातात आणि साडी उलगडली जाते. ती पूर्ण वाळवून पुढे फिनिशिंगला पाठवली जाते. ‘फिनिशिंग’च्या टप्प्यावर संपूर्ण साडीवर पाण्याचा बारीक फवारा उडवून एका लाकडी मोठ्या आणि जाड रुळावर ती साडी ताणून गुंडाळली जाते आणि वाळवण्यासाठी काही तास तशीच ठेवली जाते. जास्त थंडीच्या दिवसात साड्यांजवळ निखारे ठेवून वातावरण ऊबदार केलं जातं.

बनारसच्या वेगवेगळ्या साड्यांमध्ये या साडीला स्वतःची खास ओळख आहे, कारण सुंदर भरजरी दिसणारी ही साडी नेसायला मात्र जॉर्जेटच्या फॅब्रिकमुळे हलकी-फुलकी असते. त्यामुळे या झुळझुळीत साडीचं भरजरी सौंदर्य हीच या साडीची खासियत आहे.

गोष्ट एका ‘फोटो-शूट’ची

‘आता वाजले की बारा’, या लावणीवर, अमृता खानविलकरनं केलेलं नृत्य बघून कोणालाही खरं वाटणार नाही, की अमृतानं कोणत्याही नृत्यातलं शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेतलं नसून, ‘नृत्यकला’ तिला लहानपणापासूनच उपजत आहे. नृत्यकला तिनं स्वतः विकसित केली असून, तिच्या लयबद्ध नृत्याबरोबरच तिचा कसदार अभिनयही आपण अनेक चित्रपटांमधून पाहिला आहे. अमृताचं सतत शूटिंग, नृत्याची रिहर्सल्स, सादरीकरण, रिॲलिटी शोज आणि फोटो शूट, असं बरंच काही चालू असतं. कामानिमित्त, नेहमी होणाऱ्या फोटो-शूटमधलं एक ‘फोटो-शूट’ मात्र तिच्या खास लक्षात राहिलं.

यंदाच्या दिवाळीत अमृतानं अत्यंत व्यग्र शेड्युलमधून कुटुंबासाठी खास वेळ राखून ठेवला होता. दिवाळीत ‘सोशल-मीडिया’साठी फोटो-शूटसुद्धा करायचं नाही असं तिनं पक्क ठरवलं होतं! तिची अत्यंत आवडीची गोष्ट म्हणजे साडीखरेदी. अमृता सतत स्वतःसाठी, आईसाठी, बहिणीसाठी साडीखरेदी करत असते. पैठणी आणि बनारसी हे प्रकार तिला आवडतात. तिच्याकडे आणि तिनं तिच्या आईला भेट म्हणून दिलेल्या पैठण्यांचा आणि बनारसी साड्यांचा खूप मोठा संग्रह आहे. तिची ही, साडी भेट देण्याची परंपरा वर्षानुवर्षं सुरू आहे. या दिवाळीत तर अमृतानं चक्क तिच्या छोट्याशा भाचीला- नूरवीला एक छोटीशी नऊवार साडी शिवून घेतली आणि भेट दिली. अमृता लहानपणी सतत तिच्या आईच्या साड्या नेसून बसत असे. लहानपणी तिला वाटे, की आपल्याकडेही स्वतःची साडी असावी- म्हणूनच कदाचित तिनं नूरवीला इतक्या लहानपणी तिची अशी साडी भेट दिली!

यंदाच्या दिवाळीत अमृता ऑनलाइन साडीखरेदीसाठी एखाद्या चांगल्या साडीच्या शोधात होती. तिला ‘ऑरा बनारस’ यांचं बनारसी साड्यांचं कलेक्शन प्रचंड आवडलं. तिनं त्यातील, एक सुंदर निळ्या रंगाची खड्डी जॉर्जेट बनारसी साडी निवडून ठेवली आणि वेळ मिळाल्यावर ऑर्डर करण्याचं असं ठरवलं; पण चार-पाच दिवसांत थेट तिच्या घरी ती साडी दिवाळी-भेट म्हणून आलीदेखील. ‘ऑरा बनारस’चे अर्पिता आणि हर्षवर्धन अगरवाल हे तिच्या कलेचे फॅन असून, त्यांनी ती साडी बनारसहून भेट म्हणून पाठवली. अमृताला ती इतकी आवडली, की फोटो शूट न करण्याचा निर्धार केलेल्या अमृतानं ताबडतोब त्या साडीत फोटो-शूट करायचं ठरवलं. ‘फोटो-शूट’चं ठिकाण ठरलं- अमृताच्या घराची गच्ची आणि वेळ ठरली टळटळीत उन्हात दुपारी बारा वाजता!

तेव्हा श्रुती बागवे या अनुभवी फोटोग्राफरनं इतके कमाल फोटो काढले, की फोटो बघून कुणालाच कळालं नाही, की ते फोटो गच्चीत काढले होते! फोटोंतल्या त्या पांढऱ्याशुभ्र पार्श्वभूमीवर निळीशार बनारसी जॉर्जेट साडी फारच सुरेख दिसत होती. अमृतानं त्या साडीवर घरातलंच तिच्याकडचं सोनसळी पिवळ्या रंगाचं ब्लाउज ‘पेअर’ केलं होतं आणि साडीवर ते फार सुंदर दिसत होतं. दिवाळीचं शूट असूनसुद्धा, पणत्या ठेवताना आणि रांगोळ्या काढतानाचे फोटो न काढता अमृताच्या हातात हेलकावे घेणारा लालबुंद आकाशकंदिल फार सुरेख दिसत होता.

अमृताच्या त्या खास साडीच्या त्या हटके ‘फोटो-शूट’वर अधिराज्य गाजवलं तेही महिलांनीच.

या शूटसाठी मेकअप तिनं स्वतः केला असून, जयश्री शहा या गुणी हेअर आर्टिस्टनं साडीला साजेशी सुंदर हेअरस्टाईल केली. शिवाय अमृताच्या मंजिरी आणि सायली या लाडक्या मैत्रिणींनी खास या ‘फोटो-शूट’साठी चांदीचे दागिने दिले. मंजिरी ओकनं दिलेला वेगळ्याच धाटणीचा चोकर चांदीचा असूनही साडीवरच्या सोनेरी बुट्ट्यांवर उठून दिसत होता. शिवाय पुण्याच्या सायली मराठेनं खास चांदीची सुंदर नथ या ‘फोटो-शूट’साठी पाठवली. अमृता, दागिन्यांच्या बाबतीतसुद्धा खूप चोखंदळ आहे. तिला नखशिखान्त दागिने घालायला बिलकुल आवडत नाही. अमृता म्हणाली, ‘‘मी साडीवर कमीत कमी दागिने घालते आणि तेही सुंदर असे ‘स्टेटमेंट पिसेस!’ त्यामुळे साडी जास्त खुलून दिसते. माझा साड्यांचा संग्रह म्हणजे माझा खजिना आहे आणि त्यातली एकेक मौल्यवान साडी मी मलमलच्या कापडात गुंडाळून ठेवून जतन करते. खास या साडीचं फोटो-शूट करताना आणि ती साडी मिरवताना मला जाम मजा आली होती!’’

असं हे फार तामझाम न करता, आपापल्या क्षेत्रात पारंगत असलेल्या स्त्रियांनी मिळून केलेलं ‘फोटो-शूट’ खूपच भारी झालं आणि तेव्हा त्या सुंदर रॉयल ब्लू बनारसी जॉर्जेट साडीतली अमृता कमालीची सुंदर दिसत होती!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com