esakal | खाद्यभ्रमंती : १११ वर्षांचं ‘इम्पिरियल’
sakal

बोलून बातमी शोधा

Imperial Cold Drink

खाद्यभ्रमंती : १११ वर्षांचं ‘इम्पिरियल’

sakal_logo
By
आशिष चांदोरकर

‘जुनं ते सोनं’ हा मंत्र जपतानाच ‘नवं ही हवं’ हे लक्षात ठेवलं, तर वास्तू किंवा ब्रँड कितीही जुना असला, तरीही त्याची उत्तरोत्तर प्रगती होते, हे कोल्हापुरातील शिवाजी चौकात असणाऱ्या ‘इम्पिरियल कोल्ड्रिंक हाऊस’कडे पाहिल्यानंतर समजतं. फक्त तांबडा-पांढरा रस्सा आणि तेजतर्रार मिसळच नाही, तर दूध कोल्ड्रिंक आणि कॉकटेल ही सुद्धा कोल्हापूरची ओळख आहे आणि ती निर्माण करण्यात, जपण्यात ‘इम्पिरियल’चा मोठा वाटा आहे, हे कायम लक्षात ठेवलं पाहिजे.

कै. रामचंद्र हरी गवळी (शिंदे) हे पूर्वी एका छोट्या गाडीवर गोटी सोडा विकायचे. त्यानंतर छत्रपती राजाराम महाराज यांच्या प्रेरणेतून त्यांनी शिवाजी चौकातच एक छोटेखानी दुकान सुरू केलं आणि तिथं सोडा, दूध कोल्ड्रिंक, जेली, आइस्क्रीम आणि कॉकटेल विकायला प्रारंभ केला. त्यावेळी आइस्क्रीम विकणारं ते देशभरातलं तिसरं दुकान. मुंबईत १९०६ ‘बादशाह’ सुरू झालं. त्यानंतर गुजरातेत १९०६-०७ आणखी एका ठिकाणी आइस्क्रीम निर्मिती होऊ लागली आणि १९१०मध्ये सुरू झालेलं ‘इम्पिरियल’ तिसरं, अशी माहिती गवळी यांच्या तिसऱ्या पिढीतील हृषिकेश दिलीप गवळी (शिंदे) हे देतात.

आज १११ वर्षांनंतर ‘इम्पिरियल’ची कोल्हापूरकरांना सवय झाली आहे. फक्त कोल्हापूरकरच नाही, तर कोल्हापूरमध्ये अंबाबाईच्या दर्शनासाठी येणाऱ्या अनेक भक्तांसाठी ते हक्काचं ठिकाण बनलं आहे. सोडा फाउंटन मशिन आणि मोठ्या लाकडी पॉटमध्ये हातानं फिरवून आइस्क्रीम तयार करणारं एलडी वूड्स कंपनीचं मशीन ही ‘इम्पिरियल’ची खासियत. आजही एलडी वूड्सच्या मशिनमध्ये आइस्क्रीम तयार होतं. पण फक्त दसऱ्याच्या दिवशी कारण. कारण पाच लिटर आइस्क्रीमसाठी तीनहून अधिक तास मशिन हातानं फिरवावं लागतं. शिवाय आइस्क्रीमला मागणी अधिक असल्यानं त्या मशिनमधून तयार होणारं आइस्क्रीम पुरत नाही. म्हणून फक्त वर्षांतून एकदाच आइस्क्रीम तयार केलं जातं, असं हृषिकेश सांगतात.

सर्व परंपरा जपतानाच ''इम्पिरियल''नं सोडा, आइस्क्रीम आणि दूध कोल्ड्रिंकच्या फ्लेव्हर्समध्ये वैविध्य आणलं. जुनी चव जपतानाच नव्या स्वादांनाही आपलसं केलं. ‘कॉकटेल’ची सुरुवात कोल्हापुरात झाली की सिंधुदुर्गात? याची चर्चा सोशल माध्यमांवर चांगलीच रंगलेली असते. मला त्या वादात पडायचं नाही. अगदी हृषिकेशही त्या वादात पडू इच्छित नाहीत. आपल्याला त्याचा आस्वाद घेण्याशी मतलब. पण ‘कॉकटेल’ संस्कृती रुजविण्यात कोल्हापुरातील ‘इम्पिरियल’ आणि ‘सोळंकी कोल्ड्रिंक्स’ यांचा सिंहाचा वाटा आहे, हे कोणीही नाकारू शकत नाही. शिवाजी चौकाप्रमाणेच आता राजारामपुरीतही ‘इम्पिरियल’ची आणखी एक शाखा सुरू झाली आहे.

फळांचे काप, आइस्क्रीम, फ्लेव्हर्ड मिल्क, जेली आणि सुकामेवा घालून तयार होणारं वेगवेगळ्या स्वादांचं ‘कॉकटेल’ ही परंपरा ‘इम्पिरियल’नं जपलीय. त्यातील सुकामेवा आणि फळांचे काप सोडले तर इतर सर्व पदार्थ ही मंडळी स्वतः तयार करतात. एकदम ताजे. रोजच्या रोज. मला वाटतं, त्यातला जेली हा पदार्थ सिंधुदुर्गात मिळणाऱ्या ‘कॉकटेल’पेक्षा थोडा वेगळा. जेली नुसती खायलाही एकदम भारी लागते. व्हॅनिला, रोज (एकदम प्लेन, हलका) आणि मँगो हे मिल्कशेक्स. पायनापल, लेमन आणि रोझ स्वादाची जेली नि लेमन, कुल्फी, कॉफी, वॉलनट यांच्यासह आइस्क्रीमचे पारंपरिक फ्लेव्हर्स... सोबत मिराचीना सोडा आणि कॉफी बिअर... हे सारंच एकदम भन्नाट...

कोल्हापुरात गेल्यानंतर सकाळी अंबाबाईचं दर्शन, मिसळीवर किंवा शिवाजी पेठेतल्या लोणी डोशावर ताव, रंकाळ्यावर चक्कर आणि तांबड्या-पांढऱ्याचा आस्वाद या जोडीला आता ‘इम्पिरियल’चं कॉकटेल, जेली, कॉफी बिअर किंवा लेमन आइस्क्रीम वगैरेंचा स्वाद घ्यायला अजिबात विसरू नका...