मातृभाषेच्या ‘उज्ज्वल’ भविष्यासाठी... 

शिल्पा परांडेकर 
Saturday, 18 April 2020

भामरागड, गडचिरोली येथील अशीच एक अवलिया व प्राथमिक शिक्षिका, उज्ज्वला बोगामी. मुलांना शिक्षित करण्याबरोबरच त्यांना त्यांच्या भाषेत शिक्षण घेता यावे, यासाठी उज्ज्वला अथक प्रयत्न करतेय.

मातृभाषेतून आपण विचार, संस्कृती व इतिहास एकमेकांपर्यंत पोचवतो, अनेक गोष्टी शिकतो, मात्र दुर्दैवाने जगभरातील अशा अनेक भाषा नामशेष होत आहेत. अशा मातृभाषांना जतन करण्यासाठी ‘युनेस्को’ने २०१९ हे वर्ष समर्पित केले. आज हे सांगण्याचे एक खास कारण. महाराष्ट्रातील खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासदौऱ्यात मला आपला सांस्कृतिक वारसा व भाषा जपण्यासाठी आयुष्य समर्पित केलेले अनेक अवलिया भेटले. भामरागड, गडचिरोली येथील अशीच एक अवलिया व प्राथमिक शिक्षिका, उज्ज्वला बोगामी. 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

भामरागड म्हटल्यावर साधारण तिथल्या परिस्थितीचा व जनजीवनाचा अंदाज आलाच असेल. दुर्गम भाग, नक्षलग्रस्त प्रदेश, गरीब व अशिक्षित पालक यामुळे शिक्षणाविषयी इथल्या समाजात तशी अनास्थाच आढळते. मुलांना शिक्षित करण्याबरोबरच त्यांना त्यांच्या भाषेत शिक्षण घेता यावे, यासाठी उज्ज्वला अथक प्रयत्न करतेय. 

गोंड-माडियाकडून मराठीकडे... 
गोंड-माडिया ही इथल्या आदिवासी समाजाची मुख्य भाषा, मात्र शाळा व शिक्षक मराठी माध्यमातील असल्यामुळे विद्यार्थी शाळेत जाणे टाळायचे. विद्यार्थी-शिक्षक यांच्यात संवाद होणेदेखील दुरापास्तच. या समस्येचे निराकरण करण्यासाठी उज्ज्वलाने विद्यार्थ्यांबरोबर माडिया भाषेत संवाद साधत त्यांच्यात मराठी भाषेची गोडी निर्माण केली. मागील दीड वर्षांपासून तिने व तिच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी मराठी पाठ्यपुस्तकांचे ‘माडिया’ भाषेत रूपांतरण करण्यास सुरुवात केली. विद्यार्थी व शिक्षकांतील दरी कमी करण्यासाठी शिक्षकांना रोजच्या वापरातील माडिया शब्द शिकवण्याच्या कामातही तिचा मोठा वाटा आहे. सध्या इयत्ता पहिलीचे गणित व मराठी हे विषय माडिया भाषेतून शिकवले जातात. उज्ज्वला विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जबाबदारीबरोबरच गरजू विद्यार्थ्यांच्या आरोग्य व आर्थिक बाबींचीही जबाबदारी मोठ्या आवडीने व आनंदाने पार पाडते. यामागचा हेतू एकच, कोणत्याही कारणाने मुलांचे शिक्षण थांबू नये. 

उज्ज्वलाला इतक्या सगळ्या कामांसाठी प्रेरणा व ऊर्जा कोठून मिळते? ‘मी माझ्या पालकांच्या प्रोत्साहनामुळे शिकले व शिक्षिकाही झाले. पण मला खरी ओळख आणि जगण्याचे बळ देतात ते माझे विद्यार्थी.’ उज्ज्वला सांगते. मी या भागातील दुर्गमता व मानसिकता अनुभवली असल्यामुळे हे सर्व किती आव्हानात्मक आहे, हे जाणवते. तिच्या कार्याची महाराष्ट्र शासनाने व अनेक संस्थांनी दखल घेऊन तिला गौरविले आहे. 

आपण तिच्या कार्याला केवळ सलाम न ठोकता, तिच्या कार्यातून आपल्या मातृभाषेला व स्थानिक भाषेला सन्मान देण्याची, नामशेष होत जाणाऱ्या स्थानिक भाषांना जतन करण्याची प्रेरणा घ्यावी, असे मला वाटते. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: shilpa parandekar article about Mother tongue