esakal | सौंदर्यखणी : खानदाणी बनारसी शालू!
sakal

बोलून बातमी शोधा

shalu

सौंदर्यखणी : खानदाणी बनारसी शालू!

sakal_logo
By
रश्मी विनोद सातव

उत्तर प्रदेशातील, धार्मिक अधिष्ठान लाभलेल्या बनारसला, वाराणसी किंवा काशी म्हणूनसुद्धा ओळखलं जातं. बनारसमध्ये अनेक सुंदर प्राचीन मंदिरं आहेत. त्या मंदिरातील जयघोषाबरोबरच अजून एक लयबद्ध आवाज ऐकू येतो, तो म्हणजे घरोघरी हातमागावर विणल्या जाणाऱ्या विणकामाचा!

चौदाव्या शतकात बनारसमध्ये मुघल साम्राज्यातील विणकर, सोन्या-चांदीची ‘जर’ रेशमी धाग्यांबरोबर विणून उंची वस्त्रं विणत असत. या काळात वाराणसीत, देशोदेशीचे व्यापारी मोठ्या प्रमाणात येत असत, त्यातल्याच काही व्यापाऱ्यांमुळे, बारीक नक्षीकामाचा प्रकार पर्शियातून आल्याचं मानलं जातं. तेव्हा मुघलसम्राट जहांगीरची बेगम नूरजहाँ हिनं कतान सिल्कवर जरीच्या विणकामात प्रयोग करून या विणीला राजाश्रय दिला होता. त्या विणकामाची परंपरा आजतागायत चालू आहे.

मुघलांच्याही आधी, काशी नावाच्या या राज्यात मोठा व्यापार-उदीम चालत असे आणि तेव्हा बनारसमध्ये सुती वस्त्रं मोठ्या प्रमाणात विणली जात असत. बनारस आणि आजूबाजूच्या गावांमधून विणल्या जाणाऱ्या बनारसी साड्या, त्यात वापरलेल्या धाग्यांवरून निरनिराळ्या नावानं ओळखल्या जातात. अगणित साड्या बनारसमध्ये विणल्या जातात, म्हणून बनारसला ‘साड्यांचं माहेरघर’ म्हणता येईल.

कतान सिल्कची बनारसी साडी म्हणजे बनारसी साड्यांची महाराणी. मलबेरी सिल्कचे मऊ धागे हातमागावर उभे-आडवे लावून, साडी विणता-विणताच टेस्टेड ‘जरी’चे धागे ‘शटल’चा वापर करून हाताने आडवे टाकून ‘जरी’चं नक्षीकाम साडीवर उतरवलं जातं. याला ‘कढुआ काम’ म्हणतात. ‘कढुआ काम’ करून विणलेल्या साड्या बनारसी शालू म्हणून प्रचलित आहेत.

बनारसीचा अजून एक प्रकार म्हणजे ‘सॅटिन-सिल्क बनारसी साडी.’ या साड्यांना वरच्या बाजूने ‘कतान’पेक्षा जास्त चमक असते. शिवाय या साड्या ‘कतान’पेक्षा जास्त सुळसुळीत असतात. ‘बनारसी शालू’ सॅटिन विणीत विणले जात असत. परंतु सॅटिन-सिल्कमध्ये विणलेले शालू तुलनेनं जड असल्यामुळे आता हे विणकाम कमी होऊन भरजरी शालूसुद्धा ‘कतान-सिल्क’मध्ये विणले जाऊ लागले आहेत. उच्च प्रतीचं सिल्क वापरून हे शालू विणतांना, तान्यात दोन प्लाय आणि बान्यात चार प्लायचे घागे वापरले जातात, त्यामुळे कतान आणि ‘सॅटिन-सिल्क’चे शालू वर्षानुवर्षे टिकतात.

