esakal | लग्नाची गोष्ट : गर्लफ्रेंड ते जोडीदार...

बोलून बातमी शोधा

Amey-and-Sajiri}

आजच्या मराठी मनोरंजन सृष्टीतील नव्या पिढीतील आघाडीच्या कलाकारांपैकी एक अभिनेता अमेय वाघ. त्याचा बहारदार अभिनय, सूत्रसंचालन आणि सोशल मीडियावरील फोटोंवरच्या हटके कॅप्शन्स यांतून नेहमीच तो सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. त्याच्या पत्नीचं नाव आहे साजिरी. अमेय आणि साजिरी हे दोघंही पुण्याचे.

लग्नाची गोष्ट : गर्लफ्रेंड ते जोडीदार...
sakal_logo
By
अमेय वाघ, साजिरी वाघ

आजच्या मराठी मनोरंजन सृष्टीतील नव्या पिढीतील आघाडीच्या कलाकारांपैकी एक अभिनेता अमेय वाघ. त्याचा बहारदार अभिनय, सूत्रसंचालन आणि सोशल मीडियावरील फोटोंवरच्या हटके कॅप्शन्स यांतून नेहमीच तो सर्वांचं लक्ष वेधून घेत असतो. त्याच्या पत्नीचं नाव आहे साजिरी. अमेय आणि साजिरी हे दोघंही पुण्याचे. पुण्याच्या बीएमसीसी कॉलेजमध्ये ते एकत्र होते. यांची पहिली भेट ही अकरावीत असताना झाली. त्यावेळी अमेय कॉलेजच्या एकांकिकांमध्ये कामं करायचा आणि साजिरी तिच्या मैत्रिणींबरोबर त्यांची तालीम पाहायला जायची. त्याचवेळी तिनं अमेयला पाहिलं आणि त्याचा अभिनय पाहून ती फार इम्प्रेस झाली. कालांतरानं त्यांच्यात छान मैत्री झाली आणि एक दिवस साजिरीनं अमेयसमोर आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. अमेयनं त्यावेळी त्याच्या करिअरवर फोकस करायचं ठरवलं असल्यानं साजिरीच्या भावनांचा आदर करत तिच्याकडं काही दिवसांचा अवधी मागितला आणि विचाराअंती काही महिन्यांनी अमेयनं तिला आपला होकार कळविला. जवळजवळ १०-१२ वर्षं एकमेकांना डेट केल्यावर तीन वर्षांपूर्वी ते विवाहबद्ध झाले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

साजिरी अमेयबद्दल बोलताना म्हणाली, ‘अमेय खूप समजूतदार मुलगा आहे. केअरिंग आहे, खूप मेहनती आहे. एखादी गोष्ट करायची ठरवली की तो ती गोष्ट साध्य करण्यात त्याचं २०० टक्के देतो. आमच्या रिलेशनशीपच्या त्या दहा वर्षात आम्हा दोघांमध्येही खूप बदल झाला; पण अमेयमध्ये झालेला सगळा बदल सकारात्मक आहे. लॉकडाउनच्या काळात मी ऑफिसच्या कामात बिझी असायचे. त्यावेळी अमेयनं स्वयंपाक शिकायचं ठरवलं आणि काही महिन्यातच तो त्याच्यात अगदी एक्स्पर्ट झाला. असा हा अमेय कोणत्याही गोष्टीकडं तो सकारात्मक नजरेतून बघतो.’’

अमेयची सगळीच कामं साजिरीनं पाहिली आहेत, पण त्यानं साकारलेली ‘गर्लफ्रेंड’ या चित्रपटातली भूमिका तिला विशेष आवडली. साजिरी अमेयची सर्वांत मोठी समीक्षक आहे, असं अमेयनं सांगितलं. अमेय म्हणाला, ‘‘साजिरी कधीच माझ्याकडं अभिनेता या नजरेनं बघत नाही. या क्षेत्रातलं ग्लॅमर घराच्या उंबरठ्याच्या बाहेर ठेऊन वावरायचं असं तिचं म्हणणं असतं आणि जे पूर्णपणे योग्य आहे. माझ्या संपूर्ण प्रवासात ती माझा भक्कम आधार ठरली आहे. अनेक वर्षं लॉंग डिस्टन्स रिलेशनमध्ये असताना आमचं हे नातं फ्रेश ठेवण्यामध्ये; किंबहुना ते आणखी छान पद्धतीनं खुलवण्यामध्ये साजिरीचा खूप मोठा वाटा आहे असं मला वाटतं. ती अतिशय समजूतदार आणि मॅच्युअर मुलगी आहे. तिनं माझ्या प्रत्येक निर्णयात माझी साथ दिली आहे. अशा अनेक गोष्टी आहे ज्या मी तिच्यामुळं करायला लागलो.  तसं पाहायला गेलं तर आमच्यात कॉमन असं काहीच नाही. तिच्या आवडीनिवडी पूर्णपणे वेगळ्या आहेत. त्यामुळं कधी आम्ही तिला आवडणाऱ्या हॉटेलमध्ये जातो, तिच्या आवडीच्या जॉनरचे चित्रपट बघतो; तर कधी ती माझ्या आवडीचे पदार्थ बनवते, माझ्या आवडीच्या ठिकाणी आम्ही फिरायला जातो. अशाप्रकारे आम्ही आमच्या नात्यात बॅलन्स साधत असतो. या निमित्तानं आम्हा दोघांनाही अनेक वेगवेगळ्या गोष्टी करून बघता येतात, मजा येते. अशाप्रकारे स्वतःला एक्सप्लोअर करण्यात आणि हीच आमच्या नात्यातली गंमत आहे.’’

अमेयसाठी हे वर्ष खूप खास असणार आहे. कारण पुढील चार महिन्यात तो ‘झोंबिवली’ आणि ‘कारखानीसांची वारी’ अशा दोन चित्रपटांतून आपल्या भेटीला येतोय. हे दोन्हीही वेगवेगळ्या धाटणीचे चित्रपट आहे. ‘झोंबिवली’ हॉरर, तर ‘कारखानीसांची वारी’  कौटुंबिक चित्रपट आहे. प्रेक्षकांप्रमाणे अमेय आणि साजिरीही या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहात आहेत.

(शब्दांकन - राजसी वैद्य)

Edited By - Prashant Patil