esakal | दिल तो बच्चा है! : घाबरायचं नाय गड्या, घाबरायचं नाय!
sakal

बोलून बातमी शोधा

afraid

‘नित्या आरं खरं सांगतोय. आपला देश नाय म्हणलं, तरी दहा वर्षे मागं जाणार. लय मोठी मंदी येणार. लोकांचे कामधंदे जाणार. परप्रांतीय तर सगळे गावाकडं गेल्यात. त्यामुळं कामाचीं किंमतबी वाढणार. जी बिहारी लोक सातशे रुपयांत बिगारी काम करत होते, त्या कामाला आपले मराठी लोक हजार रुपये मागणार. त्यामुळं लय मोठा आर्थिक फटका बसणार लका.’

दिल तो बच्चा है! : घाबरायचं नाय गड्या, घाबरायचं नाय!

sakal_logo
By
नितीन थोरात

‘नित्या आरं खरं सांगतोय. आपला देश नाय म्हणलं, तरी दहा वर्षे मागं जाणार. लय मोठी मंदी येणार. लोकांचे कामधंदे जाणार. परप्रांतीय तर सगळे गावाकडं गेल्यात. त्यामुळं कामाचीं किंमतबी वाढणार. जी बिहारी लोक सातशे रुपयांत बिगारी काम करत होते, त्या कामाला आपले मराठी लोक हजार रुपये मागणार. त्यामुळं लय मोठा आर्थिक फटका बसणार लका.’

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

चहाचा घोट घेता घेता मित्र बोलत होता. सकाळी आठ वाजता आम्ही हडपसर गाडीतळावर भेटलो. चहाची टपरी उघडी होती. तिथं थांबून चहा पिता पिता त्यानं आंतरराष्ट्रीय राजकारण, जागतिक महामंदी, तिसरं महायुद्धावरचं नॉलेज पाजळलंच, शिवाय राज्य सरकार, स्थानिक आमदार, नगरसेवकापासून घरकाम करणाऱ्या बाईपर्यंत प्रत्येकाची अर्थव्यवस्था उलगडून दाखवली. त्याची तळमळ ऐकून मी इतका अस्वस्थ झालो की, पाणीपुरीचा ठेला टाकून पैसे कमवण्याची हीच संधी आहे, असे विचारही माझ्या डोक्‍यात येऊ लागले. 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अरबी समुद्राच्या पाण्यानं सगळी मुंबई बुडून ते पाणी पुण्यापर्यंत कसं येईल, याचा भौगोलिक आराखडाही त्यानं समजावून सांगितला. त्यासाठी चक्रीवादळाचं उदाहरण दिलं. टोल किड्यांच्या हल्ल्याचं उदाहरण दिलं. केरळमध्ये मृत पावलेल्या हत्तिणीमुळं माणूस कसा क्रूर झालाय हेही पटवून दिलं. थोडक्‍यात, भयानक परिस्थिती निर्माण झाली असून विश्‍वाचा अंत जवळ आलाय, अशी भिती त्यानं माझ्या मनात पद्धतशीर पेरली. 

आज ना उद्या मीसुद्धा माझ्या बायकोला, मुलाला घेऊन कुठल्या तरी हायवेनं हिमालयाच्या दिशेनं चालत जाईल, असं चित्र डोळ्यासमोर येऊ लागलं. संपूर्ण देश पाण्यात बुडेल, फक्त हिमालय उंचावर असल्यानं तिथं पोचलेला माणूस जगेल असं काहीसं ते चित्र होतं. मग माझं घरं, माझा लॅपटॉप, घरातलं फर्निचर, गॅलरीतली रोपं, कुत्र्याचं पिल्लू याचं काय होईल, असा विचार करत आम्ही तीन कप चहा पिलो. दीड तासात त्यानं मला जणू हॉलिवूडला पिक्‍चरच दाखवला. विशेष म्हणजे, त्या पिक्‍चरमध्ये मला हिरो बनवून टायटॅनिकच्या हिरोसारखं शेवटी मलाच बुडवून मारलं होतं. चहाच्या दुसऱ्या कपाला पाणीपुरीचा ठेला टाकायचं माझं स्वप्न त्यानं तिसऱ्या कपाच्या शेवटच्या घोटाला मारुन टाकलं होतं. म्हणजे त्यानं आधी आपल्या मराठी माणसाला खूप संधी आहेत, अशी स्वप्न दाखवली आणि शेवटी सगळं संपणार हेही पटवून दिलं. 

त्यानंतर तर मला मी का जगतोय, याचंच उत्तर सापडत नव्हतं. तो बिचारा त्याच्या कामगारांचे फोन घेत होता. त्यांना कामं पटवून देत होता. मी मात्र हिमालयावर गेल्यावर किती थंडी वाजेल याचा विचार करत होतो. त्याच्या बोलण्यानं असलं भारी गारुड माझ्या डोक्‍यावर केलं होतं काही केल्या मला त्यातून बाहेरच पडता येईना. 

इतक्‍यात शेजारचं बांधकाम साहित्याचं दुकान उघडलं आणि आम्ही त्या दुकानात गेलो. त्याला स्लॅबमध्ये वापरायचं स्टील घ्यायचं होतं. वेगवेगळ्या प्रकारचं स्टील चेक केल्यावर पैसे देताना तो दुकानदाराला म्हणाला, ‘साहेब तुम्ही म्हणताय हे स्टील पंधरा वर्षे आरामात टिकतं म्हणून. म्हणजे २०३५ पर्यंत टिकणार, अशी तुम्ही गॅरंटी दिलीया. पण, जर का २०३४ ला गंज लागला तर मी तवाबी बदलून नेईल बरका.’ दुकानदारानं मोठ्या आत्मविश्‍वासानं त्याच्या हातात हात दिला आणि सहमती दिली. ते पाहून मला धक्काच बसला. म्हणजे हा स्वत: अजून पंधरा वर्षे जगण्याची हिंमत बाळगतोय आणि मला का हिमालयात पाठवतोय? दुकानाबाहेर आल्यावर तो त्याच्या वाटेनं निघून गेला. लोक भीती दाखवण्यासाठीच असतात, घाबरायचं की नाही ते ठरवणं तर आपल्याच हातात आहे. तेव्हाच ठरवलं, कुणी कितीही भीती दाखवली तरी आपण जगण्याची हिंमत हारायची नाही. मग जे होईल ते होईल.