बनारसी साड्यांच्या पदरावर, बॉर्डरवर आणि बुट्ट्यांमध्ये गोल्ड, सिल्व्हर किंवा कॉपर जरीचं अतिशय बारीक नक्षीकाम असतं. साड्यांच्या नक्षीवर पर्शियन संस्कृतीचा प्रभाव दिसतो. आर्टिस्ट आधी ग्राफ पेपरवर नक्षी काढून घेतात. त्या नक्षीनुसार जाड पुठ्ठ्याचे कार्ड्‌स पंच करून ‘जकार्ड’ पद्धतीनं साडीवर ‘जरी’चं विणकाम होतं. ‘जकार्ड’ पद्धत अस्तित्वात येण्याच्याही आधी छोट्या लाकडी फ्रेमवर उभे-आडवे धागे लावून हातानं विणकाम करून एकेका डिझाईनचे मास्टरपीस करून घेतले जात असत, त्यांना ‘नक्षेबंदी’ म्हणत असत. मग नक्षेबंदीनुसार हातमागावर उभे-आडवे धागे मोजून नक्षी विणली जात असे. ‘नक्षेबंदी’ करणाऱ्या कारागिरांची पिढी मात्र आता संपली!

बनारसी साड्यांच्या नक्षीकामावरूनही प्रकार पडतात ‘ब्रोकेड’, ‘जंगला’, ‘शिकारघा’, ‘तंनचोई’, ‘वासकट’, ‘बुट्टीदार’, ‘जामदानी’, ‘मीनावर्क’ अशा नावांनी त्या ओळखल्या जातात. ‘जंगला’ किंवा ‘जाला’ प्रकारात साडीवर रंगीत रेशमी धाग्यांनी पानाफुलांची वेलबुट्टी विणली जाते. जंगलातले प्राणी-पक्षी कलात्मकतेने विणले जातात तेव्हा तिला ‘शिकारघा’ म्हणतात. ‘ब्रोकेड’ बनारसीवर, बान्यात तलम जरीचे धागे टाकून संपूर्ण साडीवर नक्षीकाम केलं जातं. तनचोई बनारसीवर ‘जरी’ऐवजी रेशमाच्या धाग्यांनी विणकाम केलं जातं. तनचोईवर बऱ्याचदा कोयऱ्यांचे सुंदर प्रकार विणलेले दिसतात. ‘जर’ वापरली नसल्यानं त्या तुलनेनं हलक्या आणि मऊ असतात. ‘वासकट’ प्रकारात अर्ध्या साडीवर ‘जाला’ काम, तर अर्ध्या साडीवर ‘बुट्ट्या’ असतात. संपूर्ण साडीवर बुट्टे असलेल्या ‘बुट्टीदार बनारसी’लाच बुट्ट्यांचा शालूदेखील म्हणतात. शालूव्यतिरिक्त ‘खड्डी-जॉर्जेट’, ‘शिफॉन-जॉर्जेट’ इत्यादी प्रकारसुद्धा बनारसमध्ये विणले जात आहेत. या प्रकारांसाठी दुसऱ्या एखाद्या लेखात भेटूयात.

शालूत जपलेलं बालपण!

गोव्याची एक ‘स्मार्ट’ मुलगी, ३५ वर्षांपूर्वी चित्रपटसृष्टीत आली आणि मराठी चित्रपटसृष्टीला एक ग्लॅमरस अभिनेत्री मिळाली. आपल्या सौंदर्यानं आणि अभिनयानं प्रेक्षकांना मंत्रमुग्ध करणारं एव्हरग्रीन नाव म्हणजे... वर्षा उसगावकर! वर्षा लहानपणी आरशासमोर ‘शोले’तील ‘बसंती’चे संवाद म्हणत असे! तिची आई तिला नाटकांना न्यायची, शिवाय ‘कलाशुकलेंदू’ नाट्यसंस्थेत नाव दाखल केलं होतं. एकदा ‘संगीत मस्त्यगंधा’ नाटकातील सत्यवतीच्या भूमिकेतील वर्षाचा अभिनय बघून प्रेक्षकांमधून एक आजोबा येऊन वर्षाच्या पाया पडले. तेव्हा केवळ १४ वर्षांची असलेली वर्षा कमालीची संकोचली होती; पण ते आजोबा म्हणाले, ‘‘तू मोठी कलाकार होशील बाळा, माझे आशीर्वाद आहेत तुला...’’ ते आजोबा परत भेटले नाहीत; पण त्यांचं भाष्य मात्र खरं ठरलं.

पुढे कॉलेजमध्ये असताना दामू केंकरेंनी तिला ‘कार्टी प्रेमात पडली’ नाटकात घेतलं आणि ते नाटक सुपरहिट ठरलं, त्यातून तिला ‘ब्रह्मचारी’ हे नाटक आणि ‘गंमत जंमत’ चित्रपट मिळाला! तिच्या सगळ्याच कलाकृती सुपरहिट ठरत गेल्या!

वर्षा गोव्याला शाळेत असताना तिचे वडील- अच्युतराव उसगावकर मोठे मंत्री होते. आता गोव्याच्या मुख्यमंत्र्यांसाठी असलेला बंगला तेव्हा कॅबिनेट मंत्र्यांसाठी राखीव होता, त्यामुळे वर्षाचं लहानपण त्यातच गेलं. पोर्तुगीजांनी बांधलेला तो वीस खोल्यांचा बंगला म्हणजे जणू राजवाडाच. त्या बंगल्यात वर्षा आणि तिचं कुटुंब सण-समारंभ मोठ्या प्रमाणात साजरे करत असत. तेव्हा वर्षाची आई- माणिकताई त्या समारंभांना सुंदर साड्या नेसत असत. वर्षाला आईच्या साड्या, विशेषतः बनारसी शालू खूप आवडत असत. वर्षा म्हणाली, ‘‘आई झोपली किंवा बाहेर गेली, की मी आईचे ते सुंदर शालू नेसून स्वतःला आरशात न्याहळत राही. आईच्या साड्या आणि शालू मी गुजराती पद्धतीने नेसत असे, कारण त्यामुळे भरजरी पदराचं खरं सौंदर्य दिसून येतं. गुलबक्षी रंगाचा एक शालू मला खूप आवडत असे. त्या शालूवर अँटिक जरीनं कोयऱ्या विणलेल्या होत्या.’’

एका हळदीकुंकू समारंभाला वर्षानं तो शालू नेसला, आईचे दागिनेही घातले. तेव्हा वर्षा फक्त १३ वर्षांची होती. वर्षाचं रूप पाहून महिला म्हणाल्या, ‘‘अगं माणिक, ही तर नवरीच वाटते आहे. कालपर्यंत फ्रॉकमध्ये पाहिलेली ही एवढीशी पोर एवढी मोठी कधी झाली’’ वर्षा म्हणाली, ‘‘आईच्या हाताखाली केलेलं ते काम, वाटलेलं ते सौभाग्याचं ‘वाण’, त्या बरोबर दिलेली ती मातीची बुडकुली.. आणि तेव्हा नेसलेला तो शालू... सारं आत्ताच तो सीन शूट केल्यासारखा दिसतो आहे.’’

वर्षाचं ‘शालू प्रेम’ पुढेही कायम राहिलं. ‘गंमत जंमत’मधील एका सीनमध्ये वर्षानं निर्मात्यांचं न ऐकता प्रॉडक्शनची साडी न नेसता, आईचा एक जांभळ्या रंगाचा सिल्व्हर जरीचा बुट्टेदार शालू नेसला होता. वर्षाला नंतर तेव्हाच्या डॅशिंग भूमिकांमध्ये फारशी साडी नेसायला मिळाली नव्हती; पण ‘स्टार प्रवाह’ वरील ‘सुख म्हणजे नक्की काय असतं?’ मालिकेमुळे आता फक्त साडीच नेसावी लागते.

तीस-पस्तीस वर्षांपूर्वीचे आईचे शालू वर्षानं आणि तिच्या बहिणींनी अजूनही जतन करून ठेवले आहेत. त्यातील काही साड्या वर्षानं सिनेमांच्या काही कार्यक्रमांनाही नेसल्या आहेत. शिवाय आजही ती आईकडे गोव्याला गेल्यावर आईसोबत आईच्या साड्यांचा खजिना काढून बसते; पण तो गुलबक्षी रंगाचा शालू तिच्यासाठी खूप खास आहे, कारण त्या शालूत तिनं गोव्यातलं मौल्यवान बालपण सांभाळून ठेवलं आहे!

loading image
go to top