
खाद्यभ्रमंती : इंदूरच्या ‘सराफा’तील ‘शहाळ्याचा शेक’
मागच्या वर्षी मी आणि विश्वनाथ गरुड बुलेटवरून भोपाळला गेलेलो, तेव्हा इंदूरला राहिलो होतो. इंदूरला गेल्यानंतर ‘सराफा’मध्ये जाणं हे शास्त्र असतं. मग आम्ही कसं ते चुकवणार? प्रचंड थकलेलो होतो, तरी ‘सराफा’ गाठलंच. वेगवेगळे चाट, दहीवडे, गराडू, फराळी खिचडी, गुलाबजाम आणि वेगवेगळ्या गोड पदार्थांचा डोळ्यांनीच आस्वाद घेतला. ‘गराडू’ हा थोडा वेगळा प्रकार वाटला म्हणून टेस्ट केला. विश्वनाथनं त्याचे आवडते गुलाबजाम टेस्ट केले. ‘सराफा’तून चक्कर मारताना ‘नवीन’ नावाच्या एका स्टॉलवर ‘कोकोनट क्रश’ असा बोर्ड पाहिला. काय असू शकतं, याची कल्पना होती. कारण तिथं नेमके कोणकोणते पदार्थ मिळतात, याची बरीच रसभरीत वर्णनं ऐकली होती. ‘कोकोनट क्रश’ म्हणजे दुसरं तिसरं काही नाही, तर शहाळ्यातील मलईचा शेक.
मला ही कल्पनाच भारी वाटली. आवडली. हल्ली कल्पनेसाठी दाद आणि पैसे देण्याइतका दिलदारपणा फार कोणाकडं आहे, असं वाटत नाही. छ्या, त्यात कसलं आलंय कौतुक... मला देखील ते सुचलं असतं किंवा मी पण ते केलं असतं, असं म्हणून लोक एखाद्याची कल्पना शून्यात काढतात. त्यामुळं ही कल्पना ‘नवीन’चीच की आणखी कोणाची माहिती नाही, पण ज्याला कोणाला सुचलं त्याला हजार तोफांची सलामी वगैरे...शहाळ्यातील एकदम गोड नि नरम मलई असतेच, सोबत शहाळ्यातील पाणी. मलई आणि नारळ पाण्याचा शेक. शहाळं फोडून त्यातली मलई काढून मिक्सरमध्ये टाकायची. सोबत त्याच शहाळ्यातील पाणीही आवश्यकतेनुसार मिक्स करायचं. मिक्सर फिरवत राहायचा. ग्राहकाला हवं असेल, तर त्यात चवीसाठी थोडी साखर आणि थंडपणासाठी बर्फ टाकायचा नि पुन्हा मिक्सर बराच वेळ फिरवायचा. मिश्रण मस्त एकजीव झालं, की गाळून घ्यायचं आणि ग्लासमध्ये भरून सर्व्ह करायचं.
अनेकदा एखादं पाश्चात्य पेय किंवा ज्यूस, सरबत सर्व्ह करताना कसं ग्लासला लिंबाचा काप लावून देतात, तसं काही ठिकाणी मलई शेकच्या ग्लासला शहाळ्यातील नरमनरम मलईचा काप लावून देतात. तेवढीच थोडीशी सजावट आणि वेगळेपणही. इथंही परत नवी कल्पना, नवी सजावट...
खरंतर मलई नि नारळपाणी गोडच असतं. त्यामुळं त्यात उगाचच भरपूर साखर घातली, की मूळ मलई आणि नारळपाण्याची चव म्हणावी तितकी नीट लागत नाही. त्यामुळं साखर न घालायला सांगणं किंवा अगदी थोडी साखर घालणं चांगलं. अन्यथा शहाळ्याचा शेक घेतोय, की साखरेचा पाक हे समजत नाही. गोड नि गारेगार असा शहाळ्याचा शेक ट्राय केला आणि दिवसभराचा शिणवटा दूर झाला. एकदम मस्त वाटलं. वेगळं काहीतरी ट्राय केल्याचा आनंद मिळाला. शेवटी सराफातील पानवाल्याकडं पान न खाण्याची रिस्क न घेता पुण्याहून सोबत नेलेलं ‘शौकीन’चं साधा फुलचंद तोंडात टाकलं आणि ‘सराफा’तून बाहेर पडलो, एकदम चांगल्या आठवणींसह...
Web Title: Aashish Chandorkar Writes About Coconut
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..