सौंदर्यखणी : फुलांची उधळण करणारी ‘फुलकारी’

पंजाबमधील स्थानिक स्त्रियांचा, साडी या पारंपरिक पेहराव नसला, तरी शाली आणि दुपट्ट्यांवर केलं जाणारं फुलकारी-वर्क खूप लोकप्रिय आहे.
Sharvari Lohokare
Sharvari LohokareSakal

पंजाबमधील ‘हिर-रांझा’च्या रोमँटिक कथांमधून ‘फुलकारी दुपट्ट्या’चा उल्लेख आपण कदाचित कधीतरी ऐकला असेल! फुलकारी हा भरतकामाचा हाताने केला जाणारा पंजाबमधील एक पारंपरिक प्रकार असून, सतराव्या शतकातील साहित्यात या कलेचा उल्लेख सापडतो आणि कदाचित त्याही आधीपासून ही कला अस्तित्त्वात असल्याचं मानलं जातं.

पंजाबमधील स्थानिक स्त्रियांचा, साडी या पारंपरिक पेहराव नसला, तरी शाली आणि दुपट्ट्यांवर केलं जाणारं फुलकारी-वर्क खूप लोकप्रिय आहे. पंजाबी लग्नांमधील नवरीच्या पेहरावात पारंपरिक फुलकारी दुपट्ट्यांचं महत्त्व अनन्यसाधारण आहे. पंजाबमधील खेड्यापाड्यांमध्ये आजही मुलीचा जन्म झाला, की तिची आई आणि आजी तिच्यासाठी फुलकारी वस्त्र भरायला घेतात आणि तिच्या लग्नापर्यंत ‘फुलकारी’चं भरतकाम केलेली अनेक वस्त्रं तयार करतात आणि तिला तिच्यासोबत तिच्या सासरी पाठवतात. शिवाय सणावारांना तिथल्या सवाष्ण स्त्रीची ओटी पारंपरिक फुलकारीच्या वस्त्रांनी भरली जाते. वर्षानुवर्षं पंजाबमधील या स्त्रिया घरातलं काम संपवून दुपारी एकत्र येऊन सामूहिकरित्या आपापलं फुलकारी काम मोठ्या कौशल्यानं करत असतात. हे काम करता-करता त्या सामूहिक लोकगीतंही म्हणतात आणि मधूनमधून विरंगुळा म्हणून लोकनृत्यही करतात. या सोहळ्याला ‘तीरंजन’ म्हटलं जातं. पंजाबी स्त्रियांच्या आयुष्यातलं फुलकारीचं हे गुंफण आयुष्याच्या शेवटपर्यंत टिकतं. त्या प्रांतातील सवाष्ण स्त्रीच्या निधनानंतर तिला लालजर्द फुलकारी दुपट्टा पांघरून तिला शेवटचा निरोप दिला जातो.

अशी ही मोठ्या कौशल्यानं केली जाणारी पारंपरिक फुलकारी आता अलीकडच्या काळात साड्यांवरसुद्धा केली जाऊ लागली आहे. फुलकारी साड्यांवर अतिशय आकर्षक रंगात हे फुलकारी काम केलं जातं, कधी कधी एकाच रंगानं संपूर्ण साडी फुलकारीनं भरली जाते. निरनिराळ्या आकार-प्रकारांची फुलं रेशमी धाग्यानं कापडावर उतरवली जातात, म्हणून या कलेला ‘फुलकारी’ असं नाव पडलं. सूर्यफूल, कमळ, झेंडू, चमेली, इत्यादी फुलांबरोबर मोहरी, कारलं, फ्लॉवर, कोथिंबीर, मिरची इत्यादी झाडावरच्या फुलांचाही नक्षीकामात वापर केला जातो. फुलांबरोबरच काही भौमितिक आकार, नक्षीची लकेर, मोर आणि इतर प्राणी-पक्षी सुद्धा यात भरले जातात.

सुरुवातीच्या काळात हातानं सूत कातून त्यापासून हातमागावर विणलेल्या जाड सुती कापडावर (त्याला ‘खद्दर’ म्हणत असत) त्या कापडाचे धागे मोजून अचूकपणे हे फुलकारी काम केलं जाई. हे काम आता सिल्क, जॉर्जेट किंवा क्रेप इत्यादी फॅब्रिक्सवरदेखील केलं जातं. यासाठी ट्विस्ट न केलेले रेशमाचे जाड धागे वापरून ‘डार्न’, ‘सॅटिन’, ‘रनिंग’, ‘हेरिंगबोन’, ‘बटनहोल’सारख्या भरतकामाच्या टाक्यांचा वापर केला जातो. फुलकारी साड्या दोन प्रकारे भरल्या जातात- ‘बाघ’ आणि ‘चोप’! ‘बाघ’ म्हणजे ‘फुलांनी भरलेली बाग.’ या प्रकारात पूर्ण साडी, फुलांनी किंवा भौमितिक आकारांनी पूर्णपणे भरली जाते. हे भरतकाम, इतकं जवळ-जवळ आणि एकमेकात गुंफलेलं असतं, की भरतकामाच्या खालचं कापड दिसतदेखील नाही. ‘चोप’ प्रकारात ‘रनिंग स्टीच’चा वापर करून साडीवर फुलकारीनं फक्त बॉर्डर भरली जाते किंवा काहीवेळा साडीवर अंतरांअंतरावर बुट्ट्याही भरल्या जातात.

