वुमेन हेल्थ  : ताण आणि प्रजनन आरोग्य 

डॉ. ममता दिघे 
Saturday, 25 April 2020

स्ट्रेस हार्मोन्समुळे इतर हार्मोन्सवर परिणाम होतो आणि त्याचे पडसाद प्रजनन आरोग्यावरही पडतात. जगण्याशी प्रत्यक्ष संबंध नसलेल्या यंत्रणा त्यामुळे मंदावतात.

आपल्या शरीरातील अनेक तक्रारी, व्याधी या सगळ्याच्या मुळाशी बरेच वेळा एकच कारण असते. ते कारण दिसत नाही, वर वर शोधता सापडत नाही, पण आजार काही केल्या कमी होत नाही. हे लपलेले कारण आहे, न दिसणारा पण मनाला जाणवणारा ताण! आजच्या धकाधकीच्या जीवनात माणसाला अनेक प्रकारच्या ताणांना सामोरे जावे लागते. तुमच्या मनाला ताण जाणवल्यावर शरीर एकतर त्यापासून लांब पळते किंवा झुंज देते. शरीर दोन प्रकारचे हार्मोन्स निर्माण करते: एपिनेफ्रीन म्हणजेच अॅड्रेनेलिन आणि कोर्टीसॉल जे अॅड्रेनेलिनसारखेच असते, पण अधिक काळ कार्यरत राहते. ताणामुळे शरीराने हे हार्मोन्स निर्माण करणे सतत सुरु ठेवल्यास कायमचा ताण मागे लागू शकतो, ज्याला क्रॉनिक स्ट्रेस म्हणतात. याने शरीर कायम फाईट किंवा फ्लाईट मोडमध्येच राहते. कधीच विसावा घेत नाही. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

स्ट्रेस हार्मोन्समुळे इतर हार्मोन्सवर परिणाम होतो आणि त्याचे पडसाद प्रजनन आरोग्यावरही पडतात. जगण्याशी प्रत्यक्ष संबंध नसलेल्या यंत्रणा त्यामुळे मंदावतात. उदा प्रजनन यंत्रणा! अशा रोज कार्यरत नसलेल्या यंत्रणा बाजूला पडून शरीर सतत ताणाशी लढत राहते. 

प्रजनन आरोग्यावर परिणाम - 
१. मासिक पाळी - ताणाचा मासिक पाळीवर खूप परिणाम होतो. पाळी अनियमित होऊ शकते, चक्राचा अवधी बदलू शकतो किंवा पाळीच्या वेळी वेदना वाढू शकतात. 

२. लैंगिक इच्छा - ताण, मन भरकटणे, दमणूक, थकवा या सगळ्यामुळे लैंगिक इच्छा कमी होते. 

३. गर्भधारणा - ताणामुळे गर्भधारणेला त्रास होऊ शकतो. ओव्ह्युलेशनच्या समस्या, PCOS, वारंवार गर्भपात, गर्भ पिशवीत न रुजणे यांसारख्या समस्या उद्‍भवू शकतात. 

४. ताण आणि वंध्यत्व उपचार (infertility treatment) - वंध्यत्वावर उपचार घेत असताना शरीराने उपचारांना प्रतिसाद द्यायला हवा असल्यास मनाची साथ असणे खूप गरजेचे आहे. ताण असल्यास या उपचारांचा सक्सेस रेट खूप कमी होऊ शकतो. 

५. गर्भारपणातील आरोग्य - ताणाचा गर्भारपणातील आरोग्यावरही खूप परिणाम होतो आणि प्रसूतीनंतरही तब्येत मूळपदावर यायला अवघड जाते. ताण असलेल्या मातेच्या बाळाच्या वाढीवरही परिणाम होऊ शकतो. 

६. पाळीच्या आधीचा त्रास - ताणामुळे पाळीच्या आधी गोळे येणे, पोट फुगल्यासारखे वाटणे, मूड खराब होणे असे त्रास होऊ शकतात. 

७. रजोनिवृत्ती - पाळी बंद होण्याची वेळ जवळ आली की, हार्मोन्सच्या पातळीत झपाट्याने बदल होऊ लागतात. याने घाबरल्यासारखे होणे, मूड सतत बदलणे, हताश वाटणे आणि काही शारीरिक त्रासही होऊ शकतात. 

८. प्रजनन व्यवस्थेचे आजार - स्थूलता, PCOS यांसारखे आजारही ताणामुळे होऊ शकतात. 

ताणाचे व्यवस्थापन 
• घरात निरोगी वातावरण - ताण दूर ठेवायचा असल्यास नात्यांमध्ये मोकळेपणा हवा. घरात सामंजस्य असले, की ताण आपोआप कमी होतो. 

• एकमेकांना समजून घेणे - स्वत-साठी आणि आपल्या जोडीदारासाठी आवर्जून वेळ काढला पाहिजे आणि एकमेकांना समजून घेतले पाहिजे. 

• खूप जबाबदाऱ्या अंगावर ओढून न घेणे - खूप जास्त गोष्टी अंगावर घेतल्या की ताण येतो. त्यामुळे काही ठिकाणी ‘नाही’ म्हणायला शिका. 

• छंद जोपासणे - स्वत-चे मन छंदात रमवले की, ताण निश्चितपणे हलका होतो. 

• हिरव्यागार जागी चालणे - बागेत, निसर्गामध्ये फिरल्याने ताण खूप कमी होतो. 

• मन शांत करणे - मेडीटेशन, प्राणायाम, आणि योगासने करणे. 

• पुरेशी झोप घेणे - झोप नीट न झाल्यास मूड खराब होतो आणि ताणही येतो 

ताण हा माणसाचा खूप मोठा व छुपा शत्रू आहे. ताण घालवायचा ताण घेतल्यास तो अधिकच वाढेल. ताण नसणे हे केवळ प्रजनन आरोग्यासाठीच नाही, तर एकुणच तब्येत चांगली ठेवण्यासाठी गरजेचे आहे. सध्या तुम्हाला काहीही त्रास होत नसला, तरी शारीरिक, मानसिक आरोग्य उत्तम राहावे म्हणून जाणीवपूर्वक प्रयत्न करून ताण दूर ठेवायला शिका. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Women Health Stress and Reproductive Health

Tags
टॉपिकस
Topic Tags: