esakal | बाईची ‘जात’! Women
sakal

बोलून बातमी शोधा

Women
बाईची ‘जात’!

बाईची ‘जात’!

sakal_logo
By
रसिका आगाशे

‘बाईच्या जातीला शोभेल का हे’ हे ऐकण्यात अर्धं आयुष्य घालवायचं आणि बाकीचं आयुष्य कुणाची तरी उसनी, उधार घेतलेली जात वागवत लाचारासारखं जगायचं, ही आपली महान परंपरा. जोवर बाईची जात ही जात व्यवस्था नाकारत नाही, तोवर ती दुय्यम वागणुकीला सामोरे जाणारच आहे. कारण जात आणि धर्म या पुरुष सत्तेतून जन्माला आलेल्या गोष्टी आहेत आणि त्यांची धग प्रमाणपत्रापासून स्वयंपाकघरापर्यंत सारखीच लागते!

माझा स्वतःचा प्रवास ‘‘एक वाजला तरी स्वयंपाक नाही झाला, देशस्थी घोळ संपत नाही’ अशा वाक्यापासून ते ‘आता म्हणजे तू मुस्लिमांमध्येच लग्न केलंयस म्हणून, पण हरतालिका आपल्याकडे लग्न झाल्या तरी पूजतात’ अशा वाक्यापर्यंत झाला आहे. मध्येमध्ये ते ‘‘तुमच्यात करवा चौथ नसतो का?’, ‘अगं त्यांची सून आपल्यातली नाही ना’, ‘त्यांची मुलगी इतर जातीत गेली, आता बसलेत तोंड लपवून’, ‘आमच्यात तसं लिबरल आहे, पण गावी गेलं की डोक्यावर पदर घ्यायलाच हवा ना’, ‘यांच्यात चपाती म्हणतात!’, ‘आमच्यात पुरणाचा स्वयंपाक असतो हां अमुक सणाला’, ‘तुमच्यात पिठी वापरत नाहीत का?’, ‘हिच्या मटणापेक्षा, आमच्या भाजीत जास्त तेल असतंय!’... ही आणि अशी अनेक वाक्य तोंडी लावण्यासारखी वापरली जातातच.

बरं ही वाक्य पुरुषांइतकीच किंबहुना जास्तच स्त्री वर्गाकडून वापरली जातात.

मुळात स्त्रीची जात कोणती आणि धर्म कोणता, तर अनेकदा तिच्या वडिलांकडून आलेला! (असं मानण्याची आपल्यात पद्धत आहे.) आईला यात महत्त्व दिलेलंच नाहीये आणि जात धर्म नसावा, अस्तित्वातच नसावा, असं मला कितीही लाख वाटत असलं, तरी तो आहे. असतो. फक्त कागदपत्री नव्हे तर तो जगण्यात कोळून उतरलेला असतो. लग्नानंतर स्त्रीने आपले घर सोडून नवऱ्याच्या घरी राहण्याची आपली जी महान परंपरा आहे, त्यात ती अनेक गोष्टी माहेरी सोडून जात असते. तिच्या राहण्या, खाण्या, झोपण्याच्या सवयी, इच्छा, स्वप्न, अनेकदा नावही तिने स्वतःची जात आणि धर्म सोडून यावा, अशीच अपेक्षा असते. अर्थात यात सामाजिकदृष्ट्या तिची जात आणि धर्म यांचं स्थान ‘उच्च’ किंवा ‘नीच’ आहे, यावरही काही गोष्टी अवलंबून असतात.

आता हा प्रश्न प्रेमविवाह झालेल्यांना जास्त पडतो, कारण अजून तरी ‘आपल्यात’ वेगवेगळ्या जातीतल्या मुला-मुलीचं लग्न ‘ठरवून’ करण्याची पद्धत नाही आणि जात, धर्म न बघता झालेल्या या प्रेमविवाहात नवऱ्याचाच धर्म आणि जात बायकोला आपोआप चिकटते. ‘special marriage act’मध्ये जी लग्न होतात, त्यात आपला धर्म तसाच ठेवण्याची तरतूद आहे. यात जातीचे काय होते मला माहीत नाही; पण या प्रकारे झालेल्या लग्नानंतरही ‘आमच्यात’ असं असतं आणि ‘तुमच्यात’ तसं हे नसतं का? कारण लग्न हे दोन माणसांत होत नसून, त्यात कुटुंब, समाज असे सगळेच एकत्र आलेले असतात आणि समाज आला, की जात येतेच.

प्रत्येक घराच्या म्हणून असंख्य चालीरीती असतात. त्या बहुतांश वेळा बायकांनीच पुढे न्यायच्या असतात. अर्थात यात त्यांची इच्छा काय आहे, हे विचारण्याची आपल्यात पद्धतच नाही. या चालीरीती, धर्म आणि जातीच्या भावनेतून अनेकदा निर्माण झालेल्या असतात. त्या सांभाळून, तडजोड करत बायकांनीच संसार पुढे रेटायचा असतो. यातल्या अनेक चालीरीती या स्वयंपाकघरातून सुरू होत असतात. परत एकदा आपल्या महान परंपरेनुसार स्वयंपाक हे स्त्रीचं काम असल्यामुळे, या जाती-धर्मनिहाय चालीरीती स्त्रियांच्याच बोकांडी येऊन बसतात.

बाईची जात असं म्हणताना खरंतर फक्त बाई असणं पुरेसं आहे. पण संसार म्हणलं की, हे जाती-धर्माचं जोखड घेऊन प्रत्येक बाई प्रवास करताना दिसते. बाई गं, याचा तुला काय फायदा? या सर्व जाती धर्मातल्या, कुठल्या पूजा तुझ्या भल्यासाठी केल्या जातात? चांगली बायको मिळावी म्हणून किती व्रत आहेत? कुठल्या सणाला, बायकांना आराम देऊन पुरुषांनी सर्व काम करण्याची पद्धत आहे? मूल जन्माला घालणे या व्यतिरिक्त सर्व कामे पुरुषही करू शकतातच. स्वयंपाकघरात पाय ठेवायला गर्भाशयाची गरज नसते, हे आपण कधी बोलणार आहोत?

जातीच्या उतरंडीत वरपासून खालपर्यंत सर्वात शेवटी स्त्रियाच येतात. जात झुगारून देणं हे फक्त पुरुषाचं काम नाही. अर्धं आयुष्य ‘बाईच्या जातीला शोभेल का हे’ हे ऐकण्यात घालवायचं आणि बाकीचं आयुष्य कुणाची तरी उसनी, उधार घेतलेली जात वागवत लाचारासारखं जगायचं, ही आपली महान परंपरा. जोवर बाईची जात ही जात व्यवस्था नाकारत नाही, तोवर ती दुय्यम वागणुकीला सामोरे जाणारच आहे. कारण जात आणि धर्म या पुरुष सत्तेतून जन्माला आलेल्या गोष्टी आहेत आणि त्यांची धग प्रमाणपत्रापासून स्वयंपाकघरापर्यंत सारखीच लागते!

beingrasika@gmail.com

loading image
go to top