Relations
RelationsSakal

नातीगोती : ‘तुझे आहे तुजपाशी’

सध्याच्या विभक्त कुटुंबपद्धतीमुळे कुटुंबप्रमुखावर अनेक प्रकारचे ताण पडत आहेत. मुलांनासुद्धा अभ्यासाचा प्रचंड भार व जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याचा ताण असतो.

सध्याच्या विभक्त कुटुंबपद्धतीमुळे कुटुंबप्रमुखावर अनेक प्रकारचे ताण पडत आहेत. मुलांनासुद्धा अभ्यासाचा प्रचंड भार व जास्तीत जास्त मार्क्स मिळवण्याचा ताण असतो. विभक्त कुटुंबपद्धतीमुळे त्यांना आपले विचार भावना व्यक्त करायला, ताण हलके करायला, मांडीवर डोकं ठेऊन विसावायला आजी-आजोबा नाहीत. मुलांचे आई-वडीलसुद्धा तितकेच बांधले गेलेले आहेत. सतत वाढणाऱ्या गरजा, जबाबदाऱ्या यातून स्वतःसाठी वेळही देता येत नाही. गृहिणीला प्रपंच्याव्यतिरिक्त काही करायची इच्छा असली तरी करता येत नाही आणि यामुळे घुसमट होत राहते. परिणामी घरातील वातावरण हसतेखेळते राहत नाही.

पूनम ही अशाच चक्रव्यूहात अडकलेली गृहिणी. एक दिवस तिची एक मैत्रीण मधू भेटायला आली. मधू पूनमला तिच्याबद्दल, कामाबद्दल खूप काही सांगत होती. बराच वेळ गप्पा झाल्यावर मधू निघून गेली. मधू जाऊन बराच वेळ झाला तरी पूनम तिच्या विचारांतच हरवून गेली. ती विचार करत होती, ‘माझी ही वर्गमैत्रीण अभ्यासात माझ्यापेक्षाही कमी; पण आज कर्तृत्वाने मोठी झाली. मधू तिच्या संसारात आनंदी दिसत होती. घरातील वादविवाद टाळून कसे पुढे जायचे याचे ती मर्म सांगून गेली. मधू उत्तम संसार करताना समाजकार्यसुद्धा करते. बोलता बोलता मधू म्हणाली, की तिला पुढे आणण्यामागे तिच्या सासू-सासऱ्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यांचं घरात असणं, मुलांवर लक्ष ठेवणं, घरात आनंदी, उत्साही वातावरण ठेवणं, आम्हा सर्वांना धीर देणं, समजावून घेणं या गोष्टींमुळे मी बाहेर आनंदाने उत्साहाने काम करू शकते. त्यांचे सकारात्मक विचार कायम माझ्या पाठीशी असून सदैव ऊर्जा देत असतात.’

पूनम मनात विचार करू लागली, ‘खरंच माझीही अशीच काही स्वप्न होती; पण ती राहून गेली. असं वाटतं, की मीसुद्धा माझ्या सासू-सासऱ्यांना जीव लावला असता, त्यांना समजावून घेतलं असतं, एकत्र राहिलो असतो, तर माझ्याकडून चांगलं कार्य घडलं असतं. अजून वेळ गेलेली नाही.’

संध्याकाळी अजय (पूनमचा नवरा) ऑफिसातून घरी आला. नेहमीप्रमाणे कन्या स्मिताने ‘बाबा बाबा’ म्हणत पळत येऊन मिठी न मारल्यामुळे व कुठे न दिसल्यामुळे अजयला आश्चर्य वाटले. तोच झालेला प्रकार पूनमने अजयला सांगितला. ‘‘अहो, भाजी संपत आली म्हणून मी बाहेर थोडा वेळ भाजी आणायला गेले होते. तेव्हा स्मिता मैत्रिणींबरोबर घरातच खेळत होती. मी जाताना सांगून गेले, की मुलांनो भांडण करू नका; पण मी जरा कुठे गेले नाही तोच यांची भांडणे सुरू. घरी परत आल्यावर पाहते तर काय- स्मिता रडत होती, तिच्या डोक्याला जखम झाली होती, रक्त वाहत होते. ताबडतोब तिला घेऊन डॉक्टरांकडे गेले. त्यांनी मलमपट्टी केली व गोळ्याही दिल्या आहेत. ती आत झोपली आहे.’’

‘अगं, आपण स्मिताची काळजी घ्यायला हवी, तिच्यावर लक्ष ठेवायला पाहिजे,’’ अजय सांगत होता.

‘हो ना; पण त्यासाठी घरात वडीलधारी कुणी असायला हवं,’’ पूनम सांगू लागली. ‘‘कुणी सांभाळायला ठेवायचं म्हटलं तर त्यांची खात्री नसते आणि परवडतही नाही. घरातली आपली माणसं ती आपली असतात.’’

अजय आणि पूनमला आपली चूक कळली होती. पूनमने आपल्या सासू-सासऱ्यांना घरी बोलावण्याचा निर्णय घेतला. अजय आणि पूनमने त्यांची माफी मागून पुन्हा एकत्र राहण्याची विनंती केली. लाडक्या नातीची- स्मिताची आपल्या आजी-आजोबांना हाक. ‘‘आजी आजोबा, या ना पुन्हा, तुमची खूप आठवण येते, माझ्याबरोबर खेळा ना, मला गोष्टी सांगा ना!’’

आजी-आजोबांनीही मन मोठे केले. झाले गेले विसरून नातीला हृदयाशी कवटाळून ते ‘हो’ म्हणाले व पुन्हा एकदा सर्वजण एकत्र आनंदाने नांदू लागले.

- सुमन टवळ

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com