काय करु आणि काय नाही

काय करु आणि काय नाही

वुमनहूड :  
कोरोना म्हणजे काहीच करू नका किंवा हवं ते करा, असा अर्थ होत नाही. मात्र, हा विषाणू भारतात आल्यापासून माझ्यासारख्या एका ठिकाणी न बसणाऱ्या मुलीला, आता मी काय करू आणि काय नाही असं झालं आहे. अचानक रिकामंपण आल्यामुळं हातावर हात ठेवून बसले आहे. सगळ्या ‘डेली सोप्स’ना एका विषाणूनं खाल्लं आहे. वर्तमानपत्रांपासून आईनं पाठवलेल्या व्हॉटस्ॲप मेसेजपर्यंत सगळ्यांना झपाटलं आहे. त्यामुळं आम्हा कलाकारांचं शूटिंगही थांबलं आहे. आता घरातल्या ‘डेली सोप’ने हात धुऊन घरीच ‘क्वारंटाईन’ व्हायची वेळ आली आहे.

नवरेसुद्धा घरीच बसून काम करत आहेत म्हटल्यावर बऱ्याच जणांकडं घरातला ‘क्वालिटी टाइम’, ‘क्वारल टाइम’ व्हायला व्हायरस एवढाच वेळ लागतो आहे! बाहेर असीम शांतता, भयावह वातावरण, काळजी, चिंता असताना तुझ्या बुद्धीला विनोद कसे काय सुचतात हेच मला कळत नाही, असं नवरा म्हणतो तेव्हा चर्चेला सुरुवात होते. कसं आहे ना, मुळातच आम्ही कलाकार प्रत्येक क्षण जगणारे, काहीसे फकीर. प्रत्येक घटनेकडं बघण्याचा आमचा  दृष्टिकोन वेगळाच. नकला करणं, विनोद शोधणं, मनोरंजन करणं, समाजाच्या भावनेशी सहजपणे एकरूप होणं आम्हाला जमतं. आम्हाला जे वाटतं ते आम्ही आमच्या कलेतून व्यक्त करणं पसंत करतो. 

मला सध्या सुरू असलेल्या परिस्थितीत बहुतांश वेळेला फार्स जाणवतो. माणसं एकमेकांशी विचित्र आणि विक्षिप्त वागतात. ज्ञानाच्या अभावामुळं कशी कावरी बावरी होतात हे पाहून गंमत वाटते. आमच्या शेजारचे काका क्रिकेटप्रेमी आहेत. मी त्यांना येता जाता स्कोअर विचारते. काल विचारलं, तर चेहरा पडला होता, १४७ म्हणाले. मी म्हटलं विराट खेळत असेल, तर चिंतेचं कारण नाही. ते म्हणाले चिंतेचं कारण आहे बेटा. व्हायरसनं १४७ लोकांना इनफेक्ट केलं आहे. घरात वीज गेली म्हणून शॉपिंग मॉलमध्ये जाणारी मी आज घरी बसले आहे. सध्या रोजच रात्री आमच्या घराचं ‘होम थिएटर’ होतंय. काही दिवसांपूर्वी होळी होती. कोणीतरी सांगितलं ‘भिमसेनी’ कापूर टाकल्यानं व्हायरस पसरत नाही आणि चार तासांत अख्या नगरातला कापूर दुकानातून गायब झाला. लोकांनी किलो-किलोने कापूर होळीत टाकला. आमच्या सोसायटीमध्ये अफवा पसरली की, एका मोलकरणीला आलिंगन दिलं म्हणे व्हायरसनं. झालं... लगेच दुसऱ्या दिवसापासून काम करणाऱ्या बायकांवर बंदी घालावी, का हा विचार. एक वेळ नाकाबंदी, संचारबंदी, जमावबंदी चालते हो, पण बायका बंदी म्हणजे... 

हा चिनी व्हायरस एक वेळ पुण्यात तुळशीबाग बंद करू शकेल, याची कल्पना होती. पण बायका बंदी म्हणजे जरा अतीच झालं, नाही का? झाडू, पोछा, धुणे, भांडी मलाच करावं लागेल, असं स्वप्नातसुद्धा वाटलं नव्हतं! आता ‘घर की मुर्गी भैंस बराबर’ काम करताना दिसते आहे. सगळेच आज काल सुपर मार्केटला जात आहेत म्हटल्यावर मी पण ठरवलं आपणही घेऊन येऊ सामान. कसलं काय, मी पोचेस्तोवर अर्ध्याहून अधिक गोष्टी संपल्या होत्या. सगळ्यांमध्ये व्हायरस नाही पण भस्म्या शिरला आहे, याची प्रचिती आली. मी एकाला दुसऱ्याच्या ट्रॉलीमधून हॅण्ड सॅनिटायजर उचलताना पाहिलं, तेव्हा लक्षात आलं परिस्थिती अवघड आहे. माणसाचं खरं रूप बाहेर पडत आहे. तेवढ्यात मला जोरदार शिंक आली, तर चक्क लोक माझ्याकडं रागानं बघायला लागले. बरं राग आला हे मी त्यांच्या डोळ्यांकडं बघून सांगते आहे, कारण तोंड कसं पाहणार? तोंडावर मास्क होता ना.

घराखाली मुलांसाठी खेळायची जागा आहे, पण तिथं आज मुलं नव्हती. लहान मुलांना शिक्षा का, असा प्रश्न मला बेचैन करून गेला. ‘मुलांनो रिकाम्या जागा भरा’ हे वर्षानुवर्ष आपण शिकत आलो आहोत. आता ‘रिकामा वेळ भरा‘ हे शिकवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. सगळेच घरी बसून खाणार म्हटल्यावर प्रत्येकाचं किमान दोन किलो वजन वाढणार. आता हा भार पृथ्वीला सहन करावा लागणार. मैत्रिणीला वेगळीच चिंता. म्हणाली, ‘बाई काही बंद करा पण ब्युटी पार्लर चालू ठेवा,’ नाहीतर परिस्थिती अजून भयाण दिसेल. 

एकूणच काय, या पॅंडेमिक परिस्थितीमध्ये माणूस विचित्र वागतो, हे खरं आहे. या संकटावर मात करण्याचं सूत्र गवसत नाही तोपर्यंत प्रत्येक जण प्रयत्न करणार हे नक्की. आपलं सरकार प्रयत्नशील आहे. मित्रांनो, निसर्ग चंचल आहे, अवखळ आहे. क्षणात कोणाचा घात करेल, तर दुसऱ्या क्षणी त्याला जीवदानही देईल. हा व्हायरस म्हणजे नियतीने लक्ष्मणाला मारलेला बाण असल्यास त्याचं निदान करण्यासाठी आपल्याकडं द्रोणागिरी पर्वत आणि संजीवनीसुद्धा आहेच की! आज अमेरिकेत राहणारे लोक परिस्थिती बिकट होईल अशी शंका बाळगून ‘गन’ विकत घेत आहेत, तर दुसरीकडे भारतात ‘गन पॉइंट’वर तपासणी सुरू आहे. भारत सक्षम आहे. प्रत्येक भारतीयाने लढण्याची, सामोरे जाण्याची आणि संपूर्ण सहकार्याची तयारी दाखवली आहे, याचा मला अभिमान वाटतो. आता घाबरायचं नाही लढायचं. आयुष्याच्या रंगभूमीवर प्रत्येकानं आपला खेळ खेळायला हवा.

वाचकांनो, स्वतःला sanitize करा, stay safe आणि नमस्ते!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com