सौंदर्यखणी : नंदनवनातील सौंदर्याचा साज : काश्मिरी साडी!

काश्मीरच्या पश्मीना साडीच्या पश्मीना फॅब्रिकला ‘भौगोलिक स्थानदर्शक प्रमाणपत्र’ मिळालं आहे. पश्मीना हा शब्द ‘पश्मीन’ या मूळच्या पर्शियन शब्दापासून तयार झाला असून, ‘पश्मीन’ म्हणजे लोकर.
सौंदर्यखणी : नंदनवनातील सौंदर्याचा साज : काश्मिरी साडी!

काश्मीरच्या निसर्गाइतकंच, काश्मीरमध्ये उगम पावलेल्या कलांमध्येसुद्धा अस्मानी सौंदर्य डोकावतांना दिसतं. आपल्याला ढोबळमानाने फक्त काश्मिरी शाली माहिती असतात; परंतु काश्मीरच्या साड्यासुद्धा सुंदर कलाकृतींचा अप्रतिम नमुना असतात. काश्मीरच्या स्थानिक स्त्रियांचा ‘साडी’ हा पारंपरिक पेहेराव नसला, तरी काश्मिरी-वर्कचा वापर करून पर्यटकांसाठी मोठ्या प्रमाणात काश्मिरी साड्या बनवल्या जातात.

काश्मीरच्या पश्मीना साडीच्या पश्मीना फॅब्रिकला ‘भौगोलिक स्थानदर्शक प्रमाणपत्र’ मिळालं आहे. पश्मीना हा शब्द ‘पश्मीन’ या मूळच्या पर्शियन शब्दापासून तयार झाला असून, ‘पश्मीन’ म्हणजे लोकर. काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये आढळणाऱ्या ‘चांगपा’ नावाच्या शेळ्यांच्या केसांपासून चरख्यावर हातानं ‘कताई’ करून अतिशय तलम, मऊ आणि ऊबदार असे पश्मीनचे धागे बनविले जातात. दुर्मीळ आणि अत्यंत महाग ओरिजिनल पश्मीन धाग्यांना ‘सॉफ्ट गोल्ड’देखील म्हटलं जातं. या धाग्यांपासून पश्मीना शाली आणि साड्या विणल्या जातात.

चिनॉन, सिल्क, जॉर्जेट किंवा क्रेपवरसुद्धा ‘काश्मिरी-वर्क’ करून निरनिराळ्या साड्या तयार होतात. काश्मिरी साड्यांची खासियत म्हणजे त्यावर हातानं केलं जाणारं काश्मिरी-भरतकाम. काश्मिरी साडीवर केला जाणारा ‘आरी-वर्क’ हा कलाप्रकार अंदाजे बाराव्या शतकातील. ‘आरी-वर्क’साठी साडीवर आधी डिझाईन छापून घेतलं जातं. बारीक ‘चेन-स्टीच’सारखे दिसणारे टाके एकामागोमाग चिकटून घालते जातात आणि संपूर्ण डिझाईन ‘आरी-वर्क’नं भरलं जातं. यासाठी क्रोशावर्कच्या सुईसारखी; पण अत्यंत बारीक अशी लांब सुई वापरली जाते. सुई धरण्यासाठी हॅन्डल असतं आणि स्थानिक भाषेत या सुईला ‘तंबोर’ किंवा ‘आर’ म्हणतात. ‘आरी-वर्क’ करताना रेशमाचे रंगीत धागे साडीच्या खाली धरले जातात आणि वरून ती सुई पेनसारखी पकडून साडीच्या आरपार टाकून सुईच्या टोकावर असलेल्या बारीक ‘हुक’नं खालचा धागा उचलून घेऊन ‘चेन-स्टीच’ टाकली जाते.

‘आरी-वर्क’मध्ये दोन प्रकार आहेत : ‘रासकार आरी’ आणि ‘पोसकार आरी’. ‘रासकार आरी’मध्ये फक्त तीन रंगांचे धागे वापरले जातात आणि नक्षीत काश्मीरमधील निरनिराळ्या फुलांच्या कळ्या असतात. ‘पोसकार आरी’मध्ये तीनपेक्षा जास्त रंगांचे धागे असतात आणि नक्षीत फुलं भरलेली असतात. कारागीर दिवसभर बसून अखंडपणे ती सुई निगुतीनं साडीच्या आरपार घालून खालचा धागा वर आणताना पाहिल्यावर अचंबित व्हायला होतं. काही डिझाइन्समध्ये ‘आरी-वर्क’बरोबर, ‘तिला-वर्क’सुद्धा केलं जातं. ‘तिला-वर्क’ला ‘तिलादोझी’देखील म्हटलं जातं. ‘तिलादोझी’साठी नेहमीची सुई आणि दोन धागे वापरले जातात. यातील सुट्टा धागा नक्षीप्रमाणे लावून घेतला जातो आणि सुईतल्या दुसऱ्या धाग्यानं तो टाचून घेतला जातो. प्रामुख्यानं ‘जरी’चा धागा लावून घेण्यासाठी या पद्धतीचा वापर केला जात असे. छायाचित्रात गौतमीच्या साडीवर ‘आरी-वर्क’ आणि ‘तिला-वर्क’ आहे.

काश्मिरी-भरतकाम केलेल्या साड्यांव्यतिरिक्त काश्मीरची अजून एक सुंदर वीण म्हणजे ‘कानी-वीण’. पंधराव्या शतकात या विणीत बारीक नक्षीकामाचे गालिचे विणले जात असत. त्यांच्यावरून शाली विणण्याची कल्पना पुढे आली आणि पश्मीन धागे वापरून कानी-विणीत पश्मीना शाली विणल्या जाऊ लागल्या. पुढे रॉयल फॅमिलींसाठी ऑर्डरनुसार ‘पश्मिना-कानी’ साड्या विणल्या जाऊ लागल्या. ओरिजिनल ‘पश्मिना-कानी’ साड्यांची किंमत पंधरा ते वीस लाख रुपये असते. ‘पश्मीना-कानी’ला जगातलं सर्वांत महाग फॅब्रिक मानलं जातं. इतक्या ‘उंची साड्या’ सगळ्यांच्या आवाक्यातल्या नसल्यामुळे इतर फॅब्रिकवरही कानी-विणीत साड्या विणल्या जातात. दोन्ही बाजूंना टोक असलेल्या छोट्या लाकडी काड्यांवर नक्षीतील रंगीत धागे गुंडाळले जातात. या काड्यांना ‘कानी’ म्हणतात. हातमागावर नक्षीनुसार रंगीत धागे टाकण्यासाठी त्यांचा वापर केला जातो. जितकी बारीक नक्षी आणि जितके रंग तितक्या अनेक काड्या. विणकर तान्यातले उभे धागे मोजून आडव्या धाग्यांसाठी एकेक कानी टाकत जातात आणि अशी प्रत्येक ओळ विणली जाते. ओरिजिनल कानी साडी विणायला एक-दीड वर्षदेखील लागू शकतं, त्यामुळे किंमत जास्त असते. या साड्या माफक दरात उपलब्ध होण्यासाठी पॉवरलूमवरसुद्धा विणण्याचे प्रयोग होत आहेत; पण अशा साड्यांच्या उलट्या बाजूने विणकामाचे आडवे धागे ‘फ्लोटिंग’ राहतात, त्यामुळे दागिने वगैरे अडकू शकतात. कानी साड्या किंवा आरी-वर्कच्या काश्मिरी साड्या पाहिल्यावर आपण काश्मीरच्या अजूनच प्रेमात पडतो आणि कारागिरी बघून कारागीरांविषयी फार आदर वाटू लागतो.

अतिशय जुनी वीण

सोळाव्या शतकात भारताच्या उत्तरेकडील भागात, मुघल साम्राज्यामध्ये बादशहा अकबराकडून उत्तम कामगिरी केलेल्या सरदारांना दरबारात बोलावून त्यांचा ‘खिलत’ देऊन सन्मान केला जात असे. ‘खिलत’ म्हणजे उंची वस्त्रं तबकात ठेवून भेट दिली जात असत. या ‘खिलत’मध्ये पश्मीनाचे अंगरखे आणि शाली असल्याचा उल्लेख आढळतो.

गौतमीची पहिलीवहिली साडी

‘माझा होशील ना?’ मालिकेतून प्रसिद्धीच्या झोतात आलेली गौतमी देशपांडे, इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत असताना, आवड आणि हौस म्हणून थिएटर करत होती. पदवी घेतल्यानंतर ती एका ‘आयटी’ कंपनीत नोकरीसुद्धा करत होती. गौतमी अतिशय उत्तम गातेसुद्धा. या कलांची आवड असलेली गौतमी नोकरीत काही रमेना. मग तिनंसुद्धा तिच्या ताईसारखं म्हणजे मृण्मयीप्रमाणेच या क्षेत्रात यायचं ठरवलं आणि ‘सारे तुझ्यासाठी’ मालिकेतून या क्षेत्रात आली.

गौतमीच्या आई-वडिलांना भटकंतीची खूप आवड. काश्मीर हे त्यांचं आवडतं ठिकाण. ते नेहमी काश्मीरला फिरायला जात असत, गौतमी आणि मृण्मयीलासुद्धा घेऊन ते दोनदा काश्मीरला जाऊन आले. गौतमी लहान असतानाच काश्मीरच्या निसर्गाच्या आणि तिथल्या वस्तूंच्या प्रचंड प्रेमात पडली. तिथल्या कलाकुसरीच्या वस्तू, काश्मिरी कानी विणीतल्या आणि ‘आरी-वर्क’च्या शाली आणि साड्यांची खरेदी म्हणजे तर गौतमीसाठी एक आनंद-सोहळाच. काश्मिरी साड्या नेसलेल्या तिथं फिरायला आलेल्या सुंदर मुली पाहून तर गौतमी कायमच हरखून जात असे. त्यामुळे काश्मिरी वर्कच्या नाजूक नक्षीकामानं भरलेल्या साड्यांची आवर्जून खरेदी होत असे. गौतमीचे बाबा, गौतमीच्या आईसाठी कायमच सुंदर काश्मिरी साड्या घेत असत. त्या कलाकृतीवर गौतमी भारावून जाऊन हात फिरवत राही.

गौतमी, शाळेत असताना ‘जलतरंग’सारखा दुर्मीळ वाद्यप्रकार खुबीनं वाजवीत असे. एका स्नेहसंमेलनात जलतरंग वादनाच्या कलेचं ती पहिल्यांदाच स्टेजवर सादरीकरण करणार होती. सादरीकरणाच्या दोन दिवस आधी, वाद्यवृंदातल्या सगळ्या मुलींना शिक्षकांनी साडी नेसायला सांगितलं. गौतमीला प्रचंड आनंद झाला. शाळेतून घरी येतानाच तिनं आईची ब्लॅक कलरची काश्मिरी साडी नेसायची, असं मनोमन ठरवूनसुद्धा टाकलं. कार्यक्रमाच्या आदल्या रात्री आईच्या ब्लाऊजला टक्स मारायचा कार्यक्रम झाला आणि दुसऱ्या दिवशी आईनं तिला ती सुंदर साडी नेसवली. गौतमी आयुष्यात पहिल्यांदा साडी नेसली होती आणि तीसुद्धा आपल्या आवडीची म्हणून जाम खूश होती. तिथं तिच्या वादनकलेचं आणि तिच्या साडीचं भरभरून कौतुक झालं. कलेत रमणाऱ्या आणि दुसऱ्या कलाप्रकारांची उत्तम जाण असणाऱ्या गौतमीसाठी ती काश्मिरी कलाकुसरीची साडी खास आहे- कारण ही साडी तिची आयुष्यात पहिल्यांदा नेसलेली साडी आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com