थॉट ऑफ द वीक : सहनशीलता-शाप की वरदान? 

सुप्रिया पुजारी, लाईफ कोच 
Friday, 29 May 2020

लहानपणापासून ‘सहनशील हो’ असे सांगितले जाते.त्याचे फायदे ही तितकेच आहेत. कधी नाती जपली जातात,कधी वेळ मारून नेली जाते, कधी भांडणे मिटतात, कधी आपणही अधिक सक्षम असल्यासारखे वाटते.

रेखा, ४० वर्षाची महिला; तिच्या आयुष्यात खूप समाधानी होती. नवरा व दोन मुली असे एक छोटे कुटुंब होते. एका रविवारी, अचानक दोन्ही मुली भांडायला लागल्या. कारण विचारताच दोघीही जास्तच भांडू लागल्या व एकमेकीला दोष देऊ लागल्या.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

रेखाने मोठ्या मुलीला बाजूला घेत समजविले, ‘तू मोठी आहेस ना, तू समजून घे. थोडी सहनशीलता ठेव.’ मोठ्या मुलीने ते ऐकले व भांडण मिटले. तेवढ्यात रेखाच्या मैत्रिणीचा फोन आला. मैत्रिणीने नोकरीच्या ठिकाणी तिला सतत अपमानास्पद वागणूक मिळत असल्याचे सांगितले. रेखाने सर्व ऐकून झाल्यावर एक सल्ला दिला, ‘थोडी सहनशील राहा, कारण नोकरीची आपल्याला गरज आहे.’ हे ऐकताच मोठ्या मुलीने रेखाला प्रश्न केला, ‘आई, कायम सहनशील राहिलो, तरच प्रश्न सुटतात का?’ 

यावर रेखा काही बोलू शकली नाही. तात्पुरते उत्तर देऊन ती निघून गेली, मात्र मुलाचा प्रश्न योग्यच होता. तिला तिचेच मन खात होते, कारण ‘सहनशील हो’ हा सल्ला सर्व ठिकाणी अंमलात आणला तर खरेच प्रश्न सुटतो का? बाह्य भांडण मिटते, पण आपल्या अंतर्मनातील भांडणाचे काय? सहनशीलता महत्त्वाची आहेच, पण त्याचा अतिरेक खरेच प्रश्न सोडवितो का? 

रेखासारखेच आपल्यालाही लहानपणापासून ‘सहनशील हो’ असे सांगितले जाते. त्याचे फायदे ही तितकेच आहेत. कधी नाती जपली जातात, कधी वेळ मारून नेली जाते, कधी भांडणे मिटतात, कधी आपणही अधिक सक्षम असल्यासारखे वाटते. पण अतीसहनशीलता एक शाप ठरू शकते. कारण सहनशील राहण्यामध्ये एक किंमत मोजावी लागते. ती किंमत आहे आपली शक्ती (एनर्जी), आपला आत्मविश्वास व आपला स्वतःसाठी असलेला आदर. जोपर्यंत किंमत छोटी आहे, तोपर्यंत आपण आनंदाने सहन करतो. मात्र, कधी कधी आपण खूप मोठी किंमत मोजतो. त्याचा आपल्यावर सर्वांत जास्त परिणाम होतो. सातत्याने अशी मोठी किंमत मोजत राहिल्यास मागील लेखात मांडल्याप्रमाणे आपण ‘भावनिक गुलामच होतो.’ 

यावर उपाय काय? 
१. मोजावी लागणारी किंमत तपासा. 

ज्या वेळी आपण सहनशील राहतो, मग कारणे कोणतीही असो, त्याची मला कोणती व किती किंमत मोजावी लागणार आहे हे तपासा. ती किंमत आपले अंतर्गत नुकसान करीत आहे का व आपल्याला ती किंमत मोजल्यावर शांत वाटते, की ताण येतो याचा विचार करा. 

२. लोक काय म्हणतील - हा विचार बदला . 
आज पण आपण लोक काय म्हणतील म्हणून खूप गोष्टी सहन करीत राहतो. लोकांचा विचार करूनदेखील आपण सहनशील राहतो, पण त्याने खरेच मार्ग निघतो का? लोक काय म्हणतील यापेक्षा, ‘मला योग्य काय वाटते,’ हा विचार अधिक बळ देतो. 

३. शाबासकीचा भ्रम व अट्टाहास टाळा. 
आपल्याला ‘परफेक्ट माणूस’ अशी पदवी कोणीही देणार नाही, तसेच सहन करून, स्वतःला त्रास करून आपल्याला शाब्बासकी कोणाला हवी आहे? हा एक भ्रम आहे की, ‘सहनशीलता’ असल्यावर जग तुम्हाला शाबासकी देते. बाह्य शाबासकीसाठी आपण अंतर्मनाला किती त्रास करून घेत आहोत, हे ओळखा. 

४. सहनशीलतेची यादी. 
आपण एक यादी करू, मी किती गोष्टी आज सहन करीत आहे? त्या यादीचे दोन भाग करू, सौम्य किंमत व तीव्र किंमत. सौम्य किंमत आपण सहज सत्कर्मासाठी मोजतो, पण मोठी किंमत असल्यास तुम्हाला त्यावर तातडीने काम करायला लागेल. 

५. निर्णय घ्या. 
आजपासून निश्चय करा. मला ज्या गोष्टीचा जास्त त्रास होतो. त्या मी आजपासून सहन करणार नाही. सहनशीलता कोठे व किती ठेवायची याचा हक्क व निर्णय तुम्हाला घ्यायचा आहे. 

लक्षात ठेवा, स्वनिश्चय हाच तुमचा मित्र आहे. सहनशीलता शाप बनवायची की वरदान, हा निश्चयही तुम्हालाच करायचा आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Supriya pujari Thought of the Week article about patience

Tags
टॉपिकस
Topic Tags: