esakal | वूमनहूड : बॅायफ्रेंड 
sakal

बोलून बातमी शोधा

वूमनहूड : बॅायफ्रेंड 

माझ्याकडे मैत्रीण म्हणून माझे मित्र-मैत्रिणी सल्ले मागायला येतात, तेव्हा मात्र मी संभ्रमात पडते. नेमकं काय बरोबर आणि काय चूक? कोणाचं बरोबर, कोणाचं चूक? कुठलीच स्त्री किंवा पुरुष सर्वगुणसंपन्न नसतो.

वूमनहूड : बॅायफ्रेंड 

sakal_logo
By
रानी (राधिका देशपांडे), अभिनेत्री

हा  हा! शीर्षक वाचल्यावर लगेच उत्सुकता वाढली असेल ना?  बॉयफ्रेंड हा विषयच तसा नॉर्मल लोकांना कुतूहलाचा आहे. तर, सांगायचं हे आहे, की मी त्या काळातली आहे ज्या काळात ‘बॉयफ्रेंड’ हे प्रकरण प्रचलित नव्हतं. ‘बॉईज’ म्हणजे ‘मुलं’ होती; पण ‘बॉयफ्रेंड’ असला काही प्रकार नव्हता. होती ती फक्त ‘लफडी’, नाहीतर एकत्र जीवन-मरणाच्या आणाभाका घेतलेली प्रेमीयुगुलं. मुलगी सासरी आली, की तिच्या जगासकट जुनी नाती फिकी पडायची. मैत्रिणींची जागा नणंदा-भावजयांनी घेतलेली असायची आणि आयुष्यात ‘बॉय’ कोणी असेल, तर तो तिचा स्वतःचा नवरा.... पण, आता तसं नाही. मुलगी सासरी आली, तरी तिचा माहेरच्यांशी संवाद बऱ्यापैकी रोज बघायला मिळतो. मित्र-मैत्रिणी तिच्याशी कनेक्टेड असतात. माहेरचं आडनावसुद्धा तिच्याबरोबर असतं. हे सध्याचं ‘नॉर्मल’ आहे. राहतो मुद्दा ‘गर्लफ्रेंड’, ‘बॉयफ्रेंड’चा. तर त्यांचीही एंट्री होते; पण ‘एक्स बॉयफ्रेंड’, ‘एक्स गर्लफ्रेंड’ म्हणून. बदल अजून झालेला नाही, तो एक्स्ट्रा-मॅरिटल अफेअरमध्ये. अनैतिक संबंधांना अजूनही मान्यता नाही. मुळात एका पुरुष आणि स्त्रीमध्ये संबंध तेव्हा ‘अनैतिक’ होतात जेव्हा त्यांनी आपल्या जोडीदाराला अंधारात ठेवलेलं असतं. त्याच्यापासून लपवलं आणि खोटं बोलावं लागलं तर... पण, हे आजूबाजूला घडत असताना नाकारता कसं येणार!

माझ्याकडे मैत्रीण म्हणून माझे मित्र-मैत्रिणी सल्ले मागायला येतात, तेव्हा मात्र मी संभ्रमात पडते. नेमकं काय बरोबर आणि काय चूक? कोणाचं बरोबर, कोणाचं चूक? कुठलीच स्त्री किंवा पुरुष सर्वगुणसंपन्न नसतो. प्रत्येकाच्या गरजा वेगवेगळ्या असतात. मानसिक, शारीरिक, बौद्धिक अशा तीनही स्तरांवर नवरा-बायको पूरक असतील का, यावर मला शंका आहे. मग यापैकी कुठल्याही गरजांसाठी त्यानं किंवा तिनं मैत्री केली, तर आपल्या भुवया अजूनही का उंचावतात? फसवण्याची, खोटं बोलण्याची वेळच का येते? लग्न झाल्यावर ‘मला तो माणूस मित्र म्हणून आवडतो,’ असं सांगायलाही अनेक बायका अजूनही का घाबरतात? ‘आपण कॉफी प्यायला भेटलो हे सांगू नकोस हं माझ्या बायकोला,’ असं पुरुष मंडळी का सांगतात? इथूनच खरी गडबड व्हायला सुरुवात होते.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

मी कॉलेजमध्ये असताना आईचा नियम होता. मी कुठं जाते आहे, कोणाबरोबर आहे, घरी किती वाजता येणार आहे, हे सांगायचं. मग मी काय केलं, किती आणि कुठल्या गप्पा मारल्या हे तिनं मला खोदून कधीच विचारलं नाही. हीच सवय मला आजही आहे; पण आता आईऐवजी मी नवऱ्याला सांगते. मग त्याचंही काही म्हणणं नसतं. शेवटी नातं विश्वासावर चालतं. निखळ, अवखळ, कुठलेही पाश नसलेलं, निव्वळ सहवासाची अपेक्षा असलेलं नातं हे मैत्रीचं. मग ते लग्नाआधीही आणि लग्नानंतरही बघणाऱ्यांना अमान्य का असावं? नातं मैत्रीच्या पलीकडे गेलं आहे, त्यांनी त्यांची लक्ष्मणरेषा ओलांडली आहे हे आपण सांगणारे कोण? सगळेच नवरा-बायको, प्रियकर-प्रेयसी अगदी आदर्श कसे असू शकतील? 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

माझ्या मते, आयुष्याच्या कुठल्याही टप्प्यावर माणसाला मित्र-मैत्रीण हे नातं असावं. त्याला अगदी ‘बॉयफ्रेंड’, ‘गर्लफ्रेंड’ म्हणायची काय गरज? काही नाती तुम्हाला टवटवीत ठेवतात, इच्छांना नवी पालवी फुटते, नातं बहरलं की त्याचा वृक्ष तयार होतो, तो अनेक नात्यांना जपतो आणि त्याचं फळ म्हणजे, आनंद! मी या विषयावर माझ्या नवऱ्याशी आणि तेरा वर्षाच्या मुलीशी चर्चा केली. तिला विचारलं, ‘बॉयफ्रेंड’बद्दल तुझं काय मत आहे?’ तर तिनं फाडफाड इंग्रजीत उत्तर दिलं. ‘बॉयफ्रेंड्स आर ओव्हररेटेड अँड अ वेस्ट ऑफ टाईम.’ आश्चर्यानं आमचे डोळे बाहेर आणि तोंडाचा ‘ऑ’ झाला. आमचे चेहरे पाहून म्हणते, ‘आई एवढं रिअॅक्ट व्हायची गरज नाही. This is the new normal.’

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामुळे ‘बॉयफ्रेंड’ या विषयाला आणि लेखाला इथं पूर्णत्व मिळत नाही, तर इथून तो खरा सुरू झाला आहे. माझा नवरा म्हणाला, ‘शेवटी तू लेखात तुला बॉयफ्रेंड आहे का नाही हे वाचकांना सांगितलंच नाहीस.’ त्याच्या मते एखाद्या शास्त्रीय गायकानं षड्जावर येतो आहे, म्हणताम्हणता पलटी घेऊन दुसऱ्या सुराकडे वळावं तसं केलं मी. काय म्हणता, मुद्द्याचं बोलू?... बरं सांगते, ह्या लेखाला शब्दांची मर्यादा असल्यामुळे आणि काही कारणास्तव मला हा लेख इथेच थांबवावा लागतो आहे. पुन्हा भेटूच!