कटकारस्थान सिद्धांतांचे बळी...

सम्राट फडणीस 
बुधवार, 29 जुलै 2020

कोरोना विषाणूचं आकलन, डीएनए-आरएनए, त्यावर ज्ञात औषधांचा परिणाम, त्यातली रसायनं, त्यांचा एकूण मानवी शरीरावर परिणाम या गोष्टी बुद्धीला जाता जाता समजाव्यात इतक्‍या सोप्या नाहीत.. 

कॉन्स्पिरसी थिअरी किंवा कटकारस्थान सिद्धांतांबद्दल माहितीय? अनेकदा अवघड, क्‍लिष्ट, किचकट घटनेचे, माहितीचं आकलन बुद्धीला चटकन होत नाही. मग, ती घटना-माहिती बुद्धीला पटेल अशा पद्धतीनं आणि मूळ घटना-माहितीच चुकीची आहे, असं मांडण्याची पद्धत म्हणजे कटकारस्थान सिद्धांत, असं सोपं म्हणूया. 

कोरोनाचा धुमाकूळ सुरू असताना विषाणूबद्दल अनेक सिद्धांत रोज जन्म घेताहेत. कोरोना विषाणूचं आकलन, डीएनए-आरएनए, त्यावर ज्ञात औषधांचा परिणाम, त्यातली रसायनं, त्यांचा एकूण मानवी शरीरावर परिणाम या गोष्टी बुद्धीला जाता जाता समजाव्यात इतक्‍या सोप्या नाहीत. मग तुलनेने सोप्या अपमाहितीकडं वळायला होतं आणि रोज नवा कटकारस्थान सिद्धांत जन्माला येतो. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

चीनने कोरोना  पसरवल्याचा सिद्धांत 
लॅन्सेट नावाच्या आंतरराष्ट्रीय विख्यात वैज्ञानिक नियतकालिकानं गेल्या आठवड्यातल्या म्हटलंय, ‘अनिश्‍चितता आणि काळजीच्या काळात आरामशीर स्पष्टीकरण मिळतं, म्हणून कटकारस्थान सिद्धांत सहज पसरतात.’ चीननं कोरोना मुद्दाम पसरवला, सरकार कोरोनाची माहिती लपवतंय वगैरे कटकारस्थान सिद्धांत गेल्या चार महिन्यांत गल्ली-बोळापर्यंत पसरले. चीन-भारत यांच्यातला तणाव, कोरोनासारख्या विषाणूनं निर्माण केलेली अभूतपूर्व परिस्थिती, लॉकडाउन, आर्थिक-वैद्यकीय-सामाजिक व्यवस्थेवरचे दीर्घकालीन परिणाम असे विषय समजायला अवघड होते. हे का घडतंय, याचं आकलन करून घेण्यासाठी फक्त चीनकडं बोट दाखवणं सोपं होतं. तसं सुलभीकरण कटकारस्थान सिद्धांतानं दिलं; म्हणून ते पसरले. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

...अन्‌ सुशांतची आत्महत्या 
कटकारस्थान सिद्धांतांमुळं एखाद्या करुण घटनेचंही मातेरं होतं. सुशांत सिंग राजपूत या उमद्या कलाकाराच्या आत्महत्येनंतर सुरू असलेलं सोशल मीडिया कॅम्पेन त्याची साक्ष. सुशांतचा बळी नेपोटिझम आणि फेव्हरेटिझमनं घेतला, असा आरोप त्याच्या चाहत्यांनी केला. त्या आरोपाची पोलीस छाननी करतील, न्याय व्यवस्था त्याची योग्य ती दखल घेतील आणि सत्य बाहेर येईल. मात्र, त्या आधीच जन्माला घातलेल्या कटकारस्थान सिद्धांतांनी सुशांतचा खूनच झाल्यापर्यंतची मजल मारली. पोलीस तपासाची प्रक्रिया अवघड असते. ती अनिश्‍चित काळ चालते आणि काळजीही निर्माण करते. या पार्श्‍वभूमीवर सुशांतचा खून झाला, या सिद्धांताला गती मिळाली. आत्महत्येचं कारण लगेच समोर येत नसल्यानं दुसरं कारण सहज पटून जातं आणि मग, मूळ घटना बाजूला राहून समांतर कटकारस्थान सिद्धांत तयार होतात. सुशांतच्या आत्महत्येचं प्रकरण आजच्या घडीला तरी सार्वजनिकरीत्या याच वळणावर आहे. 

अवघड ते बाजूला ठेवू... 
कोरोनापासून दूर राहण्यासाठी रोजच्या जगण्यातले अत्यावश्‍यक बदल असोत किंवा आत्महत्या करावीशी वाटण्याइतका खचलेला सेलिब्रेटी असो, या मूळ मुद्द्यांवर चर्चा बाजूलाच राहिलीय आणि नव्या कटकारस्थान सिद्धांतांभोवती सोशल मीडिया भरकटतोय. त्यामुळं होतंय असं, की नेपोटिझमचा आरोप करून एखादी अभिनेत्री खच्चून प्रसिद्धी मिळवून जातेय आणि चिनी बनावटीच्या मोबाईलवरून अमेरिकी बनावटीचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म वापरून चीन, अमेरिकेला कसं नमवायचं, याच्या गप्पा सुरू राहतात. मग आणखी एखादी घटना घडते, ती समजण्यासाठी अवघड असते आणि मग नव्या कटकारस्थान सिद्धांतांचा जन्म होतो...
 

सम्राट फडणीस 
samrat.phadnis@esakal.com


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about Conspiracy theory