सौंदर्यखणी : ‘स्किन-फ्रेंडली’ मशरू ! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Madhura Deshpande
सौंदर्यखणी : ‘स्किन-फ्रेंडली’ मशरू !

सौंदर्यखणी : ‘स्किन-फ्रेंडली’ मशरू !

sakal_logo
By
रश्मी विनोद सातव

सोळाव्या शतकातल्या मुघल साम्राज्याच्या कारभाराचा इत्थंभूत तपशील, ‘आईन-ए-अकबरी’ या दस्तऐवजात लिहून ठेवला आहे. या ‘आईन-ए-अकबरी’मध्ये ‘मशरू’ नावाच्या वस्त्राचा उल्लेख आढळतो. यावरून या वस्त्राच्या निर्मितीच्या कालखंडाचा अंदाज येतो. मुघल साम्राज्यात काही घराण्यांमध्ये सिल्कच्या कापडाचा त्वचेला होणारा थेट स्पर्श वर्ज्य मानला जात असे. त्यामुळे सिल्क आणि कॉटनचे धागे एका विशिष्ट पद्धतीने गुंफून एक खास वस्त्र विणलं जात असे आणि त्या वस्त्राचं नाव होतं- ‘मशरू!’

‘मशरू’ हा अरेबिक शब्द असून, मशरू म्हणजे ‘कायद्यानं परवानगी दिलेलं!’ मुघल साम्राज्यात गुजरातच्या काही प्रांतांमध्ये मशरूचं विणकाम होत असे, नंतर महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेशातील काही भागात आणि आंध्र प्रदेश, तंजावर आणि तत्कालीन मद्रास प्रांतातसुद्धा मशरूचं विणकाम होऊ लागलं, परंतु काळाच्या ओघात हातमागावरची ही वीण नामशेष होऊ लागली होती. पुढे गुजरातमधील सोळंकी घराण्यातील ‘सिद्धराज जयसिंग’ या राजाने या विणीला राजाश्रय दिला. आजही तिथं हातमागावर पाटण आणि कच्छमध्ये काही विणकर मशरूचं विणकाम पारंपरिक पद्धतीनं करत आहेत. पारंपरिक मशरू विणणारे विणकर आता फारसे शिल्लक नाहीत, परंतु देशात इतर ठिकाणी व्यावसायिकदृष्ट्या पॉवरलूमवर मशरूचं फॅब्रिक आणि मशरूच्या साड्या मात्र मागणीनुसार विणल्या जात आहेत.

मशरू सिल्कची साडी विणताना हातमागावर उच्च प्रतीचे रेशमाचे धागे उभे लावून घेतले जातात आणि उच्च प्रतीचे कॉटनचे धागे आडवे टाकून ही साडी अशा विशिष्ट पद्धतीनं विणली जाते, की साडीच्या दर्शनी बाजूवर सगळे रेशमाचे धागे येतात आणि कॉटनचे धागे खाली जातात. हातमागावर लावण्यापूर्वी रेशमाचे धागे स्टार्चच्या पाण्यात हलके बुडवून घेतले जातात आणि मग हातमागावर उभे लावले जातात. ते धागे स्टार्च केल्यामुळे ‘मशरू’चं विणकाम अचूकपणे करता येतं. हातमागावर हे धागे मोजून लावले जातात आणि त्यासाठी खूप कसब लागतं आणि हे काम करणाऱ्या कुशल कारागिरांना ‘तानीवाला’ म्हणतात. उभ्या रेशमी धाग्यांमध्ये कॉटनचे धागे ज्या पद्धतीने गुंफले जातात, त्या विणीच्या प्रकाराला ‘सॅटिन-वीण’ असं संबोधलं जातं. या ‘सॅटिन-वीण’मध्ये ही मशरू सिल्कची साडी विणली जाते. यात थोडं वैविध्य आणण्यासाठी संपूर्ण साडीवर ‘जकार्ड’ पद्धतीनं(ही पद्धत मागच्या एका लेखात सविस्तर लिहिली आहे) एक ‘पॅटर्न’ विणला जातो. तयार झालेली मशरू साडी वरून सिल्कची असते आणि आतून सुती असते.

ओरिजिनल रेशमी धाग्याच्या रंगात तयार झालेली ही मशरूची सुंदर साडी नंतर ‘डाय’ केली जाते. साडीला साजेशा रंगाची पावडर घेऊन त्याची पाण्यात पेस्ट करून- गाळून ती पेस्ट ५० ते ५५ अंश सेल्सिअस तापमान असलेल्या पाण्यात मोठ्या भांड्यात टाकली जाते आणि त्या उकळत्या पाण्यात मशरूची साडी २० मिनिटे उकळली जाते, १५ ते २० मिनिटे उकळल्यानंतर एक विशिष्ट रंग त्या साडीवर चढतो आणि ती साडी बाहेर काढल्यावर हवेशी संपर्क येऊन ‘ऑक्सिडायझेशन’ होतं आणि ज्या रंगाची पेस्ट केलेली असते तो मूळ रंग त्या साडीवर चढतो! साडीत एकापेक्षा जास्त रंग असतील, तर साडीचे धागे आधी ‘डाय’ करून घेतले जातात आणि मग हातमागावर साडी विणली जाते.

तयार झालेल्या मशरूच्या साड्या, वरच्या सिल्कमुळे दिसायला खूप ‘रॉयल’ असतात आणि आतून कॉटन असल्यामुळे ‘स्किन-फ्रेंडली’देखील असतात!

साडीचा ‘शुभा’लाभ

‘असे हे कन्यादान’ या २०१५ मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘झी मराठी’वरील मालिकेमुळे लोकप्रिय झालेल्या मधुरा देशपांडेनं ‘भरतनाट्यम’मध्ये विशारदचीदेखील पदवी घेतली आहे. कोणत्याही कलेवर मनापासून प्रेम करणारी मधुरा, पुण्यात गरवारे कॉलेजमध्ये शिकत असताना हौस म्हणून ‘फिरोदिया’, ‘पुरुषोत्तम’सारख्या अनेक एकांकिका स्पर्धांमधून भाग घेत असे. शिवाय पुण्याच्या ‘सुदर्शन रंगमंचा’वर सादर होणाऱ्या ‘ग्रिप्स’च्या नाटकांमधूनही ती भाग घेत होती. एकदा ‘सुदर्शन रंगमंच’मध्ये तिच्या एका नाटकाची तालीम चालू असताना तिथंच ‘स्टार प्रवाह’च्या एका मालिकेसाठी ऑडिशन चालू होतं, तेव्हा नाटकातील सगळी मुलं-मुली ऑडिशन देत होती, म्हणून मधुरानंसुद्धा सहजच ती ऑडिशन दिली आणि त्यात तिची थेट ‘झुंज’ या मालिकेसाठी निवड झाली. या क्षेत्रात जायचं असं बिलकूल ठरवलेलं नसताना अचानक ती या क्षेत्रात आली आणि तिच्या अभिनयामुळे तिला पुढे खूप कामं मिळत गेली.

अशाच तिच्या एका कामासाठी ती नगरला गेली होती, तिथं एका शूटिंगच्या सेटवर मधुराची, तिथली कॉस्च्युम डिझायनर शुभाशी कामानिमित्त ओळख झाली आणि लगेच त्या दोघींची छान गट्टीदेखील जमली. तिच्याशी गप्पा मारताना मधुराला कळालं, की शुभा एक उत्तम चित्रकार असून तिचं आख्खं कुटुंबच चित्रकार आहे. शुभाचा स्वतःचा एक फॅशन स्टुडिओ असून ती साड्यांवर खूप सुरेख हॅन्ड पेंटिंग करते. मधुराची आत्यासुद्धा नगरलाच राहते आणि तिनं मधुराला आधी कधीतरी नगरमधील एका खास ‘फॅशन स्टुडिओ’बद्दल खूप कौतुकानं सांगितलं होतं. योगायोगानं तो स्टुडिओ शुभाचाच होता! कोणत्याही कलेच्या प्रेमात पडणाऱ्या मधुराला, हातानं केलेल्या एखाद्या कलाकृतीबद्दल कायमच खूप जिव्हाळा वाटतो. शुभाच्या कलेवर भारावून जाऊन मधुरा तिला म्हणाली, “मी तुला फॅब्रिक देते. तू मला त्याच्यावर काहीही तुला आवडेल ते पेंट करून दे...”

थोड्याच दिवसांत शुभा मधुराच्या थेट घरी आली आणि तिनं मधुराला एक मशरू सिल्कची साडी भेट दिली! साडीच्या पदरावर शुभानं स्वतःच्या हातानं मधुबनी शैलीतील तीन स्त्रिया पेंट केलेल्या होत्या. एकतर मशरू सिल्क हा प्रकारसुद्धा मधुरासाठी नवीन होता आणि त्यावरचं ते अप्रतिम पेंटिंग बघून मधुरा, त्या साडीच्या प्रचंड प्रेमात पडली. मधुरा म्हणाली, “माझ्यासाठी ती मशरू सिल्कची साडी खूप खास आहे- कारण शुभानं माझी साड्यांची आवड लक्षात ठेवून माझ्यासाठी एक सरप्राईज साडी आणली आणि ती साडीदेखील मशरू सिल्कसारख्या हटके प्रकारातली आणि खास त्याच्यावर माझ्यासाठी सुंदर पेंटिंग देखील केलं!”

खरंतर मधुराला साड्यांची लहानपणापासूनच खूप आवड होती. ती लहान असताना तिच्या आजीच्या मऊसूत साड्या अगदी सहजच घरात कायम नेसून बसत असे, आणि नुसतं बसत नसे तर दिवसभर नेसलेल्या साडीत पकडापकडी, लपाछपी असे खेळही खेळत असे! इतक्या लहानपणी साडी नेसून मधुराला खेळताना बघून आजूबाजूच्या बायकाही तिच्याकडे कौतुकानं बघत राहत. दिवसभर साडीत खेळणाऱ्या मधुराची साडी सूटतही नसे आणि तिला ती सोडवतही नसे.

loading image
go to top