esakal | सौंदर्यखणी : ऐतिहासिक ‘हिमरू’

बोलून बातमी शोधा

Girija Oak
सौंदर्यखणी : ऐतिहासिक ‘हिमरू’
sakal_logo
By
रश्मी विनोद सातव

महाराष्ट्र म्हटलं, की पैठणी साडी आठवते; पण अजून एक अशी साडी आहे जिचे धागेदोरे महाराष्ट्रातल्या इतिहासात विणले गेले आहेत. कुरेशी समाजातील काही विणकर औरंगाबादजवळ दौलताबाद येथे आणि हैदराबादजवळ सुरैया बोस यांच्या हातमागांवर आजही ही साडी विणत आहेत. उद्याच्या महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने आज आपण एका ऐतिहासिक विणीवर प्रकाश टाकूयात आणि जाणून घेऊयात ‘हिमरू साडी’बद्दल.

सन १३२७ मध्ये मुघल साम्राज्याचा दिल्लीचा सुलतान मुहम्मद तुघलक याने आपली दिल्लीतली राजधानी, देशाच्या मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या दौलताबादला हलवली होती. त्याने त्याचे सैनिक, इतर लवाजमा आणि बारा बलुतेदारांसह काही विणकरही बरोबर आणले होते. सन १३३५ मध्ये त्याला आपली दौलताबादची राजधानी परत दिल्लीला हलवावी लागली आणि तो परत दिल्लीला निघून गेला; पण त्याच्याबरोबर आलेले विणकर आणि इतर कारागीर दौलताबादमध्येच राहिले आणि त्यांनी हातमागावर विशिष्ट विणीचे कापड विणण्याचे काम तसेच पुढे चालू ठेवले. तेव्हा मुघल साम्राज्याच्या प्रभावाखाली असलेल्या वाराणसीमधल्या ‘किनख्वाब’ या बनारस ब्रोकेड कापडाने प्रभावित होऊन, दौलताबादमध्ये तुघलकच्या अधिपत्याखाली असणाऱ्या कुरेशी समाजाने ‘हिमरू’ वीण विकसित केली. ‘हिमरू’ हा शब्द पर्शियन असून ‘हम’ आणि ‘रूह’ या दोन शब्दांपासून तयार झालेला असून त्याचा अर्थ आहे ‘सारखा.’ ‘किनख्वाब’सारखी असणारी ही वीण- म्हणून ‘हिमरू’!

मुघल काळात ‘हिमरू’ वीण वापरून भरजरी अंगरखे, शेले, शाली, राजवाड्यांचे पडदे आणि चादरी वगैरे, मुघल घराण्यांसाठी तयार होत असत. नंतर मुघलांचा प्रभाव जसा कमी होत गेला, तसे या विणीत ‘हिमरू’ साड्या बनू लागल्या. दौलताबाद आणि परिसरात मोठ्या प्रमाणात कापूस उपलब्ध असल्यामुळे ही ‘हिमरू साडी’ कॉटन आणि कॉटन-सिल्क मिक्समध्येही बनू लागली. ब्रिटिशकाळात पॉवरलूम्स आल्या, तेव्हा हातमागावरचा वस्त्रोद्योग डबघाईला आला. १९४७ मध्ये देशाच्या फाळणीनंतर बरेच कुरेशी विणकर पाकिस्तानात निघून गेले आणि मग हे काम करणारे फक्त दोन-तीन कुटुंबे उरली. दौलताबादमधले हे बोटावर मोजता येणारे काही ‘हिमरू’ विणकर कला जिवंत ठेवण्यासाठी मोठे योगदान देत राहिले.

उभ्या-आडव्या सिल्कच्या धाग्यांबरोबर आडवे जरीचे धागे टाकून संपूर्ण साडीवर बारीक भरजरी नक्षीकाम केले जाते. काही डिझाईन्समध्ये तर ते नक्षीकाम इतके बारीक असते, की खालचे सिल्क दिसतही नाही. अजंठा-वेरूळ लेण्यामधील कोरीवकाम, वाराणसीच्या मंदिरातील कोरीवकाम आणि मुघल वास्तुकलेतील नक्षीकाम यांची सुंदर गुंफण या साड्यांमध्ये दिसते. साडी विणायला सुरू करण्यापूर्वी हातमागावर डिझाईनप्रमाणे धागे लावून घेण्याच्या प्रक्रियेला एक ते दोन महिनेसुद्धा लागू शकतात. पुढे पॉवरलूम्सवरसुद्धा ही ‘हिमरू’ साडी बनू लागली; पण हातमागावरच्या ‘हिमरू’ची नजाकत आणि वैविध्य त्यात नाही. फॅशन डिझायनर मृण्मयी अवचट म्हणाली, ‘‘पॉवरलूमवर ज्या हिमरू साड्या आणि शाली बनतात, त्यात पॉलिएस्टरचे धागे वापरलेले असतात आणि त्यामुळे त्या साड्या आणि शालींना जरा कडकपणा असतो.’’

