मस्करीतून जुळलेलं नातं!  वाचा सविस्तर...

सिद्धार्थ चांदेकर, मिताली मयेकर 
Thursday, 7 January 2021

साधारण चार वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमावेळी त्यांची पहिली भेट झाली. मितालीचा त्या कार्यक्रमात एक पफॉर्मन्स होता, तर सिद्धार्थ त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत होता.

मराठी मनोरंजनसृष्टीत अनेक सेलिब्रिटी जोडपी आहेत आणि त्यांच्या लग्नाच्या गोष्टीही प्रसिद्ध आहेत. सध्या चर्चेत असणारं जोडपं म्हणजेच अभिनेता सिद्धार्थ चांदेकर आणि अभिनेत्री मिताली मयेकर. हे दोघंही नेहमीच सोशल मीडियावर आपलं प्रेम व्यक्त करीत असतात आणि लवकरच विवाहबंधनात अडकणार आहेत. मिताली आणि सिद्धार्थची ओळख ३-४ वर्षांपासूनची आहे. साधारण चार वर्षांपूर्वी कोल्हापूरमध्ये एका कार्यक्रमावेळी त्यांची पहिली भेट झाली. मितालीचा त्या कार्यक्रमात एक पफॉर्मन्स होता, तर सिद्धार्थ त्या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करीत होता. त्यावेळची एक आठवण सांगताना मिताली म्हणाली, ‘‘कोल्हापुरला त्या कार्यक्रमात माझा मित्र अभिनेता शिवराज वायचळने आमची ओळख करून दिली. त्यानंतर रात्री तो कार्यक्रम संपल्यावर आम्ही एकत्र जेवायला बसले असताना माझे मित्र शुभंकर तावडे आणि प्रथमेश परब माझी मस्करी करत होते. सिद्धार्थही तिथं होता आणि वेळानं तोही त्यांच्यात सामील झाला. त्यानंतर तो फार छान वागायला लागला माझ्याशी. तेव्हा मला वाटलं, की चांगला मुलगा आहे आणि तेव्हापासून आमचं बोलणं वाढत गेलं, आमची मैत्री वाढत गेली. त्यानंतर आमच्या मैत्रीचं प्रेमात कधी रूपांतर झालं हे आमचं आम्हालाच कळलं नाही.’’ 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मितालीच्या स्वभावाबद्दल बोलताना सिद्धार्थ म्हणाला, ‘‘मिताली माझी सगळ्यात चांगली मैत्रीण आहे. आमचं प्रेमाचं नातं खुलत गेलं, तशी एक फार चांगली मैत्रीण मिळत गेली. तिच्याबरोबर फिरायला, तिच्याशी गप्पा मारायला मला मनापासून आवडतं. मिताली मॅच्युअर आहे, पण तितकीच कोणतीही गोष्ट एन्जॉय करणारी आहे. ती एका जोकवर साधारण १०-१५ मिनिटं हसू शकते. ती प्रत्येक गोष्टीकडं सकारात्मक दृष्टिकोनातून बघते. एखादी वाईट किंवा तिच्या मनाला न पटणारी गोष्ट झाली तरी ती त्याच्यात अडकून राहात नाही. ती कधीही, कुठंही एका मिनिटात झोपू शकते. असं मला करता आलं तर फार बरं होईल! एखाद्या व्यक्तीशी आपल्याला सतत बोलावंसं वाटणं, ती व्यक्ती आपल्याबरोबर असती तर मला आणखीन जास्त मजा आली असती असं वाटणं, हे सगळं मला मितालीबाबत वाटतं.’’ 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

सिद्धार्थबद्दल बोलताना मितालीनं सांगितलं, ‘‘सिद्धार्थ खूप खोडकर आहे आणि तो हे सगळं इतक्या गोड पद्धतीने करतो, की आपल्याला कधीच त्याचा रागही येत नाही. सिद्धार्थला माणसं खूप चांगली कळतात. कोणाशी कसं वागायचं, कोणाला कसं रिअॅक्ट करायचं हे त्याला खूप चांगलं जमतं. बोलताना त्याच्या जिभेवर साखर नेहमी असतं. त्यामुळं तो सगळ्यांना पटकन आपलसं करून घेतो. इतकं, की जे माझे मित्र-मैत्रिणी आहेत त्यांची आता माझ्यापेक्षा जास्त सिद्धार्थशी चांगली गट्टी जमली आहे. आतापर्यंत मी कधीही कोणालाही सिद्धार्थबद्दल गॉसिप करताना ऐकलं नाही. कुठल्याही गोष्टीचा तो इमोशनली विचार करतो, त्या गोष्टीची प्रॅक्टिकल बाजू तो कधीही बघायला जात नाही. त्याची केवळ हाच गोष्ट मला पटत नाही. आम्ही एकत्र असलो की खूप मजा मस्ती करतो. आम्ही दोघंही फूडी आहोत. वेगवेगळे पदार्थ बनवून खायला आणि दुसऱ्यांनाही ते खायला घालायला आम्हा दोघांनाही फार आवडतं. त्याला समोरच्याला फार छान पद्धतीनं कनव्हिन्स करता येतं. त्याचा हा जो जादूई गुण मला आत्मसात करायला नक्कीच आवडेल.’’ 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

सिद्धार्थ आणि मिताली यांनी एकमेकांची अनेक कामं पाहिली असून, सिद्धार्थला मितालीनं बालकलाकार म्हणून ‘बिल्लू’ या चित्रपटात केलेला इरफान खान यांच्या मुलीचा रोल आणि गेल्या वर्षी ‘सेक्स, ड्रग्स अँड थिएटर’ या सिरीजमध्ये तिने साकारलेली भूमिका विशेष आवडली. सिद्धार्थनं ‘क्लासमेट्स’, ‘गुलाबजाम’ या चित्रपटांत आणि ‘सिटी ऑफ ड्रीम्स’ या वेब सिरीजमध्ये साकारलेल्या भूमिकांच्या मिताली प्रेमात आहे. दोघंही सध्या त्यांच्या लग्नाच्या तयारीत व्यग्र आहेत...दोघांनीही शुभेच्छा! 

(शब्दांकन - संतोष भिंगार्डे)


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about Celebrity couple Siddharth Chandekar and Mithali Mayekar in Marathi entertainment