रेशमी भरतकाम केलेली एकेक फुलकारी साडी किंवा ओढणी म्हणजे एकेक अप्रतिम कलाकृतीच वाटते! या अप्रतिम कलाकृतीला स्वतःची खास ओळख असल्यामुळे ‘भौगोलिक स्थानदर्शकतेचं प्रमाणपत्रक’देखील मिळालं आहे. काही वस्तुसंग्रहालयांमधून फुलकारीचे अप्रतिम आणि दुर्मीळ नमुने जतन करून ठेवले आहेत. ते पाहून फुलकारीचं काम करणाऱ्या त्या स्त्रियांपुढे नतमस्तक व्हावंसं वाटतं!

शर्वरीचा ‘फुलकारी’ खजिना !

नुकत्याच प्रदर्शित झालेल्या ‘सूर्यवंशी’ चित्रपटातील एका खास भूमिकेमुळे लक्षात राहिलेल्या शर्वरी लोहोकरेच्या खास अभिनयामुळे सिनेमा, नाटक आणि मालिकांमधील तिच्या इतर भूमिकाही आपल्याला आवर्जून लक्षात राहतात. शर्वरीचं बालपण तिच्या वडिलांच्या नोकरीमुळे उत्तर प्रदेशात मेरठ, लखनौ आणि पंजाबमधील लुधियाना इथं गेलं. नृत्य आणि अभिनयाची तिला लहानपणापासूनच आवड होती. वयाच्या अगदी तिसऱ्या वर्षापासून ती नाटकात भाग घेत असे. मग पुढच्या शिक्षणासाठी ती पुण्यात आली. पुण्याच्या ‘सुदर्शन रंगमचा’च्या संस्थापिका- शुभांगी दामले म्हणजे शर्वरीची सख्खी मावशी. मावशीच्या प्रोत्साहनातून सुदर्शनच्या ‘ग्रिप्स’च्या नाटकांनाही तिनं वाहून घेतलं होतं. ती ‘समन्वय’ व ‘आसक्त’ या संस्थांकडून, आणि कॉलेजमध्ये असताना ‘पुरुषोत्तम’ आणि ‘फिरोदिया’च्या नाटकांमधूनही ती भाग घेत असे.

अभिनयाच्या आवडीमुळे कॉलेजमध्ये असताना शर्वरी अनेक ऑडिशन्स देत होती; पण सगळीकडून नकार येत होता. एकदा मावशीच्या आग्रहामुळे शर्वरीनं मुंबईला जाऊन ‘झी मराठी’च्या एका मालिकेसाठी ऑडिशन दिली आणि तिथून पुण्यात घरी पोचेपर्यंत तिला ‘सिलेक्शन’चा फोन आला! ‘या सुखांनो या’ मालिकेतील एका मोठ्या भूमिकेसाठी तिची निवड झाली. खरंतर शर्वरीचं शिक्षण चालू होतं, परीक्षासुद्धा जवळ आली होती आणि अचानक मालिकेसाठी सिलेक्शन झालं, त्यामुळे ती द्विधा मनःस्थितीत होती; पण आई-वडील आणि मावशीचा सल्ला घेऊन ती मालिकेसाठी ‘हो’ म्हणाली. तिची आई तिला मुंबईला सोडायला गेली होती. आई परत जाताना, शर्वरी शाळेत पहिल्या दिवशी आईनं सोडल्यावर जशी रडली होती तशी ढसाढसा रडली.

या क्षेत्रात गेल्यावर शर्वरी कामात प्रचंड व्यग्र झाली; पण या अत्यंत व्यस्त शेड्युलमधून ती अधूनमधून आई-बाबांबरोबर ट्रिप्सला जात असते. अशीच ती एकदा लहानपणच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी पंजाबमध्ये लुधियाना, अमृतसरच्या ट्रीपला गेली होती. सुवर्णमंदिराचं दर्शन म्हणजे तर अविस्मरणीय सोहळा! दर्शन घेऊन बाहेर आल्यावर, बाहेर कपड्यांचं मोठं मार्केट होतं. ‘स्ट्रीट शॉपिंग’ म्हणजे तर शर्वरीसाठी स्वर्गीय सुख! शर्वरीला भटकंती करायला, लोकल मार्केटमध्ये शॉपिंग करायला आणि ‘बार्गेन’ करायला प्रचंड आवडतं, तो तिचा छंद आहे. त्या मार्केटमध्ये तिची आई फुलकारीच्या ओढण्या घेत होती, शर्वरी मात्र ते मार्केट ‘एक्सप्लोर’ करण्यासाठी खूप आत गल्ली- बोळांमधल्या छोट्या छोट्या दुकानांमध्ये गेली आणि खूप वेळ आलीच नाही. ती, तिथल्या दुकानांमधल्या फुलकारीच्या रंगीत दुनियेत हरखून गेली होती! खूप वेळानं फुलकारीच्या साड्यांचा आणि ओढण्यांचा खजिना घेऊन ती बाहेर आली आणि आईला शोधून तिनं तो खजिना आईला दाखवला, आईच्या शॉपिंगपेक्षा शर्वरीनं तिच्या ‘बार्गेनिंग कौशल्या’मुळे तो खजिना खूपच स्वस्तात घेतला होता. मनसोक्त शॉपिंगमुळे ती जाम खुश होती; पण बराच वेळ लागल्यानं आईचा ओरडादेखील खाल्ला. काही दिवसांनी शर्वरीनं त्या खजिन्यातली एक सुंदर काळी फुलकारीची साडी एका कार्यक्रमासाठी नेसली होती आणि त्या कार्यक्रमात या हटके साडीचं जाम कौतुक झालं. शर्वरी म्हणाली, ‘‘फुलकारी हा प्रकार तिथं बऱ्याच जणांना नवीन होता, त्यामुळे माझ्या फुलकारी साडीमार्फत पंजाबमधील फुलकारी कलेची ओळख करून देताना मला जाम मजा आली!’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com