प्रयोगशील, मर्यादा ओलांडणारा!

संतोष शाळिग्राम
Wednesday, 11 November 2020

दिब्येंदू भट्टाचार्य व्यक्तिगत जीवनात मात्र अत्यंत साधा आहे. कुणाचाही विचार हा कंजूष नसावा, नाहीतर तुमच्याकडून भव्य काहीच घडणार नाही, या तत्त्वज्ञानावर त्याची वाटचाल सुरू आहे.

बॉलिवूडला हवा असलेला गोरा रंग नाही, रूप नाही; तरीही एखाद्या सिनेमात, वेब सीरिजमध्ये दिसल्यावर तो लक्षातच राहतो. त्याचं नाव दिब्येंदू भट्टाचार्य. तो बॉलिवूड शब्दाला मानत नाही. ‘प्रयोगशील आणि विचारांच्या मर्यादा ओलांडणारा भारतीय सिनेमा माझा आहे,’ असे म्हणणाऱ्या दिब्येंदू‌लाही हीच गोष्ट लागू होते. दिब्येंदूसमवेतची ही बातचीत.

मुंबईतील बाॅम्बस्फोटांचं सत्य सांगणाऱ्या ‘ब्लॅक फ्रायडे’मधील ‘येडा याकूब’, ‘देव डी’मधील ‘चुन्नी’, ‘अनदेखी’ या थ्रिलर वेब सीरिजचा डीसीपी बरुण घोष, ‘मिर्झापूर’मधील ‘डॉक्टर’ आणि ‘क्रिमिनल जस्टीस’मधील क्रूर ‘लायक तालुकदार’... अशी अभिनय कौशल्याची व्यापक ‘बँडविड्थ’ अंगी असलेला दिब्येंदू भट्टाचार्य व्यक्तिगत जीवनात मात्र अत्यंत साधा आहे. कुणाचाही विचार हा कंजूष नसावा, नाहीतर तुमच्याकडून भव्य काहीच घडणार नाही, या तत्त्वज्ञानावर त्याची वाटचाल सुरू आहे. दिब्येंदू मूळचा‌ कोलकत्याचा; पण आता मी मुंबईकर आणि पुणेकरही असल्याचं‌ तो सांगतो. त्याची सासुरवाडी पुण्याची आहे. मराठी संस्कृतीचे खाद्यपदार्थ हा त्याचा आवडीचा विषय. पुरणपोळी, बाजरीची  भाकरी आणि मिरचीचा गावरान ठेचा ते वांग्याची रस्सेदार भाजी‌, हे त्याचे ‘विक पॉइंट’. प्रयोगशील मराठी‌ सिनेमावर निरातिशय प्रेम करणारा, भास्कर चंदावरकर यांच्याकडून विनयशीलता हा गुण आत्मसात केल्याचं अभिमानानं सांगणारा हा गुणी कलाकार लहान वयातच अभिनयाच्या प्रेमात‌ पडला. तो म्हणतो, ‘‘बंगाली घरांत हार्मोनिअम आणि तबला असतोच. कलेशी जोडण्याची ही प्रक्रिया घरातूनच झाली. प्रयाग संगीत समितीशी जोडला गेलो. नंतर रंगमंचावर पाय ठेवला आणि मी मला सापडलो. अभिनय हेच माझं अध्यात्म असल्याची खात्री पटली. नुक्कड नाटक, पथ नाटक, अभिनय, दिग्दर्शन अशी खूप ‘नाटकं’ केली. त्यात ‘आयपीटीए’नं  १९९३मध्ये ‘सर्वोत्तम’ ठरवलं होतं. अभिनयाचंही शिक्षण घ्यावं, असं वाटू लागलं. मग नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा‌मध्ये प्रवेश झाला. ‘एनएसडी’नं ऊर्जा आणि अभिनयाला गरज असलेली ताकद दिली. त्यानंतरही मला सिनेमासाठी मुंबईकडं वळावं कधीच वाटलं नाही. रंगमंचावरच जीव रमत होता; म्हणून ‘एनएसडी’च्या ‘रिपेर्टरी’त तीन वर्षं काढली. सिनेमाचा पडदा स्वत:ला सिद्ध करण्याचं‌ सशक्त माध्यम असल्यानं तिथं प्रवेश केला. सिनेमात तुम्हाला किती फुटेज‌ मिळत‌ं, यापेक्षा तुम्ही प्रेक्षकांशी किती ‘कनेक्ट’ होता, हे मला अधिक महत्त्वाचं वाटतं. मला पैशांचं कधी आकर्षण वाटलं नाही.’’

आम्ही युनिक आहोत
मी‌ ‘बॉलिवूड’ या शब्दाला मानत नाही, भारतीय‌‌ सिनेमा माझा आहे. मी‌ अस्सल देशी मातीच्या‌ रंगाचा आहे. माझ्याकडं कला आहे, ‘क्राफ्ट’ बलस्थान आहे. मनात, शरीरात अभिनय आहे, कपट नाही. बॉलिवूडला हवं असलेलं कुण्या‌ ‘बड्य‌ा’ कलाकाराचं ‘क्लोन’देखील आम्ही नाही. आम्ही ‘युनिक’ आहोत. म्हणूनच, माझ्यासारख्या अनेक प्रयोगशील कलाकारांचा अभिनय लोकांना भावतो. भारतीय‌ सिनेमा आमचा आहे. मी मराठी, हिंदी,‌ तमीळ, तेलगू आणि कोणत्याही भाषेतील तसेच जागतिक स्तरावर कोणत्याही भाषेतील चित्रपटात‌ काम करू शकेन आणि करेन. कष्ट आणि कामाप्रती निष्ठा ही हवीच. त्यात‌ सातत्य ठेवलं, तरच जग तुम्हाला ओळखू लागतं.

मोठा‌ पडदाही बदलेल
‘ओटीटी’‌ प्लॅटफॉर्मवरील वेब सीरिज‌नं प्रेक्षकांच‌ं आयुष्य व्यापून टाकलेलं आहे, त्याच्या भवितव्याबाबत दिब्येंदू म्हणतो, ‘‘‘भारतील लोकांना आता खरा सिनेमा समजू लागला आहे. ओटीटी हा सिनेमा दाखवत आहे. त्याला सेन्सॉरशिप नाही. त्यामुळं त्यावरील सिनेमा वास्तवाच्या खूप जवळ गेला आहे. सिनेमा रिलीज करण्यासाठी जास्त खर्चही करावा लागत नाही. म्हणूनच, वास्तवानं भरलेला कंटेट दिला जातो आहे. प्रेक्षकांच्या पसंतीसही उतरत आहे. ओटीटीचा प्रेक्षकवर्ग वाढतच राहील. यात गोष्ट सांगायला, मांडायला तेवढा वेळही मिळतो. सिनेमा‌ मात्र दोन तासांत बसवायचा असतो. आता मोठ्या पडद्यालाही बदलावंच लागेल. आजचा तरुण हे चित्र बदलेल. मला प्रत्येक पात्राला न्याय‌ द्यायचा आहे. पैसा कमी असलेल्या; मात्र विचारांच्या मर्यादा ओलांडणाऱ्या निर्माते आणि दिग्दर्शकांबरोबर काम करणं मी पसंत करतो. ओटीटीमुळं गुणी कलाकारांना जोखलं जाऊ लागलं आहे. मोठ्या पडद्यानं मर्यादित स्वरूपात वापरलेल्या कलाकारांच्या कष्टाच‌ं चीज आता होऊ लागलं आहे...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article about Dibyendu Bhattacharya