सौंदर्यखणी : ‘साडी-पुराणा’ची सांगता

सरत्या वर्षातल्या १ जानेवारीपासून, ‘सौंदर्यखणी’ या साप्ताहिक सदरात, दर शुक्रवारी आपण भेटत आलो आहोत. या लेखमालेतील आजचा हा शेवटचा लेख.
Saree
SareeSakal
Summary

सरत्या वर्षातल्या १ जानेवारीपासून, ‘सौंदर्यखणी’ या साप्ताहिक सदरात, दर शुक्रवारी आपण भेटत आलो आहोत. या लेखमालेतील आजचा हा शेवटचा लेख.

सरत्या वर्षातल्या १ जानेवारीपासून, ‘सौंदर्यखणी’ या साप्ताहिक सदरात, दर शुक्रवारी आपण भेटत आलो आहोत. या लेखमालेतील आजचा हा शेवटचा लेख. या लेखमालेतून भारतातील निरनिराळ्या प्रांतातील अनेक साड्यांची आपण ओळख करून घेतली, शिवाय दर आठवड्याला एकेका साडीबरोबर एकेक सेलिब्रिटीसुद्धा तिची खास साडी घेऊन आपल्याला भेटत होती. या लेखमालेला उदंड प्रतिसाद मिळाला. ‘पुढच्या शुक्रवारी कोणती साडी?’... ही वाचकांची उत्सुकता, वेगवेगळ्या माध्यमांतून माझ्यापर्यंत पोचत होती.

काही वर्षांपूर्वी माझ्याकडे माझ्या पणजीची १२५ वर्षांपूर्वीची पैठणी आली. मुळातच मला साड्यांची आवड असल्यानं मी त्या साडीचा खोलवर अभ्यास सुरु केला. पत्रकारितेच्या शिक्षणाबरोबरच, आवड म्हणून मी टेक्स्टाईलचादेखील एक कोर्स केला होता, शिवाय त्या दरम्यान म्युझियममधील जुन्या साड्यांचाही माझा अभ्यास चालू होता. या पैठणीबरोबरच अजून काही ७०-७५ वर्षांपूर्वीच्या साड्याही माझ्याकडे आल्या. मग माझं त्या साड्यांवरही संशोधन सुरू झालं. त्या पैठणीचा अभ्यास करून कळलं, की त्या काळातील ती पारंपरिक आसावली पैठणी आहे. ती अँटिक पैठणी दहा वार असून, त्या पैठणीच्या पारंपरिक नारळी काठांवर आणि पानाफुलांची वेलबुट्टी असलेल्या पदरावर प्युअर ‘जर’ आहे. साड्यांच्या संशोधनाचा तो सिलसिला आजही चालू आहे. माझ्या या अभ्यासात मीही शिकत गेले आणि समृद्ध होत गेले आणि अजूनही शिकते आहे.

मला कायम असं वाटतं, की साडी हे नुसतं एक वस्त्र नसून, ते आपल्या भावना व्यक्त करण्याचं एक प्रभावी माध्यम आहे. पिढ्यान्‌पिढ्या संक्रमित होणारं हे साडीचं नातं त्यातील सुंदर विणीतून पुढच्या-मागच्या पिढ्यांना एकत्र गुंफून ठेवतं.

आई-आजीची मायेची साडी जतन करून ठेवणारी मुलगी असो किंवा सासूबाईंच्या साडीतून वारसा जपणारी सून असो किंवा अगदी आजीच्या मऊसूत साड्यांची गोधडी पांघरणारा मुलगा असो... यातली साडी जरी जुनी झाली, तरी त्यातलं नातं मात्र अधिकच ‘गहिरं’ होत असतं!

अगदी प्राचीन काळी, शिलाईचं तंत्र अवगत नव्हतं, परंतु हातमागावर वस्त्र विणण्याची कला मात्र अवगत झाली होती त्या काळापासून स्त्रियांच्या शरीराला गुंडाळता येणारे वस्त्र म्हणून, साडी हा प्रकार अस्तित्वात आला असावा. साडीचा, जुन्या संस्कृत साहित्यामध्ये ‘शाटिका’ असा उल्लेख आढळतो. ‘शाटिका’वरून पुढे मराठीत ‘साडी’ हा शब्द रूढ झाला. काही ‘लोक-साहित्या’तून, काही ‘संत-साहित्या’तून त्या काळातील वस्त्रपरंपरेचे आणि त्या काळी प्रचलित असलेल्या साड्यांचे उल्लेख आढळले. त्यातूनच साडी या विषयाची व्यापकता लक्षात येते.

विणींवर प्रकाश

या लेखमालेतून, भारतात हातमागावर विणल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या विणींच्या साड्यांवर मी प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला, त्यात काही पॉवरलूमवर विणल्या जाणाऱ्या साड्यासुद्धा होत्या. ५१ निरनिराळ्या साड्यांचा आढावा या लेखमालेत मी घेतला. लेखमालेत आपण ‘कांचीपुरम’, ‘गदवाल’, ‘पैठणी’, ‘इलकल’, ‘बनारसी’, ‘पोचमपल्ली’, ‘बोमकाई’, ‘चंदेरी’, ‘महेश्वरी’, ‘कसावू’, ‘खणसाडी’, ‘अजरख’, ‘जामदानी’, ‘बांधणी’, ‘पाटण-पटोला’, ‘हिमरू’, ‘मशरू’, ‘चिकनकारी’, ‘कलमकारी’, ‘फुलकारी’, ‘मधुबनी’, ‘नारायणपेठ’, ‘रास्ता साडी’, ‘लिनन’, ‘रॉ सिल्क’, ‘टसर’, ‘कांथा’, ‘मेखला-सादोर’, ‘मटका’, ‘खादी’, ‘बगरू’, ‘मंगलगिरी’, ‘टिश्यू’, ‘काश्मिरी’, ‘म्हैसूर सिल्क’, ‘मल कॉटन’, ‘कुपडम’, ‘शिबोरी’ आणि इतर अजून काही साड्या उलगडल्या.

या निरनिराळ्या विणींवर लिहिताना त्या विणीची साडी कोणत्या सेलिब्रिटीकडे आहे का आणि तिच्याकडे त्या साडीची काही आठवण किंवा काही किस्सा आहे का, याचाही माझा शोध गेलं वर्षभर चालू होता. त्यातून ५१ सेलिब्रिटींच्या साड्यांबाबतचे किस्सेही लिहिता आले. काही सेलिब्रिटी अशाही होत्या, की त्यांच्याकडे आठवणीतल्या साड्यांचे काही खास किस्से होते; परंतु त्या साडी-प्रकारावर आधी कधी तरी लिहिलेलं असल्यामुळे नाईलाजानं ते किस्से लिहिता आले नाहीत; पण कधी योग आला तर नक्की लिहीन. इथे आवर्जून एक गोष्ट सांगावीशी वाटते, की लेखमालेसाठी मी जेवढ्या सेलिब्रिटींशी बोलले त्या सगळ्या कमालीच्या ‘साडी-प्रेमी’ होत्या. त्यांच्या मनातल्या कप्प्यात ठेवलेल्या खास साडीविषयी, त्या सेलिब्रिटी अत्यंत व्यस्त शेड्युलमधूनदेखील खूप भरभरून बोलत होत्या. काही जणींनी तर खास या लेखासाठी, त्यांची खास साडी नेसून, देशाच्या कानाकोपऱ्यातून किंवा अगदी देशाबाहेर राहत असूनही फोटो काढून पाठवले. साडीच्या समृद्ध परंपरेविषयी त्या सर्व अत्यंत आदरानं बोलत होत्या, त्यातून साडी या पारंपरिक वस्त्राला आजही असलेलं ग्लॅमर जाणवलं.

हातमागावर विणल्या जाणाऱ्या साड्यांना स्वतःची खास ओळख आहे. त्या साड्यांची वीण, शैली, रंगसंगती, धागे, नक्षीतले घटक प्रांताप्रांतानुसार बदलत जातात. दुर्दैवानं भारतातील काही विणी नामशेष झाल्या आहेत; परंतु काही आधुनिक विणकार त्यांना पुनरज्जीवित करत आहेत.

नेसण्याचेही असंख्य प्रकार

भारतात साडी विणण्याचे जितके प्रकार आहेत तितकेच साडी नेसण्याचे. पूर्वी पाच वारापासून ते अगदी अकरा वारापर्यंत साड्या विणल्या जायच्या. पूर्वी लग्न झालेल्या अल्पवयीन मुली खांद्यावर पदर न घेता कमरेला खोचत असत, ती साडी लांबीला लहान असे आणि त्या साडीला ‘परवंटा’ म्हणत; परंतु आता हा प्रकार कालबाह्य झाला असून, आता फक्त पाच-सहा आणि नऊवारी साड्या प्रचलित आहेत. शिवाय हल्ली नऊवारी नेसणाऱ्या स्त्रियांचं प्रमाण कमी झालं असलं, तरी पारंपरिक लग्न- मुंजींमध्ये काही हौशी स्त्रिया आवर्जून नऊवारी नेसू लागल्या आहेत. या नऊवारी साडीला पूर्वी काष्ट्याची साडी असही म्हणत असत, शिवाय याच साडीला ‘सकच्छ’ असही म्हणत असत. ‘सकच्छ’ म्हणजे ‘काष्टा’ किंवा ‘कसोट्या’सह असलेली ती ‘सकच्छ’ आणि काष्टा नसलेली साडी ती ‘विकच्छ’ म्हणजे पाच किंवा सहावारी साडी. शिवाय पूर्वीच्या काळी लग्न झालेल्या लहान मुली पाच-सहावारी साडी नऊवारी पद्धतीने नेसत असत, त्या साड्यांना ‘चिरडी’ म्हणत. पूर्वी पेशवेकालीन पैठण्या, सोळा हात लांब आणि चार हात रुंद असत आणि त्या एकेक पैठणीचे वजन तीन ते साडेतीन किलो असायचं. या कालखंडातील पैठण्यांची लांबी चक्क दोन ते तीन मजलेदेखील असायची. भारतात प्रांतानुसार साडी नेसायचे असंख्य प्रकार आहेत. शिवाय आता आपल्या मापानुसार नऊवारी आणि सहावारी साडी शिवूनदेखील मिळते. नाडी किंवा हूक लावलं, की झाली साडी नेसून! थोडक्यात काय, तर काळ आणि फॅशन बदलली तरी भारतीय स्त्रीच्या आयुष्यातील साडीचं महत्त्व कधीच कमी झालं नाही!

