esakal | का पळून जातायेत महिला अन्‌ मुली?
sakal

बोलून बातमी शोधा

Social-Media

आई-वडिलांचाही थोडा विचार करा...
ज्यांनी आपणाला लहानाचे मोठे केले, त्यांना आपण क्षणात विसरून जातो. पळून जाऊन विवाह केल्यानंतर आई-वडिलांवर ओढवलेल्या परिस्थितीचा जराही विचार मुलांमुलींकडून केला जात नाही, असे पालकांचे म्हणणे आहे. त्यामुळे मुलामुलींनीही आपल्या पालकांचा विचार करावा.

पालकांनी जागरूक असावे
बहुतांश वेळा वेगवेगळ्या जातीतील मुला-मुलींचे प्रेम जुळते. आईवडिलांकडून या नात्याला संमती मिळावी, अशी त्यांची इच्छा असते. प्रथा आणि रूढी परंपरेमुळे आंतरजातीय विवाहाला सहजासहजी मान्यता दिली जात नाही. आईवडील, नातेवाईक यासह भविष्याचा कुठलाही विचार न करता चित्रपटातील आभासी दृश्‍यांसारखे मुले- मुली थेट घरातून पळून जातात. त्यामुळे शाळा व महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या मुलामुलींकडे पालकांनी लक्ष द्यावे. ते खरेच शाळेत जातात का? त्यांचे मित्र कोण आहेत, याची माहिती घेऊन त्यांच्या दिनक्रमाविषयी माहिती घेणे गरजेचे झाले आहे.

का पळून जातायेत महिला अन्‌ मुली?

sakal_logo
By
रवींद्र पाटे, विवेक शिंदे

सोशल मीडियाचा अतिवापर व गतिमान जीवनशैलीमुळे पालकांचे पाल्याकडे होणारे दुर्लक्ष, पती-पत्नीमध्ये गैरसमज निर्माण होणारा संशय, सुसंवादाचा अभाव व व्यसनाधीनता या कारणांमुळे कौटुंबिक स्वास्थ्य बिघडत चालले आहे. त्यातून घटस्फोट, पळून जाणे, आत्महत्या यांसारखे प्रकार घडू लागले आहेत. ते टाळण्यासाठी पालकांनी पाल्यांवर लक्ष ठेवणे व त्यांना वेळ देणे गरजेचे आहे. तसेच नातेसंबंधात संशय निर्माण होणार नाही, याची काळजी घेतली पाहिजे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मंचर (ता. आंबेगाव) पोलिस ठाण्यात गेल्या सात महिन्यांच्या कालावधीत २४ जणी बेपत्ता झाल्या आहेत. त्यामध्ये दहा अल्पवयीन मुलींचा समावेश आहे. ‘मैत्रिणीला भेटून येते’, ‘महाविद्यालयात जाते’, असे सांगून घरातून बाहेर पडलेल्या या तरुणी घराकडे परत आल्याच नाहीत. 

मंचर पोलिस ठाण्याच्या कार्यक्षेत्रात जून २०१९ ते डिसेंबर २०१९ या कालावधीत १४ ते १७ वयोगटातील दहा अल्पवयीन मुली व १८ ते २२ वयोगटातील १४ मुली व विवाहित महिला बेपत्ता व पळून गेल्याच्या घटना घडल्या आहेत. 

नारायणगाव (ता. जुन्नर) पोलिस स्टेशन परिसरातील १९ गावांतून मागील वर्षभरात वीस ते पंचवीस वयोगटातील पंधरा विवाहित महिला, वीस अविवाहित तरुणी बेपत्ता झाल्या होत्या. सतरा अल्पवयीन मुलींना फूस लावून पळवून नेण्यात आले होते. बेपत्ता झालेल्या अठरा तरुणी व चौदा अल्पवयीन मुलींचा शोध घेण्यात पोलिसांना यश आले आहे. बेपत्ता झालेल्या बहुतेक तरुणी सोशल मीडियाच्या माध्यमातून निर्माण झालेल्या प्रेमसबंधातून निघून गेल्या होत्या.

सोशल मीडियाच्या माध्यमातून विवाहित महिला, तरुणींना मेसेज पाठवले जातात. या माध्यमातून प्रामुख्याने पतिपत्नीमध्ये गैरसमज निर्माण होऊन संशयाचे वातावरण निर्माण होते. त्यामुळे कौटुंबिक कलह निर्माण झाल्याने विवाहित महिला पळून जाण्याचे व घटस्फोट घेण्याचे प्रमाण वाढत आहे. कौटुंबिक कलह सहन न झाल्याने काही महिला अथवा पुरुष आत्महत्या करण्याचा प्रयत्न करतात. संशय, सोशल मीडिया व सुसंवादाच्या अभावामुळे अशा घटनांत वाढ झाली असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. 
 - अर्जुन घोडे पाटील, सहायक पोलिस निरीक्षक, नारायणगाव (ता. जुन्नर)

मुलांकडे लक्ष देण्यासाठी पालकांकडे वेळ नाही. वडील पैसा कमविण्यात; तर आई मोबाईलमेध्ये गुंतलेली असते. वयात येत असताना मुलांच्या हाती स्मार्टफोन देण्याचा परिणाम त्यांच्या आयुष्यावर पडतो. मैत्रिणींना असलेला बॉयफ्रेंड आपल्यालाही असावा, असे विचार मनात येणे स्वाभाविक आहे. घरात कुणी वेळ देत नाही; म्हणून ती बाहेर कोणी वेळ देणारा शोधत असते. त्यातून मुली नको त्या वयात प्रेम नावाच्या जाळ्यात अडकतात. असे प्रकार टाळण्यासाठी पालकांनी पाल्यांवर लक्ष ठेवणे व वेळ देणे गरजेचे आहे.
-  कृष्णदेव खराडे, पोलिस निरीक्षक, मंचर (ता. आंबेगाव)

समुपदेशनाची गरज  
याबाबत पोलिस स्टेशनमध्ये तक्रार आल्यानंतर पोलिस तपास करून विवाहित महिला व पुरुषांचे समुपदेशन करण्याचा प्रयत्न करतात. तपासात शुल्लक कारणावरून वाद विकोपाला गेल्याचे स्पष्ट होते. संशयावरून घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतलेल्या अनेक दांपत्यांचे पोलिस समुपदेशन करतात. त्यातून त्यांच्यातील गैरसमज दूर करून त्यांना घटस्फोट घेण्यापासून परावृत्त केले आहे.

loading image
go to top