
लाल माती, नारळी-पोफळीची झाडं अन् नितांत सुंदर समुद्रकिनाऱ्याच्या सान्निध्यातलं, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड हे माझं माहेर. इथंच मी लहानाची मोठी झाले.
- स्वप्ना केसकर, पुणे
लाल माती, नारळी-पोफळीची झाडं अन् नितांत सुंदर समुद्रकिनाऱ्याच्या सान्निध्यातलं, सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड हे माझं माहेर. इथंच मी लहानाची मोठी झाले. यथावकाश लग्न झालं अन् सासरी पुण्याला आले. आमच्या देवगडचा प्रसिद्ध हापूस आंबा सगळीकडेच ‘भाव’ खाऊन जातो. तिथला आंबा जसा गोड, तशीच कोकणातली माणसंही नात्यांचा गोडवा जपणारी. देवगडपासून जवळच दाभोळला आमचं मूळ घर आहे. आजी, काका-काकू व चुलत भावंडं मिळून पंधरा माणसांचं मोठं एकत्र कुटुंब होतं. ओसरी, पडवी, माजघर, देवघर, स्वयंपाकघर अन् प्रशस्त अंगणात सुबक तुळशी वृंदावन. आम्ही उन्हाळ्याच्या सुट्टीत या घरी सगळी भावंडं मिळून खूप मजामस्ती, धमाल करायचो.
वडिलांचा व्यवसाय देवगडला असल्यानं आई-बाबा आणि आम्ही दोघी बहिणी देवगडला स्वतःच्या वाड्यात राहायचो. तीन मोठी घरं आम्ही भाड्यानं दिली होती. बाबांनी शेजाऱ्यांना घरमालक म्हणून कधीच वेगळी वागणूक दिली नाही. ते सर्वांशी प्रेमानं, सलोख्यानं राहायचे. साहजिकच भाडेकरूंनाही माझ्या बाबांबद्दल भीतियुक्त आदर वाटायचा. ते कडक शिस्तीचे; पण तितकेच प्रेमळही होते. बाबांनी पडवीत एक छोटासा सुबक झोपाळा बनवून घेतला होता. दारापुढे एक छानसं तुळशीवृंदावन होतं. परसबागेत गुलाब, मोगरा, जाई-जुई, जास्वंद, कर्दळी, अबोली, सदाफुली, रंगीबेरंगी डेलिया अशी कितीतरी फुलझाडं बाबांनी हौसेनं फुलवली होती. सकाळी सकाळी प्राजक्ताखाली शुभ्रकेसरी टपोऱ्या फुलांचा सडा पडलेला पाहूनच मन प्रसन्न व्हायचं.
रोज सकाळी रेडिओ ऐकताऐकता बाबांचं तासभर तरी बागकाम चाललेलं असायचं. आंबा, नारळ, सीताफळ, चिक्कू, केळी, पपई अशी फळझाडंही लावली होती. आई-बाबांना स्वच्छता व टापटिपीची आवड होती. त्यामुळे आम्हालाही तशीच हाताबरोबर आवरायची सवय लागली. जशी कडक शिस्त होती, तितकेच लहानपणी आमचे लाडकोडही खूप पुरवले गेले. आमच्यावर धार्मिक संस्कारही बाबांमुळेच झाले. देवपूजा, स्तोत्रपठण वगैरेंची बाबांसारखी आम्हालाही आवड लागली. कधीतरी मैत्रिणींबरोबर समुद्रकिनाऱ्यावर फिरायला जायचो. वाळूचा किल्ला करून रंगीत शंखशिंपले गोळा करणं, पाण्यात खेळणं यामध्ये वेळ कुठेच निघून जायचा.
गणपती, नवरात्रात दाभोळच्या घरी जमायचो. तिथे आंबे, फणस, शहाळी, काजूगर, पेरू सगळं मनसोक्त खायला मिळायचं. केळीच्या पानांवर जेवायला मोठी पंगत बसायची. दुधातुपाची समृद्धी होती. असं हे जीवाला जीव देणाऱ्या माणसांनी भरलेलं माहेरघर व त्याच्या रम्य आठवणी मनाच्या मखमली कप्प्यात जीवापाड जपून ठेवल्या आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.