अत्यंत कौशल्यानं, हातमागावर वैशिष्ट्यपूर्ण साड्या विणणारे विणकर किंवा कलमकारीसारख्या साड्यांवर हातानं पेंट करणारे आणि फुलकारी, चिकनकारी किंवा कांथाच्या साड्यांवर भरतकाम करणारे आर्टिझन्स म्हणजे अप्रतिम कलाकृती निर्माण करणारे मोठे कलाकार असतात. एखादा चोखंदळ ग्राहक अशी कलाकृती योग्य त्या किंमतीत विकत घेतो आणि ते पैसे थेट त्या आर्टिझनपर्यंत पोचतात, तेव्हा त्यांना खूप मोठं प्रोत्साहन मिळतं आणि ती कला टिकून राहायला मोठी मदत होते!

एका लेखमालेत न मावणाऱ्या... साडीचे विविधांगी पदर उलगडत... संपूर्ण वर्षभर चाललेल्या या ‘साडी-सोहळ्या’ची आज सांगता होत आहे...! निरोप घेताना मला एक समाधान आहे, की विविधतेनं नटलेल्या भारताची समृद्ध ‘साडी-परंपरा’ मला लेखणीतून अधोरेखित करता आली. अशी ही साड्यांची कहाणी... म्हणजे माझं ‘साडी-पुराण’... सुफळ संपूर्णम!

विणींची समृद्ध, न संपणारी परंपरा

लेखमालेत उल्लेख न झालेल्या अजूनही कितीतरी विणी आजही भारतात अस्तित्वात आहेत. उदाहरणार्थ, संपूर्ण साडीवर भरतकाम केलेली ‘पारशी गारा’ साडी, ‘आसामची सोनेरी मुगा’, ‘इरी’ आणि ‘काझीरंगा साडी’, पश्चिम बंगालची ‘बिष्णूपुरी’, पौराणिक आणि ऐतिहासिक प्रसंग विणलेली ‘बालुचरी’ आणि सोन्या-चांदीच्या धाग्यांनी विणलेली ‘सुवर्णचारी’ साडी, महाराष्ट्रातील ‘करवती’, ‘नागपुरी’, तर कर्नाटकची ‘पट्टेदा-अन्चू’, ‘जिजामाता’, ‘धारवाडी’, ‘शहापुरी’, ‘मोलकालमुरु’, ‘उडुपी’, ओडिशाची ‘कोटपाड’, ‘संबलपुरी’, ‘कटकी’, ‘हबसपुरी’ आणि ‘बरहमपूर पट्टा’, तर तमिळनाडूची ‘चेट्टीनाड’, ‘कोरनाड’, ‘संगुडी’, ‘आरनी’, राजस्थानची ‘कोटा दोरिया’, गुजरातची ‘तंघालिया’ आणि ‘नवरतन’, मध्य प्रदेशची ‘इंदुरी’, बिहारची ‘भागलपुरी’, आंध्र प्रदेशची ‘धर्मावरम’, ‘वेंकटगिरी’, ‘मढी’, ‘मधुपर्कम’, ‘उपाडा’, बनारसची ‘कढुआ क्रेप सिल्क’, केरळची ‘मुंडू’ ‘नेरीयाथू’, आणि ‘बलरामपूरम’, मणिपूरची ‘मोईरांग फी’, तेलंगणची ‘दुबक्का’ व ‘तेलिया रुमाल साडी’ शिवाय ‘ज्यूट’, ‘वेल्व्हेट’, ‘ॲप्लिके वर्क साडी’, ‘बाटिक साडी’, ‘लम्हाणी वर्क साडी’, ‘ऑरगॅन्झा’ आणि अशा इतर अनेक सुंदर नावं असलेल्या सुंदर साड्या म्हणजे भारतीय वस्त्रपरंपरेची शान आहे. ‘साडीप्रेमी’ महिला जेव्हा खास निरनिराळ्या प्रांतातल्या साड्या आवर्जून नेसतात तेव्हा संपूर्ण भारतातील निरनिराळी राज्यं एकमेकांत साड्यांच्या धाग्यांनी गुंफल्यासारखी वाटतात.

(हे सदर आता समाप्त होत आहे.)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com