माझिया माहेरा : आनंदाचा ठेवा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

umbrajgav village

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओझरपासून ९ किलोमीटर अंतरावर असलेले उंब्रजगाव हे माझे माहेर.

माझिया माहेरा : आनंदाचा ठेवा

- वर्षा नलावडे, पुणे

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील ओझरपासून ९ किलोमीटर अंतरावर असलेले उंब्रजगाव हे माझे माहेर. आम्ही एकूण पाच भावंडे- चार बहिणी व एक भाऊ. वडील मुंबईला एसटी ड्रायव्हर म्हणून काम करत होते. सेवानिवृत्त झाल्यावर आम्ही सर्वजण गावी राहायला आलो. गावात मळगंगा आणि महालक्ष्मी देवीची दोन मंदिरे आहेत. नवरात्रात नऊ दिवस या देवींचा खूप मोठा उत्सव असतो. शेवटचे दोन दिवस मोठी यात्रा भरते. गावात या दिवसांत उत्साहाचे वातावरण असते. दसऱ्याच्या दिवशी या उत्सवाचा शेवटचा दिवस असतो.

आम्ही भावंडे या यात्रेची खूप आतूरतेने वाट बघायचो. आमची तयारी महिनाभर आधीच सुरू असायची. त्यात सुटीच्या दिवशी घराच्या भिंती, अंगण सारवणे; तसेच माळा साफ करणे अशी लगबग असायची. अजूनही तितक्याच उत्साहाने ती यात्रा भरते. अर्थात सर्व बहिणींची लग्न झाल्यामुळे व भाऊ नोकरीनिमित्त औरंगाबादला असल्यामुळे सर्वांचे एकत्र जाणे होत नाही; परंतु मनात आतूरता मात्र असतेच. कारण आम्हाला यात्रेनिमित्त नवीन कपडे; तसेच पाळण्यात बसण्यासाठी आमची होणारी लगबग अजूनही आठवते. घर शेतात असल्यामुळे रोज सकाळी उगवत्या सूर्याचे दर्शन, पक्ष्यांच्या किलबिलाटासोबतच झालेली सकाळ.. कधीच न विसरता येणारे ते दिवस होते. उन्हाळ्यात चुलतभाऊ, मामेभाऊ, बहिणी असे आम्ही सर्वजण सुट्टी मजेत घालवायचो. चांदण्या रात्री बाहेर अंगणात ओळीने अंथरुण टाकून खूप गप्पा मारायचो. खूप मजा यायची. ते दिवस कधी संपूच नयेत असे वाटायचे. चांदण्या मोजतामोजता आकाशाकडे पाहत कधी झोप लागायची कळायचे नाही.

जवळच येडगाव, डिंबे, माणिकडोह ही धरणे आहेत. खोडद येथील दुर्बिणही याच भागात आहे. उन्हे कमी झाली, की आम्ही येडगाव धरणावर फिरायला जायचो. ते शांत, निळेशार पाणी, ती थंड हवा, वाऱ्यासोबत येणाऱ्या त्या लाटा हे बघतच बसावे असे वाटे. परंतु वेळेत घरी या असे आईने सांगितलेले असायचे. कारण या भागात ऊस जास्त प्रमाणात आहे. त्यामुळे बिबटोबा या भागात येणाऱ्या-जाणाऱ्यांना; तसेच शेतात कामे करणाऱ्यांना नेहमीच दर्शन देतात. उशीर झाला, की आईचा ओरडा बसणार हे ठरलेले असायचे; पण खरेच बालपणीचा काळ सुखाचा, म्हणूनच म्हणतात, ‘लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा.’

मित्र-मैत्रिणींसोबत भटकंती करून झाडाच्या चिंचा, कैऱ्या पाडून खाण्यातला आनंद, एवढीशी गोष्ट एकमेकांना वाटून घेण्यातला आनंद, सायकलने शाळेत व कॉलेजला जाण्यातला तो आनंद. वडील वारकरी संप्रदायातील असल्यामुळे घरातील वातावरण नेहमीच भक्तिमय व प्रसन्न असे. त्यात भर पडली ती म्हणजे आमची वहिनी. तीही आमच्यामधीलच एक होऊन जाते. उन्हाळ्यात किंवा काही कार्यक्रमासाठी आम्ही सर्वजण अजूनही एकत्र आलो, की खूप मजा करतो. आमची सर्वांची मुलेही आनंदाने आमच्यात सामील होतात. वडील आता आमच्यात नाहीत; परंतु त्यांची उणीव आम्हाला नेहमीच जाणवते. माहेराविषयी लिहावे तेवढे कमीच आहे. असे हे माझे निसर्गाच्या सान्निध्यातील समृद्ध माहेर.

टॅग्स :Womens Corner