विरत चाललेली ही वीण बघून प्रेरित झालेल्या सुरैया बोस यांनी हैदराबादजवळ १९८५ मध्ये एका हातमागावर, हिमरू कला येत असणाऱ्या दोन वयस्कर विणकरांना बरोबर घेऊन हिमरू साड्या विणायला सुरुवात केली होती. बोस यांनी निझाम घराण्यातील हिमरू विणीत विणलेली वस्त्रे मिळवून त्यांचा अभ्यास केला आणि भारतीय वस्त्र परंपरेतील नामशेष होणाऱ्या काही वस्त्रनिर्मितीला पुनरुज्जीवन दिले. उत्तर भारतातील एका कलेने प्रेरित होऊन महाराष्ट्रात विकसित झालेली आणि हैदराबादमध्ये नव्या रंगरूपात पुनरुज्जीवित झालेल्या या हिमरू साडीने आपल्या ऐतिहासिक प्रवासात देशातील काही प्रांतही एकमेकात गुंफले!

गिरिजाचं ‘हिमरू’ प्रेम

वयाच्या पंधराव्या वर्षीच मोठ्या पडद्यावर काम करणारी गिरिजा पुढे ‘गोष्ट छोटी डोंगराएवढी’, ‘गुलमोहोर’, ‘मानिनी’, ‘अडगुळं मडगुळं’ इत्यादी चित्रपटांमधून, अनेक नाटकांमधून आणि झी मराठीच्या ‘लज्जा’ आणि सोनीच्या ‘लेडीज स्पेशल’सारख्या मालिकेतून तिच्या कसदार अभिनयातून आपल्याला भेटत आली आहे. अभिनयाची ‘पॅशन’ असणाऱ्या या अभिनेत्रीला अजून एका गोष्टीची पॅशन आहे. तिला वेगवेगळ्या प्रकारांच्या साड्यांचा संग्रह करायला आणि त्या साड्या प्रसंगी आवर्जून नेसायला जाम आवडतात. तिच्याकडे चक्क दोनशे साड्यांचा संग्रह आहे. तिनं तिच्या पणजीच्या, आज्जीच्या, नानी-आज्जीच्या आणि आईच्या काही खास साड्या जीवापाड जपल्या आहेत. तिच्या पणजीची १९३० ची एक पारंपरिक साडीही तिच्या संग्रहात आहे.

साड्यांचा संग्रह करताना तिचा कल नेहमी नामशेष होत चाललेल्या विणीच्या साड्या, पारंपरिक वारसा असलेल्या साड्या घेण्याकडे असतो. अशा साड्यांबद्दल तिला नेहमीच कुतूहल वाटत आलं आहे. एका कार्यक्रमाच्या निमित्तानं गिरिजा, मृण्मयी अवचटला भेटली. मृण्मयी एक फॅशन डिझायनर असून पारंपरिक वारसा असलेल्या साड्या विणणाऱ्या विणकरांना प्रोत्साहन देण्यासाठी त्यांच्याकडच्या साड्या योग्य ग्राहकांपर्यंत पोचवण्याचं काम ती गेली दहा वर्षं करत आहे. सामाजिक बांधिलकीतून काम करणाऱ्या मृण्मयीची आणि ‘सामाजिक जाण’ असणाऱ्या गिरिजाची आवड एकदम जुळून आली. वेगवेगळ्या इव्हेंटसाठी मृण्मयी गिरिजाला साड्या उपलब्ध करून देत असते.

एक वर्षापूर्वी, लॉकडाऊनच्या काळात एका शॉर्टफिल्मसाठी गिरिजाला आर्मी ऑफिसरच्या बायकोच्या भूमिकेसाठी, एक ‘जर’ नसलेली पण वेगळ्याच धाटणीची साडी हवी होती. अवनीश मिश्रा लिखित आणि दिग्दर्शित त्या शॉर्ट फिल्ममध्ये गिरिजा, शुभ्रज्योती बराट आणि कुमुद मिश्रा असे तीन दिग्गज कलाकार होते. त्या फिल्मसाठी मृण्मयीनं गिरिजाला एक ‘हिमरू’ साडी दिली. गिरिजाला ‘हिमरू शाली’ माहीत होत्या; पण ‘हिमरू’ विणीच्या साड्याही असतात हे पहिल्यांदाच कळलं. गिरिजाला ती खूपच आवडली आणि गिरिजा ‘हिमरू’च्या प्रेमातच पडली. त्या फिल्ममधले गिरिजाचे सगळे सीन्स त्याच साडीत शूट झाले. ‘सेट’वरील सगळ्यांना ती साडी जाम आवडली. विशेष म्हणजे त्या शूटिंगच्या दिवशी गिरिजाचा वाढदिवस होता. सेटवर तिच्या वाढदिवसाचं सेलिब्रेशन झालं आणि त्या सुंदर साडीत गिरिजानं केक कटिंग केलं.

या ‘हिमरू’ साड्या लोकांना माहीत व्हाव्यात म्हणून लॉकडाउनच्या काळात गिरिजानं कोणताही मोबदला न घेता अजून काही सुंदर ‘हिमरू’ साड्या नेसून त्याचं फोटोशूट केलं आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत त्या साड्या पोचवल्या. त्यातून चोखंदळ ग्राहकांकडून ‘हिमरू’ विणकरांना उत्तम प्रतिसाद मिळाला. ही कला जिवंत ठेवण्यासाठी मदत करणाऱ्या गिरिजा ओक-गोडबोलेनं सामाजिक बांधिलकीचं वस्त्रही त्या निमित्तानं विणलं हे खरं!