दिल तो बच्चा है! : गरीबानी आजारी पडायचं नसतं!

नितीन थोरात
बुधवार, 20 मे 2020

मुळात गरीबानी जन्मालाच यायचं नसतं. समजा कुणी गरीबीत जन्माला आलं, तरी त्यानं आजारी पडायचं नसतं आणि समजा तो आजारी पडलाच तरी त्यानं मरण पत्करावं, पण दवाखान्यात जायचं नसतं. उपरोधात्मक आहे, पण वास्तव आहे. 

मुळात गरीबानी जन्मालाच यायचं नसतं. समजा कुणी गरीबीत जन्माला आलं, तरी त्यानं आजारी पडायचं नसतं आणि समजा तो आजारी पडलाच तरी त्यानं मरण पत्करावं, पण दवाखान्यात जायचं नसतं. उपरोधात्मक आहे, पण वास्तव आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लातूरच्या एका मित्राचा फोन आला. तो त्याच्या मुलीला पुण्यातल्या दवाखान्यात घेऊन आला होता. ती दहा दिवस व्यवस्थित उपचार घेतल्यामुळं बरी झाली होती. तिला डिस्चार्ज मिळणार, या आनंदात त्यानं फोन केला. त्याला भेटायला गेलो आणि दवाखान्याचं बिल ऐकून अंगावरच काटा आला. लातूरवरून पुण्याला म्हणजे ३२८ किलोमीटरसाठी ॲम्बुलन्सनं तीस हजार रुपये भाडं आकारलं होतं.

थोडक्‍यात, एका किलोमीटरला शंभर रुपये. मुलीला तापात झटके येत होते. त्यामुळं अर्जंट पुण्याला न्यावं लागेल, असं डॉक्‍टरांनी सांगितल्यानंतर त्यानं ॲम्बुलन्सला तीस हजार रुपये देऊन पुण्यात आणलं. त्यानंतर पुण्यातल्या एका मोठ्या हॉस्पिटलमध्ये तिला ॲडमिट केलं. त्याची मुलगी दोन दिवस आयसीयुमध्ये होती. आयसीयुचे एका दिवसाचे भाडे पंचवीस हजार रुपये. फक्त भाडे पंचवीस हजार. बाकी डॉक्‍टरांची फी, नर्सची फी, जेवण वगैरे सुविधांचे पैसे वेगळेच. अशा पद्धतीने बारा दिवसांचे साडे तीन लाख रुपये खर्च करून तो मुलीला घेऊन घराकडं निघाला होता. पण, त्याच्या चेहऱ्यावर आनंद होता. मुलगी जगली यापुढं साडेतीन लाख रुपये गौण होते. ‘पैशे कितीबी कमवू, लेकरु जगलं याचं समाधान वाटतं,’ या त्याच्या वाक्‍यात कमालीची सकारात्मकता होती. 
त्याचं सुख डोळ्यात साठवत घराकडं निघालो. मागं बायको बसली होती.

पैशांचे आकडे ऐकून आम्ही दोघंही सुन्न झालेलो. मागच्या आठवड्यात यवतमाळ जिल्ह्यातली घटना वाचनात आली होती. पायी चालत निघालेल्या मजुरांच्या मुलाला उन्हाचा त्रास झाला आणि त्याची तब्येत बिघडली. बिचाऱ्या आईबापानं शेकडो गाड्यांना हात केला. पण, कुणीच गाडी थांबवली नाही, कुणीच मदत केली नाही. अखेर त्या साडेचार वर्षाच्या मुलाचा अंत झाला. आईबापानी आपल्या इवल्याशा लेकराला नदीशेजारी खड्डा खोदून त्यात पुरलं आणि डोळे पुसत घराकडं निघाले.

एका बाजूला माझा मित्र होता. दुसऱ्या बाजूला तो मजूर होता. दोघांचीही आपल्या लेकरावर अपार माया होती. लेकरासाठी काहीही करण्याची त्यांची तयारीही होती. एकानं साडेतीन लाख रुपये खर्च केले, तर दुसऱ्यानं हजारो लोकांपुढं हात जोडले. पण, एकाच्या मागं पैशांचं पाठबळ होतं, ज्यामुळं त्याची लेक मरणाच्या दारातून माघारी आली. गरीब मजूराकडं ते नव्हतं. त्यामुळं त्याला आपल्या लेकराला माती द्यावी लागली.

म्हणून गरीबानी नेहमी लक्षात ठेवायचं, काहीही झालं तरी आपण आजारी पडायचं नसतं!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article nitin thorat

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: