esakal | आई माझी... बेस्ट फ्रेंड
sakal

बोलून बातमी शोधा

आई माझी... बेस्ट फ्रेंड

मला आईनंच सांगितलं की, आपली परंपरा पिढ्यांपासून चालत आली आहे आणि ती तू पुढं चालव. या सर्व गोष्टी आणि तिचे संस्कार डोळ्यासमोर व मनात ठेवून मी परंपरा चालवत आहे.

आई माझी... बेस्ट फ्रेंड

sakal_logo
By
रुचिता जाधव, अभिनेत्री

मेमॉयर्स
तुम्ही माझ्या शाळेतील, कॉलेजचा दाखला, ओळखपत्र किंवा सर्वच सोशल मीडियावर माझं नाव पाहाल, त्यात माझ्या वडिलांचं नाव दिसेल. मात्र, या सर्व गोष्टींपेक्षा मला माझी आई महत्त्वाची आहे. या सर्व गोष्टींचा मला अभिमान आहे. मला आईनंच सांगितलं की, आपली परंपरा पिढ्यांपासून चालत आली आहे आणि ती तू पुढं चालव. या सर्व गोष्टी आणि तिचे संस्कार डोळ्यासमोर व मनात ठेवून मी परंपरा चालवत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

माझी आई कल्पना जाधव. ती बीएस्सी डी. फार्म आहे. अत्यंत स्टायलिश आहे. तिच्याएवढी कडक आई कुठेच नाही. लहानपणी मी तिला खूप घाबरायचे. ती एवढी कडक होती की, मी बेस्ट फ्रेंड शोधायला लागले. खूप बेस्ट फ्रेंड आल्या आणि गेल्या. कॉलेज संपता-संपता कधी जाणवलंच नाही की, ज्या ‘बेस्ट फ्रेंड’च्या शोधात मी होते, ती माझी आई माझ्यासमोरच होती. आम्ही शाळेत असताना तिचं राजकीय करिअर सुरू झालं. ती नगरसेविका झाली. राजकारणाबद्दल तिला काहीच माहीत नव्हतं. तरीही अभ्यास करून तिनं त्यात ठसा उमटवला. हे करतानाही तिनं आमच्याकडं  लक्ष दिलं.

मी अभिनेत्री होईल, असं तिला कधीच वाटलं नव्हतं. माझा शूटचा पहिला दिवस होता, त्यावेळी आई नऊ तास उन्हात उभी होती. नंतर माझ्याकडं आली आणि म्हणाली, ‘तुला हे करायचं असेल तर कर. मी पाठिंबा देईल.’ आमच्या फॅमिलीत डॉक्‍टर, इंजिनिअर व्हा, नाहीतर २२-२३ व्या वर्षी लग्न करा, असं होतं. त्यातच ॲक्‍टिंग हा करिअरचा पर्याय नव्हताच. पण, या सर्वांना आईनं तोंड दिलं. बघता-बघता ती ‘बेस्ट फ्रेंड’ कधी झाली हे समजलंच नाही. मी आज जे काही आहे, ते आईमुळंच. मला हा प्रश्‍न नेहमीच पडायचा की, ती माझं कौतुक का करत नाही. पण, आज त्या गोष्टी जाणवतात की, मला कोणत्याही गोष्टीचा गर्व व्हावा, असं तिला वाटत नव्हतं. ‘तू अभिनेत्री आहेस, मोठीही होशील; पण माणूस व्हायला पाहिजे. आपले संस्कार, परंपरा कधीच विसरू नको,’ असं ती  नेहमीच सांगते. 

बघता-बघता मी मोठी झाले; पण आईसाठी लहानच राहिले. आजही ती मला घरी हातानं भरविते. ती कुठलीही गोष्ट तिला घेण्याआधी मला घेते. कुठं जायचं असल्यास बरोबर येतेस का, असं विचारते. रुचिता जाधव ही ‘कल्पना’ नसल्यास काहीच नाहीये. कारण, आजही मला तेवढा आत्मविश्‍वास आहे की, जगानं माझी साथ सोडली तरी आई कधीच सोडणार नाही. त्यामुळं मी बाहेर कधीच मैत्रीण किंवा प्रेम शोधायला जात नाही. 

माझा अविस्मरण क्षण म्हणजे माझ्या पिक्‍चरचा पहिला प्रिमिअर. त्यानंतर आईचे डोळे पाणावले होते. पिक्‍चर कसा होता, माझं काम कसं होतं, हे ती कधीच बोलली नाही. मीही तिला काही विचारलं नाही. ती गाडीत बसली. आम्ही पुण्याला आलो. त्यानंतर मला जाणवलं की, माझ्या प्रत्येक चित्रपटाच्या प्रिमिअरनंतर किंवा सिरियलच्या एपिसोडनंतर आईचे डोळे पाण्यानं भरतात. हेच तर माझ्यासाठी सर्वांत मोठं कौतुक असतं. माझ्या आईनं जे संस्कार दिले, प्रेम केलं, मैत्रीण झाली त्यांपैकी १० टक्के मी माझ्या मुलांबरोबर करू शकल्यास मी या जगातील सर्वांत प्राऊड मदर असेल. 

(शब्दांकन - अरुण सुर्वे)

loading image
go to top