गोष्ट मैत्रीची : होय, मी परमेश्‍वराला पाहिलं!

माझ्या खोलीपासून जवळच शकील यांचं पानांचं दुकान आहे. ते साधारणतः ३० वर्षांपूर्वी कामानिमित्त बिहारहून पुण्यात आले आणि इथंच स्थायिक झाले.
Aashish Bhore and Shakil Shaikh
Aashish Bhore and Shakil ShaikhSakal
Updated on

‘A friend in need is a friend indeed’ या उक्ती प्रमाणे माझ्या कठीण समयी मदत करणारे बरेच मित्र आहेत. त्या बाबतीत मी खरंच भाग्यवान आहे. अशाच माझ्या अनेक मित्रांपैकी एक म्हणजे शकील शेख!

माझ्या खोलीपासून जवळच शकील यांचं पानांचं दुकान आहे. ते साधारणतः ३० वर्षांपूर्वी कामानिमित्त बिहारहून पुण्यात आले आणि इथंच स्थायिक झाले. माझ्या एका मित्रामुळं माझी आणि त्यांची ओळख झाली. तेव्हापासून मी बाजारात जाताना नेहमी त्यांच्या दुकानाजवळ थांबून १५-२० मिनिटं तरी गप्पा मारल्याशिवाय पुढं जायचो नाही. शकील यांचं शिक्षण झालं नसलं, तरी व्यवहारज्ञान प्रचंड आहे. शेरो-शायरीवर त्यांचं विशेष प्रेम. अतिशय मिस्कील स्वभाव. त्यामुळं आमची मैत्री अधिकच घट्ट होत गेली.

गेल्यावर्षी कोरोना महामारीमुळं टाळेबंदी जाहीर झाली आणि मला नोकरी गमवावी लागली. सुरवातीच्या काही महिन्यांमध्ये थोडीफार बचत शिल्लक असल्यामुळं दैनंदिन खर्च, तसेच खाणावळीचा खर्च देण्यास अडचण आली नाही. मात्र, टाळेबंदी अंशतः उघडल्यानंतरही नोकरी मिळण्याची काही शक्यता दिसत नसल्यानं हवालदिल झालो होतो. खाणावळीच्या मालकांची परिस्थिती बेताचीच असल्यानं त्यांना देखील उधारी परवडण्यासारखी नव्हती. माझी खानावळ बंद झाली.

माझी परिस्थिती शकील यांना कळाली, त्यावेळेस ते आणि त्यांचं सर्व कुटुंब माझ्या पाठीशी भक्कमपणे उभं राहिलं. त्या संकटसमयी माझ्या मदतीला त्यांच्या रूपानं अक्षरशः परमेश्वरच धावून आला होता. पुढचे दोन ते अडीच महिने मला त्यांच्या घरून रोज सकाळचा नाश्ता आणि दोन वेळचं जेवण येत होतं. कुठल्याही मोबदल्याशिवाय! मलाही लाज वाटायची.

मी शकील यांना म्हणालो, की नोकरी लागली की थोडे-थोडे करून तुमचे डब्याचे पैसे परत करीन. त्यावेळेस ते माझ्यावर प्रेमानं रागावले आणि यापुढं मी जेवणाच्या पैशाचा विषय काढल्यास आपली मैत्री संपुष्टात येईल, असा प्रेमळ दमही दिला. त्यांच्या संपूर्ण कुटुंबानं निर्णय घेतला, की मला नोकरी लागून पहिल्या महिन्याचा पगार हातात येईपर्यंत ते मला जेवण देणार. मधल्या काळात मला दैनंदिन खर्चासाठी देखील त्यांनी मोलाची आर्थिक मदत केली. एका छोट्या पानाच्या दुकानाच्या कमाईवर सहा जणांचे कुटुंब पोसणाऱ्या शकील भाई यांनी मला देखील कुटुंबातील सदस्याप्रमाणं वागवलं. त्यांचं जीवनविषयक तत्त्व अतिशय सोपं, पण महान आहे. ते म्हणजे - परमेश्वर मला इतरांना मदत करण्याची ताकद देईल, तोपर्यंत मी मदत करीत राहणार.

बरेचजण म्हणतात, की परमेश्वराला कोणी बघितलं का? तर हो मी बघितलं! शकील भाई आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या रूपात. त्यांनी मित्राच्या नात्यानं निःस्वार्थपणे केलेली मदत मी आयुष्यात कधीच विसरू शकत नाही. अशा मित्रांच्या आयुष्यात येण्यानं आयुष्य खऱ्या अर्थानं समृद्ध होत जातं. मदतीची ही साखळी पुढं चालू ठेवण्याची प्रेरणा मिळते. शकील भाईंसारखा मित्र मिळणं ही मी माझ्यावर असलेली परमेश्वराची कृपाच मानतो.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com