esakal | लग्नाची गोष्ट : प्रेमळ जोडीची ‘सोशल’ धमाल!
sakal

बोलून बातमी शोधा

लग्नाची गोष्ट : प्रेमळ जोडीची ‘सोशल’ धमाल!

लग्नाची गोष्ट : प्रेमळ जोडीची ‘सोशल’ धमाल!

sakal_logo
By
अंशुमन विचारे, अभिनेता

एक सूत्रसंचालक, अभिनेता म्हणून लोकप्रिय असलेला अंशुमन विचारे आपल्या पत्नीबद्दलचं प्रेम व्यक्त करण्याची एकही संधी सोडत नाही. अंशुमनच्या आयुष्यातलं तिचं महत्त्वाचं स्थान तो सोशल मीडियावरून नेहमी समोर आणत असतो. त्याच्या पत्नीचं नाव पल्लवी. पल्लवीनं लॉचे शिक्षण पूर्ण केले आणि अभिनयाच्या ओढीनं ती मनोरंजन क्षेत्रात आली. ‘काटा रुते कुणाला’, ‘कुकूचकू’, ‘आई’ अशा अनेक मालिकांतून पल्लवीनं महत्त्वपूर्ण भूमिका सकारल्या आहेत. त्यांची लव्ह स्टोरी ही खरोखरच फिल्मी आहे. आठ वर्षांपूर्वी एका चित्रपटात अंशुमन आणि पल्लवी एकत्र काम करत होते. त्यावेळी त्यांची पहिल्यांदा भेट झाली. सकाळी सुरू झालेल्या दोघांच्या गप्पा इतक्या रंगल्या, की लंच ब्रेक कधी झाला हेही त्यांना कळलं नाही. गप्पांच्या नादात जेवायला उशिरा गेल्यानं ताटं संपली आणि त्या दोघांना एकाच ताटात जेवायला लागलं! त्यावेळी जसं त्यांनी ताट वाटून घेतलं तसंच हळूहळू ते एकमेकांची सुख-दुःख शेअर करू लागले. या सगळ्या कालावधीत आपणच एकमेकांसाठी परफेक्ट आहोत, असं या दोघांच्याही लक्षात आलं आणि त्यांनी सात वर्षांपूर्वी लग्नागाठ बांधली. अंशुमन आणि पल्लवी या दोघांनाही एकमेकांबद्दल नितांत आदर आणि प्रेम वाटतं.

अंशुमन म्हणाला, ‘‘पल्लवी गेले काही वर्षं मनोरंजन क्षेत्रात काम करत होती, परंतु मुलगी झाल्यावर तिनं पूर्ण वेळ घरासाठी देण्याचा निर्णय घेतला, जो खूप कौतुकास्पद आहे. ती कायम हसतमुख असते. तिचा स्वभाव हा खूप मनमिळाऊ आहे. तिच्या या मनमिळाऊ स्वभावानं तिनं माझ्या कुटुंबाला, मित्र परिवाराला पटकन आपलंस केलं आहे. ती सर्वांना सांभाळून घेते. एखादी गोष्ट करायची ठरवली, की ती त्याच्या मुळापर्यंत जाते. तसंच ती हातचं राखून कधी काही करत नाही. तिचा हा गुण मला विशेष आवडतो. वेळेच्या बाबतीत मात्र ती माझ्या अगदी विरुद्ध आहे. अनेकदा तिच्या वेळा इकडं-तिकडं होतात. ती माझी खरी समीक्षक आहे. माझ्या प्रत्येक कामाबद्दल ती खरी खरी प्रतिक्रिया देते. एखादी गोष्ट आवडली, तर ती त्याचं कौतुक करतेच करते पण काही नाही आवडलं, तर ती तेही स्पष्टपणे सांगते. ती माझी खूप चांगली मैत्रीण आहे व तितकीच उत्तम आईही आहे.’’

पल्लवीनंही अंशुमनचं भरभरून कौतुक केलं. ती म्हणाली, ‘‘अंशुमनचा स्वभाव माझ्यापेक्षा बराच वेगळा आहे. तो फार छान आहे. तो मनमिळाऊ आहे, जबाबदार आहे, तो सर्वांची उत्तम काळजी घेतो आणि तो खूप प्रामाणिक आहे. त्याच्या हाच स्वभाव बघून मी त्याची माझा जोडीदार म्हणून निवड केली. तो अत्यंत मॅच्युअर, अत्यंत प्रेमळ आणि समंजस मुलगा आहे. तो सगळ्यांशी प्रेमानं वागतो. तो खूप डेडिकेशननं कुठलीही गोष्ट करतो आणि त्याच्यातलं हेच डेडिकेशन मला आत्मसात करायला आवडेल. त्याच्या स्वभावातला आणखीन एक गुण मला खूप भावतो तो म्हणजे, दिलेली वेळ पाळणं. एखाद्या ठिकाणी ज्या वेळी पोहोचायचं ठरलेलं, असेल त्याच्या पाच मिनिटं आधीच तो त्या ठिकाणी पोहोचलेला असतो. त्याला उशीर केलेला अजिबात आवडत नाही. आम्हाला एक मुलगीही आहे आणि एक वडील म्हणून अंशुमन परफेक्ट आहे. तिच्याशी खेळणं, गप्पा मारणं, तिला काय हवं नको ते बघणं हे सगळं करणं तो खूप एन्जॉय करतो. अंशुमन कधी माझा मित्र असतो, कधी माझा बाबा असतो, कधी तो नवरा असतो आणि त्याला कधी कोणत्या भूमिकेत शिरायचं हे खूप चांगलं कळतं. मी आतापर्यंत त्यानं केलेली सगळीच कामं पाहिली आहेत. त्यानं केलेल्या सगळ्या स्किट्स, विविध शोजचं सूत्रसंचालन हे सगळंच मला खूप आवडलं. त्यानं ‘वाहतो ही दुर्वांची जुडी’ या नाटकात केलेली भूमिका माझ्या मनाला खूप भिडली.’’

अंशुमन आणि पल्लवी यांचे स्वभाव जरी वेगवेगळे असले तरी त्यांच्या आवडीनिवडी या बऱ्याच अंशी सारख्या आहेत. ते दोघंही प्रचंड खवैये आहेत. त्यासोबतच त्या दोघांनाही फिरायला जायला खूप आवडतं. अशाप्रकारे एकमेकांना समजून घेत ते योग्यरीतीनं एकमेकांना साथ देत संसार करत आहेत.

- अंशुमन विचारे, पल्लवी विचारे

(शब्दांकन - राजसी वैद्य)

loading image